जिल्हा मेळावा परभणी: अहवाल

परभणी जिल्हा मूल्यवर्धन मेळावा १७ जानेवारी २०२० : अहवाल

श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. वसमत रोड परभणी.

“मूल्यांचा अभ्यास युपीएससीमध्येही असतो”- बी. पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. परभणी

“यूपीएससीच्या अभ्यासक्रमात, परीक्षेमध्येसुद्धा मूल्यांना म्हणजेच आचारसंहिता, नीतिमूल्ये यांना महत्त्व आहे. मूल्यवर्धन उपक्रम मुलांमध्ये बालपणापासूनच मूल्यांची रुजवणूक व संवर्धन करीत आहे,” असे प्रतिपादन परभणी जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी श्री. बी. पृथ्वीराज यांनी मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याच्या परभणी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

जि. प. शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी शाळांमधून विद्यार्थी जि. प. शाळांमध्ये दाखला होत आहेत, हे सकारात्मक चित्र आहे, अशाप्रकारे श्री. पृथ्वीराज यांनी प्रदर्शनातील पोस्टर्स बघून मुलांचे मनापासून कौतुक केले. तसेच सगळ्यांनी हे प्रदर्शन आवर्जून बघावे असे आवाहन केले.

प्रभातफेरी :

परभणी मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याची सुरुवात सकाळी प्रभातफेरीने झाली. सकाळी ८.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी छत्रपती शिवाजी चौक येथून सुरु होऊन मूल्यवर्धन पोस्टर प्रदर्शनाचे ठिकाण सावित्रीबाई फुले महिला वसतीगृह येथील मैदानावर सांगता झाली.

प्रदर्शनाचे उद्घाटन :

मूल्यवर्धन उपक्रमाशी संबंधित राज्यातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी गाव, जिल्हा, राज्य, देश अगदी जगाला सुंदर, सकारात्मक, भावनिक, सामाजिक संदेश देणारे, विचार करायला भाग पाडणारे पोस्टर्स तयार करून पाठविले होते. त्यांचे भव्य प्रदर्शन परभणी येथील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहाजवळील मैदानावर पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी मा. श्री. भगवान वाघमारे (उपमहापौर, परभणी), मा. श्री. पृथ्वीराज बी. पी. (मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी व प्रभारी जिल्हाधिकारी), मा. श्रीमती सुचिता पाटेकर (जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, परभणी ), मा. श्री. अनिल गौतम (DIECPD प्राचार्य, परभणी), मा. श्रीमती लता कच्छवे (मूल्यवर्धन विभागप्रमुख, DIECPD परभणी), श्री. शांतिलाल मुथ्था (संस्थापक- शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे) मा. श्री. झुंबरलालजी मुथ्था (शांतिलाल मुथ्था फाउंडेशन जिल्हाध्यक्ष, परभणी), मा. श्री. नीरज पारेख (भारतीय जैन संघटना जिल्हाध्यक्ष, परभणी) आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. शांतीलाल मुथ्था, श्रीमती निर्मलाताई विटेकर (जिल्हा परिषद परभणी अध्यक्ष), श्री. पृथ्वीराज बी. पी. (मुख्य कार्यकारी अधिकारी परभणी व प्रभारी जिल्हाधिकारी), श्री झुंबरलालजी मुथ्था (शांतिलाल मुथ्था फाउंडेशन जिल्हाध्यक्ष परभणी), श्री. भगवान वाघमारे (उपमहापौर परभणी), डॉ. सुचेता पाटेकरांचा (जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक परभणी)

 

प्रास्ताविक :

एसएमएफचे संस्थापक श्री. शांतीलाल मुथ्था यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी मूल्यवर्धन या शैक्षणिक क्रांतिकारी कार्यक्रमाचे महत्त्व व आजच्या काळात असलेली गरज नमूद केली.

मान्यवरांचे मनोगत :

मेळाव्यात उपस्थित मान्यवरांचा प्रथम सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांनी एका खर्रा (तंबाखू) खाण्याचे व्यसन लागलेल्या विद्यार्थिनीचे मूल्यवर्धनमुळे व्यसन सुटले, हे उदाहरण देऊन इतर विद्यार्थ्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल आपल्या मनोगतात सांगितले.

