जिल्हा मेळावा हिंगोली: अहवाल

हिंगोली जिल्हा मूल्यवर्धन मेळावा  १० जानेवारी २०२० : अहवाल

स्थळ: महावीर भवन, हिंगोली
मूल्यवर्धन उपक्रमामुळे आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळांमध्येच शिकवावे, असे पालकांना वाटू लागेल,
हिंगोली जिल्हाधिकारी मा. श्री रुचेश जयवंशी.

“राज्य शासनाच्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांमध्ये मूल्ये मोठ्या प्रमाणावर रुजत आहेत, त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे, ते योग्य नागरिक होत आहेत. यामुळे येत्या ३ ते ५ वर्षांत मूल्यवर्धन उपक्रमांचा दृश्य परिणाम होऊन पालकांना वाटू लागेल की, आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाठवावे” असे मत राज्य शासनाच्यावतीने राज्यभर जिल्हापातळीवर आयोजित केल्या जात असलेल्या, मूल्यवर्धन मेळाव्यांपैकी दिनांक १० जानेवारी २०२० रोजी झालेल्या हिंगोली येथील मेळाव्यामध्ये जिल्हाधिकारी मा. श्री. रुचेश जयवंशी यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले. “मूल्यवर्धन उपक्रमामुळे शाळांमध्ये एक सुप्त क्रांती होत आहे” असेही  निरीक्षण त्यांनी नोंदविले.

राज्य शासनाच्यावतीने राज्यभर जिल्हास्तरीय मूल्यवर्धन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. दिनांक १० जानेवारी २०२० रोजी हिंगोली येथे मूल्यवर्धन जिल्हा मेळावा संपन्न झाला. राज्यभरातील मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी  शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अथक मेहनतीने सकारात्मक संदेश देणारी सुंदर पोस्टर्स (भित्तीपत्रके) तयार करून त्या पोस्टर्सचे भव्य प्रदर्शन हिंगोली येथील रामलीला मैदानात भरविले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन DIECPD प्राचार्य मा. श्री. बी. बी. पुटवाड यांच्या हस्ते झाले.

हिंगोली येथील महावीर भवनामध्ये मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी मा .श्री रुचेश जयवंशी,डायट प्राचार्य मा. श्री. बी. बी. पुटवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. श्री. संदिपकुमार सोनटक्के, जि. प. उपाध्यक्ष मा. श्री. मनिष आखरे, ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. गणेश शिंदे, अधिव्याख्याता व मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक श्री. राम नाईकनवरे, एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था व इतर आदरणीय मान्यवरांच्या हस्ते  दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला .

यानंतर मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करणारी चित्रफीत सभागृहात दाखवण्यात आली. त्यानंतर एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

डावीकडून श्री. कुलदिप मास्ट (शिक्षक तसेच एसएमएफ पदाधिकारी), श्री. राम नाईकनवरे (अधिव्याख्याता DIECPD), श्री. गणेश शिंदे (ज्येष्ठ अधिव्याख्याता), श्री. पुटवाड बी. बी. (प्राचार्य DIECPD), श्री. शांतिलाल मुथ्था, संदिपकुमार सोनटक्के (प्राथमिक शिक्षणाधिकारी)

 

डावीकडून श्री. गणेश शिंदे (DIECPD ज्येष्ठ अधिव्याख्याता), श्री. संदीप कुमार सोनटक्के (शिक्षणाधिकारी प्राथमिक), श्री. रूचेश जयवंशी (जिल्हाधिकारी हिंगोली), श्री. मनीष आखरे (जिल्हा परिषद उपाध्यक्ष), शांतिलाल मुथ्था सर, श्री.अंकुश ससाने (ज्येष्ठ अधिव्याख्याता DIECPD)

 

मान्यवरांचे मनोगत 
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मा. डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी व्यासपीठावर आपले मनोगत मांडताना मूल्यवर्धन उपक्रम राबवल्या जात असलेल्या एका शाळेतील आपला एक अनुभव सांगितला. एकदा ते संबंधित शाळेला भेट द्यायला गेले असता वर्ग सुरू असताना ते ठरवून पादत्राणे बाहेर न काढता वर्गामध्ये गेले. तेव्हा वर्गातील विद्यार्थ्यांनी त्यांना जाणीव करून दिली की, त्यांनी वर्गात पायांत बूट घालून येऊ नये; कारण त्यांनी तसा वर्गनियम केला आहे .

DIECPD प्राचार्य श्री. बी. बी. पुटवाड यांनीही व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करताना मूल्यवर्धन कार्यक्रमाचे कौतुक केले.

शिक्षकांनी बनविलेल्या व्हिडीओ क्लिप्सचे सादरीकरण :

हिंगोली जिल्ह्यातील मूल्यवर्धनच्या शिक्षकांनी तयार केलेल्या ३२८ क्लिप्सपैकी २० चित्रफितींचे सादरीकरण उपस्थित मान्यवरांसमोर करण्यात आले. प्रत्येक चित्रफितीला संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाने दाद मिळत होती.

