जिल्हा मेळावा औरंगाबाद: अहवाल

औरंगाबाद जिल्हा मूल्यवर्धन मेळावा अहवाल : ७ जानेवारी २०२०

स्थळ : तापडिया नाट्यगृह, औरंगाबाद
घटनात्मक मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक करून देशाचा जबाबदार नागरिक बनविण्याचा
औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांचा निर्धार

मूल्यवर्धनच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन :

 

महाराष्ट्रामध्ये गेल्या ४ वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने मूल्यवर्धन कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमामधून  घटनात्मक मूल्ये विद्यार्थांमध्ये सुनियोजित पध्दतीने, ज्ञानरचनावादाचा उपयोग करून, बालस्नेही वातावरणात रूजविण्याचे काम सातत्याने सुरु आहे.

 

महाराष्ट्रातील शासकीय शिक्षक व विद्यार्थी यांनी तयार केलेल्या ४५०० पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात माजी विधानसभा सभापती मा. श्री. हरिभाऊजी बागडे यांच्या शुभहस्ते ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी मा. श्री. उदयजी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवनीतजी कौर, DIECPD प्राचार्य मा. डॉ. कलिमोद्दिन शेख, शिक्षणाधिकारी श्री. सूरजप्रसाद जैस्वाल, नोडल अधिकारी श्रीमती सोनाली बारहाते , शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, जिल्हाप्रमुख ॲड. गौतमचंद संचेती व इतर मान्यवर उपस्थित होते. सकाळी ९.३० वाजता मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मा. आमदार श्री. हरिभाऊ बागडे. मा. श्री. उदय चौधरी (जिल्हाधिकारी, औरंगाबाद) मा. श्रीमती पवनित कौर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद) श्री. शांतिलाल मुथ्था (संस्थापक अध्यक्ष, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे) व श्री. गौतम संचेती (जिल्हाध्यक्ष, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन) तसेच इतर मान्यवर व विविध शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.

 

मूल्यवर्धन जिल्हा मेळावा :

 

तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद या ठिकाणी सकाळी १० वाजता जिल्हा मेळाव्याचेही उद्घाटन या सर्व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत करण्यात आले. औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. नंदकुमार घोडेले हेही यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील ११ तालुक्यांतून ५०८१ शिक्षकांना आतापर्यंत मूल्यवर्धनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील १,६६,००० विद्यार्थी मूल्यवर्धनमधील उपक्रमांचा आनंद घेत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्ह्यातील ३१८ शाळांनी आपापल्या शाळांमध्ये मूल्यवर्धन किती प्रभावीपणे सुरु आहे याच्या २-२ मिनिटांच्या व्हिडिओ क्लिप्स तयार करून पाठविल्या आहेत. या सर्व क्लिप्स एकाच वेळी दाखविता येणे शक्य नसल्यामुळे प्रातिनिधिक स्वरुपात निवडक १८ व्हिडिओ क्लिप्स या मेळाव्यात दाखविण्यात आल्या. याप्रसंगी औरंगाबाद जिल्ह्यातील निवडक शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मूल्यवर्धनचे समन्वयक (नोडल अधिकारी) अधिकारी हे मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते. मूल्यवर्धन यशस्वी करण्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक हे अथक परिश्रम करून शाळांना नवी संजीवनी देण्यात यशस्वी झाले आहेत, हे सिद्ध होत आहे. या सर्व व्हिडिओ क्लिप्स विद्यार्थी व शिक्षकांनी स्वेच्छेने  तयार केल्या असून औरंगाबाद जिल्ह्यातील पुढील पिढी कशी असेल याची चुणूक यातून दिसून येते.

 

मूल्यवर्धन हा कार्यक्रम कशापद्धतीने प्रभावी होत आहे, याची माहिती देताना जिल्हाधिकारी मा. श्री. उदयजी चौधरी यांनी अनेक उदाहरणे देऊन जिल्हा परिषद शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा .डॉ. पवनीतजी कौर यांनीसुद्धा मूल्यवर्धन प्रदर्शन उत्कृष्ट आहे, असा अभिप्राय देऊन ते पाहण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी शाळा, सरकारी शाळा व सर्व लोकांनी यावे अशाप्रकारच्या सूचना मंचावरून दिल्या. याप्रसंगी मूल्यवर्धनचा माहितीपट दाखविण्यात आला. शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण कसे हसत-खेळत दिले जाते व त्यामुळे शिक्षकांमध्ये कशाप्रकारे लक्षणीय बदल होत आहेत, याची झलक त्यातून पाहायला मिळाली.