 

DIECPD प्राचार्य श्री. अनिल गौतम यांनी जलसाक्षरतेचासुद्धा मूल्यवर्धन उपक्रमात अंतर्भाव करावा, असे सुचविले.

व्हिडीओ क्लिप्सचे सादरीकरण :

परभणी जिल्ह्यातून मूल्यवर्धनशी संबंधित शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून एकूण ६३२ व्हिडीओ क्लिप्सचे संकलन केले होते. त्यापैकी १८ व्हिडीओंची निवड करून ते मेळाव्यात दाखविण्यात आले.

चर्चासत्र :

मूल्यवर्धन उपक्रमांचा परिणाम कशाप्रकारे होत आहे, हे या चर्चासत्रातून स्पष्टपणे दिसून आले. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी सभागृहातील शिक्षकांकडे जाऊन त्यांच्या भावना, प्रतिक्रिया व अपेक्षा तसेच मूल्यवर्धनचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची त्यांना संधी दिली. ज्या शिक्षकांना ही संधी मिळाली, त्यांनी मूल्यवर्धन ही शिक्षणातील एक नवक्रांती आहे, मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे मुलांमध्ये मूल्ये रुजवून त्यांना सुजाण नागरिक व माणूस बनविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशाप्रकारे कार्यक्रमाचे कौतुक केले.

चर्चेमध्ये अनेक शिक्षकांनी मूल्यवर्धन संबंधित हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. ‘जागर मूल्यवर्धनचा’ हे चर्चासत्राचे फलित म्हणता येईल.

मूल्यवर्धन मेळावा निर्धारपत्राचे सामूहिक वाचन :

शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात संपन्न झालेल्या मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्व शिक्षकांनी, मान्यवरांनी स्वतःच्या हृदयावर हात ठेवून मूल्यवर्धन मेळावा निर्धारपत्राचे वाचन केले.

 

आभार प्रदर्शन :

मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज व शिक्षणाधिकारी श्रीमती सुचेता पाटेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये :

  • डॉ. सुचेता पाटेकरांचा मूल्यवर्धन मेळाव्यामध्ये लक्षणीय सक्रिय सहभाग : जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचेता पाटेकर यांनी राज्य शासनाच्या वतीने संपन्न झालेल्या मूल्यवर्धन परभणी जिल्हा मेळाव्यामध्ये लक्षणीय सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी ‘मूल्यशिक्षण’ (Value Education) या विषयामध्येच पीएच.डी. केलेली आहे. परभणी जिल्हा मूल्यवर्धन मेळाव्याच्या संपूर्ण कार्यक्रमात प्रातःकाळी विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीसोबत छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते मूल्यवर्धन पोस्टर प्रदर्शनाचे ठिकाण सावित्रीबाई फुले महिला वसतीगृह शेजारील मोकळे मैदान एवढे २.५ कि.मी. अंतर चालून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या पत्रकार परिषदेलाही त्या उपस्थित होत्या.
  • मूल्यवर्धनमुळे शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे चित्र राज्यभरातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन तयार केलेल्या भित्तीपत्रकांच्या भव्य प्रदर्शनातून ‘याची देही, याची डोळा’ दिसत होते.
  • सर्व उपस्थित शिक्षकांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला.
  • श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांना बोलण्याची संधी दिली. जवळपास सर्वच शिक्षकांनी मूल्यवर्धनची आवश्यकता व त्याचा प्रभाव या बाबी पटवून दिल्या.
  • दुपारी १.३० वाजता परभणी शहरातील सर्व पत्रकारांना मेळाव्याच्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विविध प्रश्न विचारून यासंबंधी माहिती जाणून घेतली व संपूर्ण कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफच्या सर्व टीमने हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • मूल्यवर्धनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारत देशाचा कर्तव्यशील, जबाबदार नागरिक बनविण्याचा निर्धार उपस्थित सर्व शिक्षकांनी केला.