मुलांनी एकमेकांना त्यांच्या वाईट नावांनी बोलणे थांबविले

एका शाळेतील मुलांनी असा नियम बनविला की ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या खऱ्या नावाने बोलतील. ही प्रेरणा त्यांना मूल्यवर्धन उपक्रमांतून मिळाली.

शाळांमध्ये बर्‍याचदा काही मुले खऱ्या नावाने बोलण्याऐवजी एकमेकांना अपमानकारक नावाने हाक मारतात. काहीवेळा काही मुले अपमानकारक नावांनी इतर मुलांना चिडवतात. हळूहळू  ही अपमानकारक नावेच काही मुलांची ओळख बनतात. मग बर्‍याचदा लोक त्यांना त्यांच्या अपमानकारक नावानेच ओळखतात.

ही परिस्थिती बदलण्यासाठी, एक शालेय शिक्षिका मूल्यवर्धनचा वापर एक साधन म्हणून करत आहे. चांगली गोष्ट अशी आहे की गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात त्या आपल्या उद्देश्यात सफल होत आहेत.

बुलडाणा जिल्हा परिषद पासून सुमारे दीडशे किमी. अंतरावर संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा बलोदा या शाळेतील सोनाली तरोळे शिक्षिका आहेत.

सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या बलोदा गावात मुख्यत: लहान शेतकरी व मजूर कुटुंबे आहेत. शाळेत एकूण पाच शिक्षकांसह 145 मुले आहेत. सप्टेंबर 2018 पासून येथे नियमित मूल्यवर्धन सत्रांचे आयोजन केले जात आहे.

 

वृत्तपत्राच्या माध्यमातून मूल्यवर्धन तासिकेचे आयोजन करताना शिक्षिका विद्या वालोकर

मूल्यवर्धन तासिकेत शाळा परिसरात मुलांसाठी सहयोगी खेळ आयोजित करताना शिक्षिका सोनाली तरोळे

मूल्यवर्धनातून काय मिळवायचे?

सोनाली तरोळे सांगतात की, मूल्यवर्धन सत्रापूर्वी या शाळेतील काही मुले एकमेकांना अपमानकारक नावाने हाक मारत असत. उदाहरणार्थ, प्रकाश ओमला ओम्या आणि ओम प्रकाशला पद्या असे म्हणत. मूल्यवर्धनच्या काही उपक्रमांमध्ये एकमेकांची छेडछाड केल्याने कोणते वाईट परिणाम होतात याबद्दल सांगितले गेले आहे. मूल्यवर्धनच्या अशा काही उपक्रमांमुळे मुले आता एकमेकांचा आदर करत आहेत. याशिवाय ते त्यांच्यापेक्षा लहान मुलांनाही मान देत आहेत.

मुलांनी बनविला हा नियम

एकमेकांच्या परस्पर सहभागाने स्वतःच्या वर्गासाठी आणि शाळेसाठी नियम तयार करण्यास मूल्यवर्धनमुळे मुलांना प्रोत्साहन मिळते.

सोनाली तरोळे सांगतात की जुलै 2018 मध्ये मूल्यवर्धन सत्रादरम्यान मुलांनी प्रथम त्यांच्या वर्गासाठी नियम बनविला की प्रत्येक मुलाला खर्‍या नावाने संबोधले जाईल. या नियमाचा परिणाम म्हणून हळूहळू मुले एकमेकांबद्दल आदर दाखवू लागली. त्यानंतर, ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या मूल्यवर्धनच्या संयुक्त सत्रात सर्व वर्गातील मुलांनी एकत्रितपणे शाळेसाठी समान नियम बनविला.

नियमांचे पालन करण्याचे आव्हान

सोनाली तरोळे म्हणतात, “फक्त नियम बनविणे पुरेसे नव्हते. खरे आव्हान असे होते की तयार केलेल्या नियमांचे सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे पालन केले पाहिजे.”

त्या म्हणतात, “काही मुले या म्हणण्याशी सहमत नव्हती. कदाचित त्यांच्या स्वत:च्या सामाजिक वातावरणाचा परिणाम त्यांचे वर्तन बदलण्यात सर्वात मोठा अडथळा ठरत होता. तेव्हा मूल्यवर्धनच्या सर्व सत्रांमध्ये सर्व मुलांनी एकमेकांना त्यांच्या बरोबर नावाने बोलवावे यासाठी प्रोत्साहित केले.”

मुले एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागली

शिक्षिका सोनाली तरोळे यांनी आणखी एक प्रयोग केला. मूल्यवर्धन सत्रात सहयोगी खेळांच्या दरम्यान काही पाच मिनिटांचे काही खेळ घेतले. यात प्रत्येक मुलाच्या नावाचा अर्थ स्पष्ट करण्यासारख्या खेळांचा समावेश होता.

मुले सांगतात, मूल्यवर्धनमध्ये असे शिकायला मिळाले की जर कोणी अपमानकारक नावाने संबोधित केले तर त्यांना वाईट वाटेल. चौथीची वेदिका थिरोडकर म्हणते, “आम्हाला कळले की कोणालाही लठ्ठ किंवा लंबू असे चिडवू नये.”