जिल्हा मेळावा नांदेड: अहवाल

नांदेड जिल्हा मूल्यवर्धन मेळावा ९ जानेवारी २०२० : अहवाल

स्थळ :-  . के. संभाजी मंगल कार्यालय, नांदेड.

साडेतीनशे वर्षांपासून संतांनी दिलेला मूल्यशिक्षणाचा वारसा मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे पुन: सुरू झाला आहे!

‘हाताची घडी तोंडावर बोट’ हाताची घडी तोंडावर बोट’ या पारंपरिक शिक्षण पद्धतीची नव्हे, तर विद्यार्थी केंद्रित मूल्यवर्धन उपक्रमाधिष्ठीत शिक्षण पद्धतीची आज गरज

माजी राज्य शिक्षण संचालक, श्री. गोविंद नांदेडे

हाताची घडी तोंडावर बोट या पारंपरिक दमन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही, तर मूल्यवर्धन या विद्यार्थीकेंद्रित ज्ञानरचनावादावर आधारित असलेल्या मूल्यवर्धन  उपक्रमामुळे आज विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होताना दिसत आहे. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासू, चुणचुणीत होत आहेत. त्यांची कल्पनाशक्ती वाढीस लागत आहे. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे होणारा सकारात्मक बदल दृश्य आहे. सर्व संतांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जी मूल्ये सांगितली, ती आज मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे रुजविली जात आहेत, असे मनोगत माजी राज्य शिक्षण संचालक, श्री. गोविंद नांदेडे यांनी नांदेड येथील राज्य शासनाच्या वतीने राबवल्या जात असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या मेळाव्यात व्यक्त केले.

मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करणारी चित्रफीत सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांना दाखवण्यात आली. त्यानंतर एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मान्यवरांचे मनोगत

 

कार्यक्रमात डायट प्राचार्या जयश्री आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मूल्यवर्धन कार्यक्रमाचे व  शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे कौतुक केले. मूल्यवर्धनचा दृश्य परिणाम सांगताना प्राचार्या आठवले यांनी सांगितले की, मूल्यवर्धन उपक्रमामुळे शालेय परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे. मूल्यवर्धन उपक्रमांचा मुलांमध्ये झालेला दृश्य परिणाम विशद करताना प्राचार्या म्हणाल्या की, उपक्रमामुळे विद्यार्थी धीट व आत्मविश्वासू होत आहेत. अनोळखी समुदायासमोर, व्यासपीठावर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी भिडस्त न राहता आत्मविश्वासाने भाषण तसेच सूत्रसंचालन करतात.

 

जि. प. नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनीही बोलताना मूल्यवर्धन कार्यक्रमाचे आणि संबंधित चमूचे कौतुक केले.

 

नांदेड महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. दिलीप बनसोडे हे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मुलं ही किरणोत्सारी पदार्थांप्रमाणे असतात. त्यांच्यातून ऊर्जेचे सतत उत्सर्जन होत असते. मूल्यवर्धन कार्यक्रम मुलांच्या उर्जेला विधायक वळण देत आहे.

 

नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री. प्रशांत दिग्रसकर यांनी राज्यभरातील शासकीय शाळांतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून तयार केलेले पोस्टर्सच्या (भित्तीपत्रिका) प्रदर्शनाचे मनापासून कौतुक केले. हे प्रदर्शन शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने तसेच इतर सगळ्यांनीच बघणे अत्यंत आवश्यक आहे. या पोस्टर्समधून त्यांना एखादा विलक्षण विचार मिळून तो ते आपल्या शाळेत राबवू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले .

पुढे श्री. दिग्रसकर यांनी मूल्यवर्धनचे महत्त्व सांगताना मराठीतील प्रसिद्ध कवितेचे उदाहरण दिले, “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” यांतील एका बदकाला ‘स्व’ची जाणीव होणे, म्हणजे तो बदक नसून राजहंस आहे. याचाच अर्थ असा की, त्याला स्वतःतील मूल्यांची जाणीव होणे हेच होय.

डावीकडून डायट प्राचार्या मा. जयश्री आठवले, SMF CEO श्री. वेंकटरमण, शिक्षणाधिकारी मा.श्री. प्रशांत दिग्रसकर, मनपा शिक्षणाधिकारी मा. श्री. दिलीप बनसोडे, श्री. शांतीलालजी मुथ्था, पूर्व राज्य शिक्षण संचालक मा. श्री. गोविंद नांदेडे, मा. आ. ओमप्रकाशजी पोकरणा, श्री. हस्तीमलजी बंब.

प्रेक्षकांसमवेत

शिक्षकांनी बनविलेल्या व्हिडिओ क्लिप्सचे सादरीकरण :

 

मूल्यवर्धनच्या शिक्षकांनी तयार केलेल्या क्लिप्सपैकी १८ चित्रफितींचे सादरीकरण उपस्थित मान्यवरांसमोर करण्यात आले. प्रत्येक चित्रफितीला संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाने दाद मिळत होती.

याशिवाय शिक्षणाधिकारी श्री. प्रशांत दिग्रसकर यांनी कार्यक्रमात दाखवलेल्या सर्व मूल्यवर्धन चित्रफितींचे सुरेख, अचूक निरीक्षण व विश्लेषण केले.

