बुजरी मुले सादर करू लागली नाटक !

शाळेत अबोल असणाऱ्या मुलांचा बुजरेपणा आणि भीती दूर करण्यासाठी शिक्षक अनेक प्रयत्न करत असतात. तरी देखील ते यशस्वी होत नसतील तर रत्नागिरी पासून ५० किलोमीटर दूर असणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शाळा वाकेड-२ येथील शिक्षिका निर्मला राणे या त्यांच्यासाठी एक उदाहरण सिद्ध होऊ शकतात.

जे विद्यार्थी कधी काळी बोलायलाही घाबरायचे, तेच आता विविध प्रकारचे प्रश्न विचारू लागले आहेत. असे परिवर्तन निर्मला यांनी दोन वर्षांच्या मेहनतीने घडविले आहे. एवढेच नाही तर हेच विद्यार्थी आता बऱ्याच गोष्टींवर नाटक देखील सादर करतात. निर्मला या परिवर्तनाचे श्रेय मूल्यवर्धनला देतात.

आम्ही जेव्हा शाळेला भेट दिली, तेव्हा  इयत्ता चौथीचे विद्यार्थी गोलात बसलेले होते. विद्यार्थी मूल्यवर्धनच्या उपक्रम पुस्तिकेतील एक गोष्ट ‘प्रामाणिकपणाचे बीज’ वाचत होते. नंतर त्यांनी या गोष्टीवर नाटक करण्यासाठी आपापसात मिळून पात्रांची निवड केली. ओंकारने अब्दुल सेठ, प्रदीप आणि सुनीलने  अब्दुल सेठची मुले आणि भक्तीने अब्दुल सेठची मुलगी अशी नाटकात भूमिका केली.

वृद्ध झालेले अब्दुल सेठ आपल्या आंब्याच्या बागेची जबाबदारी एकावर सोपवण्यासाठी मुलांची प्रामाणिकपणाची परीक्षा घेतात. यासाठी ते तीनही मुलांना एक कोय देऊन रोप तयार करण्याचे आणि त्याची काळजी घेण्याचे काम देतात. शेवटी अब्दुलसेठ आपली मुलगी रुखसाना वर खुश होऊन तिला या कामाची जबाबदारी सोपवतात.

नाटक संपल्यानंतर सर्व विद्यार्थी टाळ्या वाजवतात. यानंतर ते प्रामाणिकपणाबद्दल चर्चा करतात.

निर्मला राणे  सांगतात की काही वर्षांपूर्वी हेच विद्यार्थी प्रश्न विचारल्यावर घाबरून जात असत. नाटक करण्याबद्दल तर कुणी विचारही करू शकत नव्हते. यांच्यातील एखाद्या विद्यार्थ्याला काही बोलायला उभे केले तर ते भीती आणि लाजेने मान खाली घालयाचे. मात्र आता हेच विद्यार्थी गोष्टींवर नाटकही करतात आणि त्यावर चर्चासुद्धा करतात.

निर्मला म्हणतात, “दोन वर्षांपूर्वी मी या विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिकविण्यासाठी आणि त्यांची आवड वाढविण्यासाठी प्रयत्न केले नव्हते, असे नाही. मी खूप प्रयत्न केले होते, पण काहीच परिणाम झाला नव्हता. मी जेव्हा जास्त प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली होती. माझ्यासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवणे एक आव्हान बनले होते. यावर मी काय करायला हवे याविषयी मला कुठल्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळत नव्हते. माझ्यातच काही तरी कमतरता आहे असे मला वाटायला लागले होते.”

निर्मला यांच्या मते ऑगस्ट २०१७ मध्ये ४ दिवसांच्या मूल्यवर्धनच्या  कार्यशाळेत भाग घेतल्यानंतर त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल झाला. त्या सांगतात, “पहिले मी विद्यार्थ्यांना परंपरागत पद्धतीने शिकवायचे, पण असे शिकवल्याने विद्यार्थी शिक्षणात भागीदार बनत नव्हते. नंतर, जेव्हा मी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले तेव्हा लक्षात आले की एकच पाठ वेगवेगळ्या पद्धतींनी समजावता येऊ शकतो.”

