बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या शंभर वर्षे जुन्या शाळेला मिळाले जीवनदान

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सलग कमी होते आहे. अशा परिस्थितीत सांगलीपासून ४० किलोमीटर दूर असणाऱ्या एका शाळेत मात्र विद्यार्थ्यांची संख्या तीन पटींनी वाढून शंभरच्या पुढे गेली आहे.

२०१८ मध्ये एक एप्रिलच्या वीस दिवस अगोदरच शाळेत पहिलीमध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तेच तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांची एकूण संख्या कमी होऊन ४० पेक्षाही कमी राहिली होती. परंतु आता बदललेल्या परिस्थितीत गावातील प्रत्येक कुटुंब आपल्या मुलांना शिकण्यासाठी याच शाळेत पाठविण्यास उत्सुक आहे. हे शक्य झाले आहे मूल्यवर्धनमुळे!

रेठरेहरणाक्ष येथील शाळेतील परिपाठ सुरु असताना

रेठरेहरणाक्ष येथील शाळेतील परिपाठ सुरु असताना

पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. प्रवेश सुरु होण्यास अजून २० दिवस बाकी आहेत, परंतु मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील एके दिवशी सकाळी सात-आठ वाजल्यापासूनच बारापेक्षा अधिक पालक आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी मुख्याध्यापकांना शाळेच्या कार्यालयात घेरून बसलेले आहेत. रेठरेहरणाक्ष येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे हे कार्यालय आहे आणि येथील मुख्याध्यापक आहेत गिरीश मोकाशी.

गिरीश मोकाशी सांगतात,

“तीन वर्षांपूर्वी शाळा बंद पडण्याची चर्चा होत असे. शाळा बंद पडण्याची बातमी एका बातमीपत्रात छापून देखील आली होती. या गावातील अनेक पिढ्यांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या भावना शाळेशी जोडल्या गेलेल्या आहेत. आमच्यासाठी हा कठीण काळ होता, पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.”

कार्यालयातील सूचनाफळ्यावर विद्यार्थ्यांची संख्या नमूद आहे. त्यात एकूण ११८ विद्यार्थ्यांमध्ये ६५ मुले आणि ५३ मुली आहेत. मुख्याध्यापकांसोबत शाळेत एक शिक्षक आणि एक शिक्षिका आहेत. मराठी माध्यमाची ही शाळा सन १८८० मध्ये स्थापन झालेली आहे.

शाळेतील शिक्षक कृष्णा पाटील म्हणतात,

“पुढील शैक्षणिक वर्षात शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दीडशेच्या पार होईल. विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे कारण आम्ही त्यांची रुची वाढवण्यात यशस्वी झालो आहोत. विद्यार्थी आता प्रत्येक विषय मिळून शिकतात आणि परीक्षेत आधी पेक्षा चांगले गुण मिळवतात.”

त्यांनी सांगितले की तीन वर्षांत विद्यार्थ्यांचा बुजरेपणा कमी झाला आहे. हे सर्व मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे शक्य झाले आहे.

मूल्यवर्धनच्या बाबतीत आपले अनुभव सांगताना मोकाशी यांनी सांगितले की डिसेंबर २०१५ मध्ये त्यांना पहिल्यांदा मूल्यवर्धनबद्दल कळाले तेव्हा त्यांनी पुण्यातील वाघोली येथे असणाऱ्या ‘भारतीय जैन संघटने’च्या कॉलेज परिसरात राज्यातील इतर शिक्षकांसोबत तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले होते.

मोकाशी यांनी पुढे सांगितले, “याच शाळेपासून सांगली जिल्ह्यात मूल्यवर्धन सुरु झाले. मूल्यवर्धन शिक्षणातील खूप चांगला प्रयोग आहे. याच्या मदतीने आम्ही विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धती बदलली. यामुळे शाळेबद्दल विद्यार्थ्यांचे विचार बदलले.”

विद्यार्थी सांगतात की मूल्यवर्धनच्या एका उपक्रमात त्यांनी बूट, चप्पल घालून वर्गात न येण्याचा नियम बनवला आहे. पाचवीत शिकणारी अनुष्का शिंदे सांगते, “हा नियम सर्वांना लागू होतो. शिक्षक देखील बूट किंवा चप्पल घालून वर्गात येत नाहीत.”

तिसरीमध्ये शिकणारा तनवीर मोहम्मद म्हणतो, “मूल्यवर्धनमधील गोष्टी आम्हाला खूप आवडतात. त्यात सर्वांना विचार करावा लागतो आणि सर्वांची उत्तरे वेगवेगळी असतात.” इयत्ता तिसरीतील विद्यार्थी आपल्या मूल्यवर्धनच्या उपक्रम पुस्तिकेतील ‘गैरसमज’ गोष्टीवर नाटकदेखील करतात. कृष्णा यांनी सांगितले की अशा प्रकारचे उपक्रम केल्याने हे विद्यार्थी रचनात्मक आणि स्वतंत्रपणे विचार करू शकतात.

शाळेतील शिक्षिका दिपाली सदलगे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू बदल झाला आहे. आता ते आपल्याबद्दल मोकळेपणाने विचार करतात. एकमेकांसोबत चर्चा करतात. एखाद्या कामात येणाऱ्या अडचणी ओळखतात. आपली जबाबदारी त्यांना कळते आणि मिळून निर्णय घेतात. मूल्यवर्धनमध्ये हे चांगले आहे की त्यांना परीक्षा द्यावी लागत नाही.”

विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एक प्रमोद संपतराव म्हणाले, “शाळेची इमारत आणि विद्यार्थ्यांना बघून तुम्हाला परिवर्तनाचा अंदाज येणार नाही. हे फक्त त्यांना कळेल जे तीन-चार वर्षांपासून शाळेसोबत जोडलेले आहेत.” प्रमोद यांनी सांगितले की त्यांची मुलगी श्रेया एका प्रायव्हेट शाळेत शिकत होती, पण एका वर्षापूर्वी त्यांनी श्रेयाचे नाव प्रायव्हेट शाळेतून काढून या शाळेत टाकले आहे.

प्रमोद यांच्या मते प्रायव्हेट शाळेत असताना श्रेया जास्त बोलत नव्हती, पण या शाळेत मात्र दुसरीतून तिसरीत येईपर्यंत ती पूर्ण आत्मविश्वासाने बोलायला लागली आहे. खूप प्रश्न विचारायला लागली आहे. पहिले इतरांना नमस्कार करत नव्हती. आता ती सर्वांशी चांगल्याप्रकारे बोलायला लागली आहे.

वर्तुळचर्चेत आपले मत मांडताना विद्यार्थिनी

वर्तुळचर्चेत आपले मत मांडताना विद्यार्थिनी

गावातील विश्वास मोरे यांनी सांगिलते की येथील बरेच लोक असे आहेत जे आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेतून काढून या शाळेत घालू इच्छितात. असे होण्याचे याचे कारण म्हणजे त्यांच्या शेजारील मुले अभ्यासासोबतच चांगली मूल्येदेखील शिकत आहेत हे ते पाहतात.

आक्काताई शिंदे यांची नात अनुष्का इयत्ता चौथीमध्ये शिकते. अक्काताई म्हणाल्या, “आमची मुलगी शाळेतील बऱ्याच गोष्टी घरी आणि घरातील गोष्टी शाळेत सांगते. इथले शिक्षक घरी येऊन मुलांबद्दल चौकशी करतात आणि आम्हालादेखील शाळेत बोलावतात. मी माझ्या नातवाला देखील येथेच शिकवू इच्छिते.”

कृष्णा यांनी सांगितले की मूल्यवर्धनच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत जोडण्यासाठी विविध प्रकारचे गृहकार्य दिले जातात. यामध्ये विद्यार्थी आणि पालक एकमेकांशी विविध विषयांवर चर्चा करून माहिती मिळवतात. अशाप्रकारे ते शाळेतील उपक्रमांत सहभागी होतात.

वरिष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य जगन्नाथ मोरे यांनी सांगितले की त्यांना मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल बरीच माहिती मिळालेली आहे. ते म्हणाले, “बदल झाला आहे! हे झाले कारण इथल्या शिक्षकांनी मूल्यवर्धनच्या उपक्रमांतून आम्हां वरिष्ठ नागरिकांना थेट मुलांसोबत जोडले. हे शिक्षक आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमांना बोलावून मुलांसोबत चर्चा करायला सांगतात. चर्चेत व्यसनमुक्ती आणि स्वच्छता असे मुद्दे असतात.”

सहयोगी खेळ खेळताना विद्यार्थी

सहयोगी खेळ खेळताना विद्यार्थी

शिक्षिका दिपाली यांच्या म्हणण्यानुसार शाळा आणि समाजातील संबंध मजबूत झाल्याने विद्यार्थ्यांचा खूप फायदा झाला आहे. त्या म्हणाल्या, “गावातील लोकांनी शाळेला टी.व्ही, साउंड सिस्टीम, संगणक, प्रिंटर आणि कपाटे या गोष्टी भेट दिल्या आहेत. या सामुग्रीमुळे आम्हाला मूल्यवर्धनच्या उपक्रमांत आणि शिक्षणाच्या इतर कामांत मदत होत आहे.”

तीन वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी तुलना करताना मोकाशी म्हणाले, “या गावातील बहुतेक लोक मजूर आहेत. आईवडील सकाळी उठून शेतात काम करायला निघून जातात. तीन वर्षांपूर्वी यांची मुले अंघोळ न करताच शाळेत येत. तेव्हा प्रश्न पडायचा की यांना स्वच्छतेविषयी कोण सांगणार? मूल्यवर्धनमध्ये स्वच्छतेविषयी उपक्रम आहेत. जीवनात स्वच्छतेचे काय महत्त्व आहे याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांमध्ये समज निर्माण केली.”  

त्यांनी पुढे सांगितले की मूल्यवर्धनच्या सत्रात विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे दात घासून घ्यायला लावले जाते. त्यांना शाळेच्या परिसरातच अंघोळ करायला देखील शिकवले जाते.

कृष्णा यांनी सांगितले की दहा हजार लोकसंख्येत इथे सहा सरकारी शाळा आणि एक प्रायव्हेट शाळा आहे. पण बहुतांश लोकांना याच शाळेत आपल्या मुलांना प्रवेश द्यायचा आहे. परिस्थिती अशी आहे की दोन किलोमीटरपेक्षा अधिक  अंतरावरूनदेखील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत आहेत. मूल्यवर्धनची आठवड्यातून तीन सत्रे आयोजित केली जातात.

मोकाशी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे मूल्यवर्धनबद्दल झालेल्या चर्चेबद्दल देखील सांगितले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत आणखी काही लोक सहभागी होते. तेव्हा हा प्रश्न समोर आला की अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण अंतर्भूत नाही का? तेव्हा मी त्यांना माझे अनुभव सांगितले. त्यांना म्हणालो की आपला अभ्यासक्रम मूल्यांवर आधारित आहे, पण मूल्यवर्धन आपल्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळे नाही. ते शालेय अभ्यासक्रमाला अत्यंत पूरक आहे.”