चर्चासत्र

 

व्यासपीठावर शिक्षण तसेच मूल्यवर्धन कार्यक्रमासंबंधित मान्यवर व एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांच्या समवेत चर्चासत्र रंगले. मूल्यवर्धन उपक्रमांचा कशाप्रकारे परिणाम होत आहे हे या चर्चासत्रातून स्पष्टपणे दिसून आले. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी माईक घेऊन सभागृहात प्रत्येक शिक्षकाकडे जाऊन त्यांच्या भावना, प्रतिक्रिया व अपेक्षा तसेच मूल्यवर्धनचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी त्यांना दिली. ज्या शिक्षकांना ही संधी मिळाली, त्यांनी हीच शिक्षणातील एक नवी क्रांती आहे, मूल्यवर्धन उपक्रम मुलांमध्ये मूल्ये रुजवून त्यांना योग्य नागरिक व माणूस बनविण्याचा प्रयत्न करत आहे, अशाप्रकारे कौतुक केले.

कार्यक्रमाचा समारोप

 

पूर्व राज्य शिक्षण संचालक मा. श्री गोविंद नांदेडे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना उपस्थित असलेल्या संपूर्ण मान्यवरांना आपल्या अस्खलित भाषणाने, वाणीने मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपल्या संपूर्ण मनोगतात आणि समारोपात मूल्यवर्धन उपक्रमाचे आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व त्यांच्या शिक्षणासंबंधित अतुलनीय कार्याचे मनापासून कौतुक केले.

श्री. गोविंद नांदेडे यांनी एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांची तुलना अमेरिकेतील प्रसिद्ध शिक्षण मानसोपचारतज्ज्ञ व शास्त्रज्ञ बेंजामिन ब्लूम यांच्याशी करत असताना ते म्हणाले की, या प्रसिद्ध अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञाने शिक्षण क्षेत्रात जे कार्य केले तसेच कार्य आज श्री. शांतिलाल मुथ्था करीत आहेत. पुढे ते मूल्यवर्धन कार्यक्रमाचे कौतुक करताना आणि त्याचे महत्त्व सांगताना म्हणाले की, शिक्षण हा जर सूर्य असेल तर मूल्यवर्धन त्याचा प्रकाश आहे, शिक्षण मानव असेल तर मूल्यवर्धन त्याचा आत्मा आहे. त्यानंतर गोविंद नांदेडे यांनी शिक्षकवृंदांना आत्मचिंतन करायला भाग पाडणाऱ्या एका मुद्द्याला हात घातला. ते म्हणाले की, दैनंदिन समाजात जे दुष्कर्म घडतेय, त्या दोषी व्यक्तींच्या शिक्षकांनी स्वतःला प्रश्न विचारावा की त्यांना शिकविण्यात, मूल्ये रुजविण्यात आपण कुठे कमी पडलो. समाजातील सर्व नकारात्मक घटनांवर उपाय हा की किमान पुढील पिढीचे मूल्यवर्धन करावे लागेल. मूल्यवर्धन हा उपक्रम फक्त राज्यातील ७ लक्ष शिक्षकांचाच नाही, तर २ कोटी विद्यार्थ्यांचा आणि ५ कोटी पालकांचा आहे.

अशा रीतीने श्री. गोविंद नांदेडे यांनी नांदेड येथील कार्यक्रमाचा समारोप केला.

मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये

  • ज्यांच्यामुळे मूल्यवर्धन उपक्रमाच्या अभ्यासक्रमाला उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उर्दू भाषेमध्ये भाषांतरित करण्याची प्रेरणा एसएमएफला मिळाली ते श्री.अब्दुल मलिक निजामी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
  • राज्यभरातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यवर्धनमुळे शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे चित्रच या भव्य प्रदर्शनातील भित्तीपत्रिकांच्या माध्यमातून संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
  • सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून होता.
  • नांदेड जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी चर्चासत्राच्यावेळी मंचावर उपस्थित होते. सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचत आहे व त्याचा मोठा परिणाम विद्यार्थी व पालकांमध्ये दिसून येत आहे, असे मत व्यक्त केले तसेच मूल्यवर्धनच्या समग्र शाळा दृष्टिकोन (होल स्कूल अप्रोच) या संकल्पनेचा उपयोग होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • शांतिलाल मुथ्था यांनी स्टेजवरून खाली उतरून बसलेल्या शिक्षकांमध्ये शेवटपर्यंत जाऊन सर्वसामान्य शिक्षकांना बोलण्याची संधी दिली. प्रत्येक वेळी अनेक शिक्षक हात वर करून त्यांच्या भावना व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त करीत होते. जवळपास सर्वच शिक्षकांनी मूल्यवर्धनची आवश्यकता व महत्त्व पटवून दिले व त्यांना या कार्यक्रमाचा जाणवलेला प्रभाव कथन केला.
  • दुपारी २.३० वाजता नांदेड शहरातील सर्व पत्रकार बंधूना प्रदर्शनाच्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. सर्व पत्रकारांनी भव्य प्रदर्शनाची पाहणी करून मूल्यवर्धनची माहिती करून घेतली व अतिशय सकारात्मक प्रश्न विचारले. या संपूर्ण चाललेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफच्या सर्व टीमने हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • एसएमएफचे मुख्य प्रशिक्षक (MT) व तालुका समन्वयक (TC) यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • सर्व शिक्षकांनी मिळून मूल्यवर्धनच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी भारत देशाचा कर्तव्यतत्पर आणि जबाबदार नागरिक घडविण्याचा निर्धार केला.