निर्मला यांचे म्हणणे आहे की शिकवण्यासाठी त्या पहिले फक्त फळा, खडू आणि पुस्तकांपर्यंतच मर्यादित होत्या, परंतु मूल्यवर्धनचे उपक्रम घेतल्यानंतर त्यांना कळाले की शिकवताना इतर गोष्टींना देखील समाविष्ट करून घेता येईल. या व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विविध प्रकारचे खेळही घेता येऊ शकतात.

वाकेड येथील मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत एकूण ४४ विद्यार्थी शिकतात. यामध्ये २७ मुले व १७ मुली आहेत. मंगला परुळेकर या शाळेतील दुसऱ्या शिक्षिका आहेत आणि प्रकाश भोवडे हे येथील मुख्याध्यापक आहेत.

मुख्याध्यापक प्रकाश भोवडे यांनी सांगितले की बऱ्याच वेळा ते स्वतः मूल्यवर्धनच्या उपक्रमांत सहभागी झाले आहेत. विद्यार्थी आपले काम स्वतः करायला शिकत आहेत, दररोज करण्याच्या महत्त्वाच्या कामांबद्दल ते माहिती मिळवत आहेत,  विद्यार्थी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत असे त्यांना जाणवले.

मंगला यांनी सांगितले की मूल्यमापन करण्यासाठी परीक्षेशिवाय इतर कुठलाही मार्ग नव्हता परंतु, आता मूल्यवर्धनमध्ये विद्यार्थ्यांचे बऱ्याचप्रकारे मूल्यमापन होते. या मूल्यमापनाचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये कुठलाच विद्यार्थी निराश होत नाही. यामुळेच शाळेत अधिक विद्यार्थी उपस्थित राहायला लागले आहे.

मंगला यांनी निर्मला यांच्या शिकविण्यात झालेल्या बदलाविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, “पहिले निर्मला पूर्णपणे अभ्यासक्रमापर्यंतच केंद्रित होत्या. आमच्याकडे इतर शैक्षणिक साहित्य नसल्याने निर्मला यांची इच्छा असून देखील त्यांना इतर काही सुचत नसे. परंतु मूल्यवर्धनच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी जे उपक्रम घेतले, त्यातून त्यांना स्वतःला मजा आली. निर्मला मला नेहमी सांगत असतात की विद्यार्थी त्यांना बरेच प्रश्न विचारायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना खूप छान वाटते आणि वर्गात जाण्याआधी बरीच तयारी देखील करावी लागते. आता त्या आधीच्या तुलनेत अधिक जबाबदार झाल्या आहेत.”

निर्मला यांनी वर्गातील मुलांची उपस्थिती वाढण्याबद्दल सांगितले, “मूल्यवर्धनमध्ये जोडीचर्चा, गटचर्चा आणि गोलात चर्चा करण्यावर भर दिलेला आहे. त्याशिवाय, मूल्यवर्धनच्या सत्रांमध्ये सर्व विद्यार्थी आपापली मते मांडतात. यामुळे सर्वाना प्रतिनिधित्वाची संधी मिळते. ते मिळून निर्णय घेतात. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांना मजा येत आहे हे जेव्हा मी अनुभवले की, तेव्हा मूल्यवर्धनच्या पद्धती वापरण्यास सुरुवात केली.”

चौथीमध्ये शिकणारी पायाल भितडे हिने सांगितले की मूल्यवर्धनच्या वर्गात ती अपूर्ण गोष्टी पूर्ण करायला शिकली. चौथीमध्येच असणारी पद्मिनीणे सांगितले  की आधी ती शाळेत न येण्यासाठी खूप कारणे सांगायची तसेच  खोटे बोलायची, पण जेव्हा पासून मूल्यवर्धनचे वर्ग सुरु झाले, तिने खोटे बोलणे बंद केले आहे. आता ती वेळेवर शाळेत येते.

निर्मला यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या नाटकाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की जेव्हा आपल्या आजूबाजूला प्रामाणिकपणा कमी होत आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी अशा विषयावर नाटक करणे खूप महत्त्वपूर्ण ठरते. या नाटकात अभिनय करणारा ओंकार भितडे म्हणाला, “हे नाटक करून मला कळाले की प्रामाणिकपणा म्हणजे काय आणि आपण प्रामाणिक कसे बनू शकतो.”

शेवटी निर्मला म्हणाल्या,

“जर आपण लहान वयातच या विद्यार्थ्यांमध्ये मुल्यांची पेरणी केली, तर त्या मुल्यांचा परिणाम त्यांच्यावर आयुष्यभर राहील.”