दीपप्रज्वलन प्रसंगी मा. श्रीमती पवनीत कौर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)

 

श्री श्रीकांत कुलकर्णी (शिक्षणाधिकारी)

मा. श्री. उदय चौधरी (जिल्हाधिकारी, औरंगाबाद)

 

मा. श्री. नंदकुमार घोडेले (महापौर, औरंगाबाद), मा. श्री. उदय चौधरी (जिल्हाधिकारी, औरंगाबाद), मा. श्रीमती पवनीत कौर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद), श्री. श्रीकांत कुलकर्णी (शिक्षणाधिकारी), सिद्धेश वाडकर (औरंगाबाद विद्या प्राधिकरण SCERT), श्री. शांतिलाल मुथ्था (संस्थापक अध्यक्ष, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे) व श्री गौतम संचेती (जिल्हाध्यक्ष शांतिलाल मुथ्था फाउंडेशन) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन संपन्न झाले.

 

‘मी आणि मूल्यवर्धन’  पुस्तकाचे प्रकाशन :

 

महाराष्ट्रातील १३५० शिक्षकांनी मूल्यवर्धन संदर्भातील त्यांचे अनुभव स्वेच्छेने एसएमएफच्या कार्यालयात पाठविले होते. या अनुभवांचे विश्लेषण आणि संकलन करून ‘मी आणि मूल्यवर्धन’ हे पुस्तक संपादित करण्यात आले आहे. यातून भावी पिढी घडविण्यासाठी सर्व शिक्षक कशाप्रकारे सहभागी आणि उत्सुक आहेत, याचे दर्शन घडते. या पुस्तकाचे प्रकाशन मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘मी आणि मूल्यवर्धन’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मा. श्रीमती पवनीत कौर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद), श्री. शांतिलाल मुथ्था (संस्थापक- अध्यक्ष, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे), मा.श्री. उदय चौधरी (जिल्हाधिकारी, औरंगाबाद), श्री गौतम संचेती (जिल्हाध्यक्ष शांतिलाल मुथ्था फाउंडेशन), श्री. श्रीकांत कुलकर्णी (शिक्षणाधिकारी मनपा), श्री. सिद्धेश वाडकर (औरंगाबाद विद्या प्राधिकरण SCERT)

 

चर्चासत्र :

 

उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्याच ठिकाणी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महानगरपालिकेचे मा. शिक्षणाधिकारी श्री. श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी श्री. काझी, गटशिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण, श्री. अनिलकुमार सकदेव, श्री. केवट, श्री. मनीष दिवेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. रमेश ठाकूर, श्री. राजेश महाजन, श्रीमती विद्या दीक्षित, श्रीमती मनीषा वाशिंदे, श्री. अनिस पुदाट, श्री. फुके, जिल्हा समन्वयक(नोडल अधिकारी) श्रीमती सोनाली बारहाते, श्री. सिद्धेश वाडकर व एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था आदी मान्यवरांनी या चर्चासत्रात भाग घेतला. मूल्यवर्धनमुळे शाळा आणि शिक्षक यांच्यावर कशापद्धतीने  परिणाम होत आहेत, हे या चर्चासत्रात प्रत्येकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पटवून देण्याचा प्रयत्न केला. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी माईक घेऊन सभागृहात प्रत्येक शिक्षकाकडे जाऊन त्यांच्या भावना, प्रतिक्रिया, अपेक्षा, मूल्यवर्धनचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी त्यांना दिली. ज्या काही शिक्षकांना ही संधी मिळाली. त्यांनी हीच शिक्षणातील एक नवी क्रांती आहे, असे मत व्यक्त केले. मूल्यवर्धन फक्त १ली ते पाचवीपर्यंतच न ठेवता कार्यक्रमाचा विस्तार इयत्ता  १०वी करून त्याला आणखी जास्त बळकटी द्यावी, अशा आशयाच्या विविध सूचना करून मूल्यवर्धन भविष्यात निरंतरपणे चालू ठेवण्याचा सर्व उपस्थितांनी निर्धार केला. सर्वच शिक्षक, शिक्षणाधिकारी व DIECPD च्या टीमला मूल्यवर्धन हा देशव्यापी कार्यक्रम व्हावा, असे वाटत आहे. हाच धागा पकडून या देशात नवी क्रांती सुरु झाली आहे, अशा प्रतिक्रिया सर्वांकडून येत आहेत. या भरगच्च कार्यक्रमामुळे व शिक्षकांच्या उत्साहामुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्रात एका सकारात्मक भावनेचा उदय झाल्याचे जाणवते. सध्याच्या परिस्थितीत रोज बाहेर घडणाऱ्या हिंसक घटना, परीक्षेच्या स्पर्धेत मानसिक तणावात असणारे विद्यार्थी यातून बाहेर निघून मूल्यांवर आधारित पिढी तयार करण्याचा संकल्प सर्वांच्या अभिप्रायातून जाणवला .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, DIECPD ची टीम यांनी अविरत प्रयत्न केले. तसेच एसएमएफचे जिल्हाप्रमुख श्री. गौतम संचेती, श्री. प्रवीणजी पारख, श्री.पारसजी जैन, श्री. किशोर ललवाणी, श्री.पारसजी चोरडिया व त्यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेतली. तसेच एसएमएफचे मास्टर ट्रेनर्स व तालुका समन्वयक यांचेही अनमोल सहकार्य यासाठी लाभले. श्री. पारसजी बागरेचा यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रदर्शन सर्वांसाठी खुले :

