जिल्हा मेळावा बीड: अहवाल

बीड जिल्हा मूल्यवर्धन मेळावा  १३ जानेवारी २०२० : अहवाल

स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हटले जाते.
मूल्यवर्धन असाच भविष्यात गोड फळे देणारा कार्यक्रम आहे.”
-माजी राज्यमंत्री श्री. जयदत्त क्षीरसागर

“प्राथमिक शालेय अभ्यासक्रमाबरोबर राबविण्यात येत असलेला मूल्यवर्धन कार्यक्रम आहे. याच काळात मुले घडतात. पुढील समंजस नागरिकत्त्वाच्या बीजाचं याच काळात रोपण होतं. मूल्यवर्धन हे संविधानाधिष्ठित मूल्ये शालेय वयात रुजवून समंजस नागरिकत्त्वाचे गोड फळ देणारे बीज आहे,” असे रोजी माजी राज्यमंत्री श्री. जयदत्त क्षीरसागर राज्य शासनाच्या वतीने बीड येथे दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या मूल्यवर्धन मेळाव्यामध्ये मनोगत मांडताना म्हणाले.

मूल्यवर्धन उपक्रम हा जसा शालेय अभ्यासक्रमाचा भाग आहे, तसा तो स्वतः एक समांतर व मूळ शालेय अभ्यासक्रमाला पूरक असलेला एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे, असेही ते म्हणाले.

  प्रभातफेरी सजली : 

 

दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी प्रातःकाळी साडेसात पासून बीड नगरीचा मध्यवर्ती भाग शालेय विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण कार्यक्रमाचा सकारात्मक घोषणांनी दुमदुमून उठला. प्रसंग होता राज्यव्यापी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय बीड येथील मेळावा.

बीड शहरातील मध्यवर्ती भाग डॉ. आंबेडकर चौक ते संत सावता माळी चौक येथपर्यंत उर्दू शाळा व मराठी शाळांमधील मुलांची एकत्र प्रभात फेरी निघाली. विद्यार्थ्यांची ही प्रभात फेरी अत्यंत जोशपूर्ण, जल्लोशपूर्ण आणि सकारात्मकतेने परिपूर्ण होती.

विद्यार्थ्यांच्या ‘मुलगा-मुलगी समान आहेत’, ‘स्वच्छता हेच स्वस्थ आयुष्याचे गमक’, ‘विद्यार्थ्यांचा विकास, देशाचा विकास’, ‘भारत माता की जय’ या घोषणांनी आणि मराठी व उर्दू भाषेतील फलकांनी ही प्रभातफेरी सौंदर्यपूर्ण सजली होती.

सकाळी नऊच्या सुमारास ही प्रभातफेरी मूल्यवर्धन पोस्टर्स प्रदर्शनाचे ठिकाण, स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्टान, संत सावता माळी चौक या ठिकाणी पोहोचून तिची सांगता झाली.

मूल्यवर्धन प्रदर्शनाचे माजी मंत्री श्री. जयदत्तआण्णा क्षीरसागर यांच्या शुभहस्ते :

 

मूल्यवर्धनचा वारू भारतीय संवैधानिक मूल्यांचा ध्वज उंचावत, फडकवत तुफान घोडदौड करतोय. दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी हा अश्व बीड नगरीत प्रवेश करता झाला. स्व. झुंबरलाल खटोड प्रतिष्ठान, संत सावता माळी चौक, बीड येथील विशाल मैदानात राज्यभरातील मूल्यवर्धन उपक्रमासंबंधित शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे (पोस्टर्स) प्रदर्शन भरवले. त्याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री श्री. जयदत्तआण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.

प्रदर्शन ठिकाणी प्राथमिक शाळेतील मुलांनी ‘स्वच्छतेचे महत्त्व’, ‘प्लास्टिकचा वापर टाळणे’, ‘मुलगा-मुलगी समान आहेत’ असे संदेश देणाऱ्या नाटिका सादर केल्या.

उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

 

यानंतर बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात व्यासपीठावर दीप प्रज्वलन होऊन मूल्यवर्धन मेळाव्यास सुरूवात झाली. याप्रसंगी श्री. अजित कुंभार (मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी कलेक्टर, बीड), श्री. विनोद देवगावकर (डायट प्राचार्य अंबाजोगाई), श्री. भगवान सोनवणे (उपशिक्षणाधिकारी जि. प. बीड), श्रीमती अंजली सूर्यवंशी (वरिष्ठ अधिव्याख्याता, अंबाजोगाई व मूल्यवर्धन नोडल अधिकारी), श्री तुकाराम पवार (शिक्षण विस्तार अधिकारी, बीड) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

डावीकडून मा.श्री.विनोद देवगावकर ( प्राचार्य DIET )अंबाजोगाई, मा.श्री.तुकाराम जाधव (गट शिक्षणाधिकारी जि.प बीड), मा.श्री.तुकाराम पवार (शिक्षणविस्तार अधिकारी जि.प.बीड), मा.श्री.भगवान सोनवणे (उपशिक्षणाधिकारी जि.प.बीड), मा.श्री.जयदत्त आण्णा क्षिरसागर, (माजी मंत्री महाराष्ट्र राज्य), मा.श्री.शांतीलाल मुथ्था सर (एस.एम.एफ अध्यक्ष,पुणे)

डावीकडून मा.श्री.तुकाराम पवार(शिक्षण विस्तारअधिकारी जि.प.बीड), मा.श्री.धनराज सोळंकी (जिल्हाध्यक्ष बीड बीजेएस) , मा.श्री.अॅड, कालीदास ठिगळे (संस्कार प्रबोधिनी ,अध्यक्ष), श्री.भगवान सोनवणे (उपशिक्षणाधिकारी जि प़ .बीड), मा.श्री.शांतीलाल मुथ्था सर (एस.एम.एफ अध्यक्ष), मा.श्री.जयदत्त आण्णा क्षीरसागर ( माजी मत्री महाराष्ट्र राज्य)

प्रास्ताविक :

मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करणारी चित्रफीत सभागृहात दाखविण्यात आली. त्यानंतर एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी मूल्यवर्धन संकल्पना व आजच्या काळातील त्याचे महत्त्व स्पष्ट करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मान्यवरांचे मनोगत :

 

माजी राज्यमंत्री श्री. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात मूल्यवर्धन कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करताना आता मूल्यवर्धन कार्यक्रम प्राथमिक शालेय शिक्षणासोबत पुढील वर्गातसुद्धा सुरू व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली.

 

बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी मंचावर आपले मनोगत मांडताना मूल्यवर्धन कार्यक्रमाचे कौतुक केले. जपान, स्वीडन येथील शाळा सर्वोत्तम गणल्या जातात. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे भारतीय शाळा व शिक्षण चांगल्या दर्जाचे होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

DIECPD प्राचार्य श्री. विनोद देवगावकर यांनी संक्षिप्त पण नेमक्या शब्दांत मूल्यवर्धनच्या आवश्यकतेबद्दल आपले मत व्यक्त केले.

सुरुवातीला आपण सवयी विकसित करतो, नंतर सवयीच आपला विकास करतात. मुलांना प्राथमिक शालेय वयापासून चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते,” असेही देवगावकर म्हणाले. मूल्यवर्धन हेच काम करते.श्री विनोद देवगावकर हे पहिले डायट प्राचार्य आहेत की ज्यांनी स्वतः मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले आहे, हे विशेष.

डॉ. अंजली सूर्यवंशी, वरिष्ठ अधिव्याख्याता, डायट, अंबाजोगाई यांनी मूल्यवर्धनचा संपूर्ण इतिहास व वर्तमान लेखाजोखाच आपल्या ओघवत्या मनोगतातून सुदंरपणे मांडला.

शिक्षकांनी बनविलेल्या व्हिडीओ क्लिप्सचे सादरीकरण :

 

मूल्यवर्धनच्या शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडीओ क्लिप्सपैकी एकूण १८ शिक्षकांच्या व मूल्यवर्धन शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाने तयार केलेली फिल्म असे एकूण १९ फिल्म्सचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक चित्रफितीला संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाने दाद मिळत होती.

चर्चासत्र :

 

शिक्षण तसेच मूल्यवर्धन कार्यक्रमासंबंधित मान्यवर व एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांच्या समवेत व्यासपीठावर चर्चासत्र रंगले.