चर्चासत्र 
यानंतर व्यासपीठावर शिक्षण तसेच मूल्यवर्धन उपक्रमांविषयीचे चर्चासत्र संबंधित मान्यवर व एसएमएफचे संस्थापक श्री. शांतीलाल मुथ्था यांच्या सहभागातून  रंगले.

मूल्यवर्धन उपक्रमांचे परिणाम शाळा-शाळांमध्ये  कशा प्रकारे होत आहेत, हे या चर्चासत्रातून स्पष्ट झाले. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी माईक घेऊन सभागृहात प्रत्येक शिक्षकाकडे जाऊन त्यांच्या भावना, प्रतिक्रिया व अपेक्षा तसेच मूल्यवर्धनविषयीचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी त्यांना दिली.  ज्या शिक्षकांना ही संधी मिळाली त्यांनी मूल्यवर्धन ही शिक्षणातील एक नवी क्रांती आहे, मूल्यवर्धन उपक्रमातून मुलांमध्ये मूल्ये रुजत असून त्यातून योग्य नागरिक व माणूस तयार होत आहे, अशा प्रकारे कौतुक करून भविष्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाला आम्ही आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करू,असा निर्धार व्यक्त केला.

चर्चासत्रात अनेक शिक्षकांनी मूल्यवर्धन उपक्रम आयोजित करताना त्यांना आलेले अनुभव, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले सकारात्मक बदल असे अनेक हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. यांतील एक अनुभव श्री. विशाल वि. येरावार, जि. प. प्रा. शा, तालुका औंढा नागनाथ, यांनी सादर केला . त्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांच्या शाळेतील दोन मुलींचे वडील हयात नाहीत, त्यामुळे  त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पूर्वी हे वर्गातील इतर विद्यार्थ्यांना माहीत नव्हते; पण जेव्हा त्यांना या दोन मुलींची पार्श्वभूमी समजली तेव्हापासून सर्व विद्यार्थी त्या दोघींना जाणीव न करून देता त्यांना सर्वप्रकारे मदत करतात. मुलांमध्ये ही जाणीव मूल्यवर्धन उपक्रमातून निर्माण झाली आहे.

कार्यक्रमाचा समारोप :

कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ अधिव्याख्याता श्री. गणेश शिंदे यांनी आपल्या अस्खलित मनोगताने मेळाव्याप्रसंगी भवनात उपस्थित असलेल्या मान्यवरांना मुग्ध केले. ते म्हणाले की, मूल्यवर्धन उपक्रमामुळे शाळेची पटसंख्या वाढत आहे. मुलांमध्ये वक्तशीरपणा, आत्मविश्वास इत्यादी सकारात्मक बदल जाणवतात. आपल्या मनोगताचा शेवट करताना अधिव्याख्याता गणेश शिंदे म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांकडे आय. बी. शाळांमधील विद्यार्थ्यांसारखे गळयात टाय, डोक्याला तेल व पायात जोडे नाहीत;  पण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे मूल्य आणि शिक्षण नक्कीच आहे.”

यानंतर हिंगोली येथील मूल्यवर्धन मेळाव्याची सांगता झाली.

मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये:

हिंगोली येथील मूल्यवर्धन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या श्रीमती अश्विनी कुरुंदकर यांनीही चर्चासत्रात आपल्या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या प्रमाणिकपणाचे उदाहरण सांगितले. विद्यार्थ्याला आदल्या दिवशी शाळेच्या आवारात २००० रुपयांची नोट सापडली असता त्याने दुसऱ्या दिवशी ती स्वतःहून परत केली.

 

  • राज्यभरातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे चित्रच या भव्य प्रदर्शनातील मूल्यवर्धनवर आधारित तयार केलेल्या भित्तीपत्रिकांच्या माध्यमातून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
  • सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
  • श्री. शांतिलाल मुथ्था यांनी स्टेजवरून खाली उतरून बसलेल्या शिक्षकांमध्ये शेवटपर्यंत जाऊन शिक्षकांना बोलण्याची संधी दिली. अनेक शिक्षक हात वर करून त्यांच्या भावना व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त करीत होते. जवळपास सर्वच शिक्षकांनी मूल्यवर्धनचा शाळातील प्रभाव विशद करून शाळांमध्ये कार्यक्रमाची अत्यंत आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
  • दुपारी १.३० वाजता हिंगोली शहरातील सर्व पत्रकार बंधूना प्रदर्शनाच्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. सर्व पत्रकारांनी या भव्य प्रदर्शनाची पाहणी करून मूल्यवर्धनची माहिती जाणून घेतली. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या सुरु असलेल्या संपूर्ण कार्यवाहीविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफच्या संपूर्ण टीमने हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • सर्व शिक्षकांनी मिळून मूल्यवर्धनच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी भारत देशाचा कर्तव्यतत्पर आणि जबाबदार नागरिक घडविण्याचा निर्धार केला.