बालआनंद मेळाव्यामध्ये मूल्यवर्धन चे सादरीकरण

मुजफ्फरपूर, अमरावती येथील उर्दू माध्यम शाळा क्रमांक ७ येथील शिक्षक सय्यद मुजाहिद सय्यद शब्बीर हे मूल्यवर्धनच्या कार्यक्रमाने इतके प्रभावित झाले की, त्यांनी जिल्हा स्तरीय बालआनंद मेळाव्यात मूल्यवर्धन विषयाचेच सादरीकरण करण्याचे ठरविले. त्यांनी आपल्या स्वत:च्या अध्यापनात केलेल्या बदलामुळे मुलांच्या अध्ययन स्तरात झालेली प्रगती अनुभवली आहे.

मुजफ्फरपूर येथील शाळेतील शिक्षक सय्यद मुजाहिद सय्यद शब्बीर

मुजफ्फरपूर येथील शाळेतील शिक्षक सय्यद मुजाहिद सय्यद शब्बीर

हे शिक्षक उर्दू माध्यम मूल्यवर्धनचे प्रेरक आहेत. मे २०१८ मध्ये त्यांनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले आणि मूल्यवर्धनचे उपक्रम आपल्या शाळेत घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन रचनांचा वापर इतर विषयांचे अध्यापन करतानाही केला. याचा खूप सकारात्मक परिणाम ‍झाला. सहकार्यभाव, आत्मविश्वास, शिकण्यातील आनंद या सर्वच गोष्टी एकाएकी वाढल्या आहेत असे जाणवू लागले. या सर्वातून मूल्यवर्धनचे महत्त्व लक्षात आले.

चर्चा करताना विद्यार्थी

चर्चा करताना विद्यार्थी

हे शिक्षक म्हणतात,

“मला मूल्यवर्धन पुढे इ-लर्निंग सुद्धा कमी प्रभावी वाटते. कारण मी पाहिले आहे की एखाद्या पाठावर आधारित विडीओ आपण मुलांना दाखवतो पण काही दिवसांनी मुले तो विसरून जातात. पण वर्षाच्या सुरुवातीला केलेले मूल्यवर्धनचे उपक्रम मात्र आज देखील (फेब्रु. महिन्यात) मुलांच्या लक्षात राहिलेले आहेत. या उपक्रमात मुले प्रत्यक्ष सहभागी होतात, नुसती बघ्याची भूमिका नसते. म्हणूनच मूल्यवर्धन अतिशय प्रभावी आहे असे मला वाटते. शिवाय यातल्या सहयोगी अध्ययन पद्धती इतर विषयांचे अध्यापन करीत असताना वापरल्या गेल्या तर त्या विषयांचे अध्यापनही प्रभावी होते.”

हे शिक्षक प्रेरक असल्याने त्यांनी केंद्र व तालुकास्तरीय प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणूनही काम केलेले आहे. प्रशिक्षण देताना ते शिक्षकांना मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन रचना इतर विषय शिकवताना वापरण्याविषयी आवर्जून सांगतात.

मूल्यवर्धनचे महत्त्व जास्तीतजास्त शिक्षकांपर्यंत पोहचावे म्हणूनच त्यांनी १८ आणि १९ जानेवारी रोजी अमरावती येथे झालेल्या बालआनंद मेळाव्यात या विषयावर सादरीकरण केले. मूल्यवर्धनची मूल्ये, कौशल्ये, सहयोगी अध्ययन रचना वगैरे दर्शविणारे तक्ते बनविले व ते दैनंदिन अध्यापनाला कसे जोडले जाऊ शकतात याचे उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण दिले. सय्यद सरांच्या या सादरीकरणाचे सर्वांनी अभिनंदन केले व एका वेगळ्या विषयाची कल्पना मांडल्याबद्दल  कौतुकही केले.       

मूल्यवर्धन उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेले तक्ते

मूल्यवर्धन उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेले तक्ते