शाळेच्या ठिकाणी मूल्यवर्धनची ‘प्रयोगशाळा’, ग्रामस्थांनी फुलवली बाग.

सहा महिन्यांपूर्वी शाळेबाहेर जी जमीन रिकामी पडलेली होती, तिथे आता एक सुंदर बाग दिसते. बागेमध्ये गुलाब, जास्वंद, चंपा आणि चमेली अशा सुगंधी फुलांच्या झाडांसोबत नारळासारखी फळांची झाडे देखील दृष्टीस पडतात. हे चित्र शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मेहनतीचे फळ आहे.

कोल्हापूर येथून ४० किलोमीटर दूर असणाऱ्या कागल ब्लॉकमधील वाल्वेखुर्द येथील प्राथमिक शाळेची ही गोष्ट. इथले मुख्याध्यापक रमेश कोळी सांगतात की, शाळेतील अभ्यासक्रमात पर्यावरणाचे विषय तर शिकवले जातातच, परंतु मूल्यवर्धनमधून प्रेरणा घेऊन त्यांनी पहिल्यांदाच पर्यावरणाच्या मुद्द्यांना पुस्तकातून बाहेर काढले आणि त्यांना प्रत्यक्ष व्यवहारात आणले.

शाळेतील शिक्षक चंद्रकांत लोकरे यांनी सांगितले की मूल्यवर्धनच्या काही उपक्रमांमध्ये झाडे लावणे, झाडे वाचविणे आणि झाडांच्या इतर उपयोगांविषयी सांगितलेले आहे. शाळेच्या बाहेरील मैदानावरील काही झाडांकडे बघून इथल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनात विचार आला की आपण एक बाग तयार करू शकतो. त्यामुळे शाळेची शोभा वाढेल.

चंद्रकांत म्हणाले, “बाग तयार करण्यामागे एक वेगळे कारण देखील होते. मूल्यवर्धनच्या उपक्रमांत श्रमाचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा होती की विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे. यासाठी आम्ही त्यांच्याकडून श्रम करून तर घेतले नाही, पण संपूर्ण कामाच्या वेळी त्यांना सोबत ठेवले. हेतू असा होता की गावातील लोकांनी जमीन खोदून कशाप्रकारे दगड बाहेर काढले, खड्ड्यांमध्ये कशाप्रकारे खत आणि माती टाकली, कशाप्रकारे रोपे लावली,  त्यांना पाणी कसे दिले हे त्यांनी बघावे.”

१९२६ मध्ये स्थापना झालेल्या मराठी माध्यमाच्या या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत एकूण १५० विद्यार्थी शिकतात. यामध्ये ८७ मुले आणि ६३ मुली आहेत. या शाळेतील तीनही शिक्षकांनी ऑगस्ट २०१८ मध्ये मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी हे प्रशिक्षण या शाळेपासून ४५ किमी दूर असणाऱ्या कागल येथे घेतले.

इतर एक शिक्षक उत्तम कांबळे यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या चार दिवसांच्या अनुभवाबद्दल सांगितले, “विद्यार्थ्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत कशाप्रकारे भागीदार बनवून घेतले जाऊ शकेल हे त्यावेळी आम्हाला सांगितले होते. जेव्हा आम्ही मूल्यवर्धनचे वर्ग घ्यायला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला वाटले की वृक्षारोपण हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम होऊ शकेल, त्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल वातावरण तर राहीलच त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा यात सहभागदेखील वाढेल.”

रमेश यांच्या मते अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची श्रमाप्रती आस्था वाढली आहे. त्यांनी सांगितले, “आता बाग आहे तर आम्हाला विद्यार्थ्यांना हे सांगण्याची गरज पडत नाही की बाग स्वच्छ ठेवा, झाडांना पाणी घाला, त्यात प्लास्टिकचा कचरा टाकू नका. म्हणजे बागेमुळे विद्यार्थी बऱ्याच गोष्टी आपोआपच शिकत आहेत.”

शिक्षिका श्रावणी देवकर यांच्या मते मुळे अशाप्रकारच्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे ते पर्यावरणाबद्दल आधीच्या तुलनेत अधिक जागरूक झाले. त्या म्हणाल्या, “सुरुवातीला मी मूल्यवर्धनमुळे फार प्रभावित झाले नव्हते. मात्र ही बाग तयार होताना बघून माझा मूल्यवर्धनबद्दलचा विश्वास वाढत गेला.” 

उत्तम यांनी बागेबद्दलची एक घटना सांगितली. ते म्हणाले, “एके दिवशी मूल्यवर्धनचा वर्ग चालू होता. मी विद्यार्थ्यांना विचारले की आपण शाळेच्या बाहेर झाडे लावायला पाहिजेत का? तर विद्यार्थ्यांनी मला विचारले की त्यात कोणती झाडे लावू शकतो? मी त्यांना काही झाडांची नावे सांगितली. त्यांनी विचारले की या झाडांचे कोणते फायदे आहेत? मी त्यांना झाडांचे काही फायदे सांगितले. अशाप्रकारे आम्ही बरीच माहिती मिळवली आणि समजून घेतली.”

तिसरीमध्ये शिकणारी समृद्धी पाटील म्हणाली की शाळेतील बागेत लावण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला मोगऱ्याचे रोप दिले होते. अशाप्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून रोपे आणली.

चौथीमध्ये शिकणारी गायत्री गोसावी म्हणाली, “जेव्हा आम्हाला सांगितले की आजू बाजूच्या कुठल्याच शाळेत आमच्या सारखी बाग नाही, तेव्हा खूप आनंद झाला. आमची बाग बघणारे इतर लोक आनंदित होतात.”

तिसरीची श्रावणी घोडके म्हणाली की पहिले चप्पल, बुटांचे स्टँड बागेत ठेवलेले असायचे. मग एके दिवशी विद्यार्थ्यांनी मिळून ठरवले की ते बागेपासून दूर ठेवायचे. आता चप्पल, बूट बागेत पसरलेले दिसत नाहीत.

चंद्रकांत या बागेला मूल्यवर्धनचा परिणाम मानतात. त्यांनी सांगितले, “या बागेमुळे विद्यार्थी पाण्याचा योग्य वापर करायला शिकत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वर्तवणूक कशी असायला हवी हे शिकत आहेत. याच गोष्टी त्यांना मूल्यवर्धनच्या इतर उपक्रमांतदेखील सांगितलेल्या आहेत. अशाप्रकारे, या बागेने त्यांना आपापल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.”

रमेश म्हणाले, “पर्यावरण विषय शिकवणे आणि त्याविषयी आवड निर्माण करणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही बागेच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी जोडून घेतल्या आहेत.” उत्तम यांनी सांगितले, “आता आम्ही ही बाग आणखी मोठी करणार आहोत. यासाठी एक परिसर तयार करून त्याला कुंपण घालण्याचा विचार आहे. मग आम्ही तेथे बरीच झाडे लावू.”

शेवटी श्रावणी म्हणाली,

“बागेला आणखी सुंदर बनवण्यासाठी आम्हाला गावकऱ्यांची सोबत मिळाली आहे. या कामासाठी ते श्रमदान करणार आहेत. सोबतच ते पैसे देखील जमा करणार आहेत.”