मूल्यवर्धन कार्यक्रमाचा कशाप्रकारे परिणाम होत आहे, हे या चर्चासत्रातून स्पष्ट झाले. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी माईक घेऊन सभागृहात प्रत्येक शिक्षकाकडे जाऊन त्यांच्या भावना, प्रतिक्रिया व अपेक्षा तसेच मूल्यवर्धनबद्दलचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी दिली. ज्या शिक्षकांना ही संधी मिळाली, त्यांनी हीच शिक्षणातील एक नवी क्रांती आहे, मुलांमध्ये मूल्ये रुजवून त्यांना योग्य नागरिक व माणूस बनविण्याचा प्रयत्न मूल्यवर्धन करीत आहे, अशाप्रकारे कौतुक केले.

चर्चेत अनेक शिक्षकांनी मूल्यवर्धन संबंधित हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. एका शिक्षकाने विकलांग (स्पेशअल मुलांसाठी) मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू करावा, असा प्रस्ताव मांडला.

मूल्यवर्धन मेळावा : निर्धारपत्राचे सामुहिक वाचन

 

आज संपूर्ण राज्यभर व राज्याबाहेरही पाळेमुळे पसरून डौलदार झालेल्या मूल्यवर्धन या ज्ञानवृक्षाचे  बीजारोपण बीड जिल्ह्यामध्ये झाले होते. दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी बीड जिल्ह्यात संपन्न झालेल्या मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात प्रथमच एका नवीन गोष्टीची सुरुवात झाली, ती म्हणजे मूल्यवर्धन मेळावा निर्धारपत्र वाचन. 

सभागृहात उपस्थित शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवरांनी स्वतःच्या हृदयावर हात ठेवून मूल्यवर्धन मेळावा निर्धारपत्राचे सामुहिक वाचन करून संविधानातील मूल्ये व इतर सकारात्मक बाबी विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा निर्धार केला.

कार्यक्रमाचा समारोप :

 

“आम्ही शाळेची चांगली इमारत बांधून देऊ, तसेच विद्यार्थ्यांना इतर बाह्यसुविधाही देऊ, पण गुणवत्ता आम्ही देऊ शकत नाही. ती फक्त जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकच विद्यार्थ्यांना देऊ शकतात.” असे आमदार श्री. संदीपभैया क्षीरसागर म्हणाले.

दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी राज्य शासनाच्या वतीने बीड येथे झालेल्या मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात आमदार श्री. संदीपभैया क्षीरसागर बोलत होते. मूल्यवर्धन व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. बीड मूल्यवर्धन जिल्हा मेळावा कार्यक्रमाचा समारोप त्यांच्या मनोगताने  झाला.

मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये :

 

  • मूल्यवर्धन मेळावा निर्धारपत्राचे सामुहिक वाचन
  • शिक्षकांनी तयार केलेल्या १८ व्हिडीओ फिल्म्स सोबत मूल्यवर्धन उपक्रम शिकत असलेल्या विद्यार्थिनीच्या पालकाने तयार केलेली १ फिल्म दाखवली गेली.
  • राज्यभरातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यवर्धनमुळे शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे चित्रच या भव्य प्रदर्शनातील भित्तीपत्रके संपूर्ण बीड जिल्ह्यातील लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
  • सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता.
  • बीड जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, नोडल अधिकारी चर्चासत्राच्या वेळी मंचावर उपस्थित होते. सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे पोहोचत असल्याचे व त्याचा मोठा परिणाम विद्यार्थी व पालकांमध्ये दिसून येत असल्याचे नमूद केले. मूल्यवर्धनच्या समग्र शाळा दृष्टीकोन (होल स्कूल अप्रोच) या संकल्पनेचा उपयोग होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांना बोलण्याची संधी दिली. जवळपास सर्वच शिक्षकांनी मूल्यवर्धनचा प्रभाव, आवश्यकता व महत्त्व पटवून दिले.
  • बीड शहरातील पत्रकारांनी भव्य प्रदर्शनाची पाहणी करून मूल्यवर्धनची माहिती करून घेतली व या संपूर्ण कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफच्या संपूर्ण टीमने यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांचेही कौतुक आणि सन्मान  करण्यात आले.
  • सर्व शिक्षकांनी मिळून मूल्यवर्धन कार्यक्रमातून आजचा विद्यार्थी भारत देशाचा कर्तव्यशील, जबाबदार नागरिक बनविण्याचा निर्धार केला.