वर्गनियमासाठी विद्यार्थिनीची धीटाई

वर्गनियमासाठी विद्यार्थिनीची धीटाई

मूल्यवर्धनमुळे मुले वर्गासाठी स्वत: नियम बनवू लागले आहेत. त्याची अंमलबजावणी स्वत: करत असून नियमांचे इतरांनीही पालन करावे यासाठी आग्रही आहेत.

(जिल्हा : गोंदिया, तालुका : गोरेगाव, केंद्र : मोहगाव (तिल्ली), शाळा : मोहगाव)

मोहगाव केंद्राअंतर्गत येणाऱ्या १० शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात झाली. कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी या केंद्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांनी दि. २२ डिसेंबर २०१६ रोजी भेट दिली.

जवळपास ३० विद्यार्थीसंख्या असलेल्या तिसरीच्या वर्गात अधिकारी गेले.  मुलांमध्ये काही कुजबुज होती. त्यांना काहीतरी सांगायचे होते. त्यांच्यातलीच एक मुलगी,  आदिती युवराज धपाडे, धिटाईने उभी राहिली आणि सर्व मान्यवरांना म्हणाली, “आम्ही काही वर्गनियम केले आहेत. वर्गात येणारे सारेजण ते नियम पाळतात. तुम्हालाही या नियमांचे पालन करावे लागेल. मी तुम्हाला विनंती करते की तुम्हीही वर्गात येताना बूट-चप्पल वर्गाबाहेर काढून यावे. कारण आम्हीही तसेच करतो.”

आदितीची विनंती ऐकल्यानंतर मान्यवरांना तिने सांगितलेल्या नियमाचे पालन केले आणि तिचे कौतुक केले.

वर्गनियम पाळण्यासाठी सर्व मुले आग्रही असतात. मूल्यवर्धनमुळे आदितीमध्ये बोलण्याचे धाडस निर्माण झाले. पहिले ते चौथीपर्यंतच्या वर्गात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात असला तरी त्याचे चांगले परिणाम संपूर्ण शाळेत दिसून येत आहेत.