 

जिल्हा परिषदेच्या मैदानावर संपन्न झालेले मूल्यवर्धनचे सुरु असलेले पोस्टर प्रदर्शन तीन दिवस(दिनांक ७ ते ९ जानेवारी २०२०) जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. सर्वांना आवाहन करण्यात आले होते की. यावेळी की या प्रदर्शनास भेट देऊन महाराष्ट्रातील शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवावे. मूल्यवर्धन मेळावे हे समारंभाचा भाग (Event ) नसून एक चळवळ (Movement) आहे. आता ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहील, अशी खात्री सर्वांना वाटते.

दिवसभराच्या मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये:

 

  • ४५०० शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यवर्धनवर आधारित शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे मूर्त स्वरूपच जणू या भव्य प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांसमोर उभे राहिले.
  • सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
  • अनेक शिक्षकांनी उभे राहून इयत्ता दहावीपर्यंत मूल्यवर्धन कार्यक्रमाचा विस्तार लवकरात लवकर करावा, अशी मागणी केली.
  • मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या औरंगाबाद जिल्हा समन्वयक (नोडल अधिकारी) अधिकारी श्रीमती बारहाते यांनी  शिक्षक मूल्यवर्धनचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत असल्याचे नमूद केले. त्यांनी सर्व शिक्षकांना असे आवाहन केले की शिक्षकांनी मूल्यवर्धनच्या विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेबरोबरच  इतर दोन पुस्तिका म्हणजे शिक्षक उपक्रम व शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका यांचेसुद्धा चांगले अवलोकन व वापर करावा. त्यामुळे या मूल्यवर्धन संकल्पना व उपक्रमाच्या मूळ अपेक्षा सर्व शिक्षकांना पूर्णपणे समजतील व मूल्यवर्धन उपक्रम अधिक परिणामकारक ठरतील.
  • मी आणि मूल्यवर्धन’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मा. जिल्हाधिकारी यांनी त्यातील एक यशस्वी अनुभव सर्वांसमोर सादर केला.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी चर्चासत्राच्या वेळी मंचावर उपस्थित होते. सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचत आहे व त्याचा मोठा परिणाम विद्यार्थी व पालकांमध्ये दिसून येत आहे, असा अभिप्राय व्यक्त केला. मूल्यवर्धनचा समग्र शाळा दृष्टीकोन (होल स्कूल अप्रोच) या संकल्पनेतून शाळेचे वातावरण मूल्ये रुजण्यासाठी पूरक होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • श्री. शांतिलाल मुथ्था यांनी स्टेजवरून खाली उतरून बसलेल्या शिक्षकांमध्ये शेवटपर्यंत जाऊन शिक्षकांना बोलण्याची संधी दिली. प्रत्येकवेळी अनेक शिक्षक हात वर करून आपल्या भावना व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त करीत होते. जवळजवळ २५-३० शिक्षकांनी मूल्यवर्धनचा प्रभाव आणि परिणाम सांगून या कार्यक्रमाची आवश्यकता स्पष्ट केली .
  • जिल्हाधिकारी मा. श्री. उदयजी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. पवनीतजी कौर, DIECPD प्राचार्य मा. डॉ. कलीमोद्दिन शेख, शिक्षणाधिकारी श्री. सूरजप्रसाद जैस्वाल, मा. शिक्षणाधिकारी (मनपा) श्री. श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी श्री. काझी, गटशिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण, श्री. अनिलकुमार सकदेव, श्री. केवट, श्री. मनीषजी दिवेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, श्री. रमेश ठाकूर, श्री. राजेश महाजन, श्रीमती विद्या दीक्षित, श्रीमती मनीषा वाशिंदे, श्री. अनिस पुदाट, श्री. फुके, जिल्हा समन्वयक (नोडल अधिकारी) श्रीमती सोनाली बारहाते या सर्वांनी सक्रिय सहभाग दिला व अनमोल सहकार्य केले.
  • दुपारी ४.०० वाजता औरंगाबाद शहरातील ५० पेक्षा अधिक पत्रकारांनी प्रदर्शनाची पाहणी करून मूल्यवर्धनची माहिती घेतली व अतिशय सकारात्मक प्रश्न विचारले. या संपूर्ण चाललेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफमधील सर्व टीम्सनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • एसएमएफचे प्रशिक्षक व तालुका समन्वयक यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • सर्व शिक्षकांनी मिळून शाळेतील विद्यार्थी उद्याचे जागरूक आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी निर्धार केला.