एका नियमाने बदलले चित्र. आता विद्यार्थी म्हणतात- ‘वेळेवर शाळेला चाललो आम्ही!’

शाळेतील विद्यार्थ्यांना गोष्ट आवडणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु, काही गोष्टी विद्यार्थ्यांना इतक्या प्रभावित करू शकतात का, की ते अशा गोष्टींपासून निष्कर्ष काढून त्यांना आपल्या रोजच्या वेळापत्रकाचा भाग बनविण्यासाठी एकत्र येऊन नियम बनवतील?

कोल्हापूर शहरात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर या शाळेत अशीच एक घटना घडलेली आहे. येथील विद्यार्थ्यांवर मूल्यवर्धनच्या गोष्टींचा एवढा प्रभाव पडला की त्यांनी स्वतःसाठी एक नियम बनवला. हा नियम आहे ‘वेळेवर शाळेत पोहोचण्याचा’. यासाठी विद्यार्थ्यांनी एक घोषणादेखील बनवली आहे, ‘वेळेवर  शाळेला चाललो आम्ही!’ विद्यार्थी आपल्या नियम आणि घोषणेचे चांगल्याप्रकारे पालन करून शाळेची नवी ओळख निर्माण करत आहेत.

या शाळेतील शिक्षक विठ्ठल देवणे सांगतात की सहा महिन्यांपूर्वी परिस्थिती अगदी वेगळी होती. त्यांच्या समोरील सर्वात मोठी समस्या होती की बरेच विद्यार्थी वेळेवर शाळेत येत नव्हते.

यामागील काही कारणे त्यांनी सांगितली : “कदमवाडी वस्तीतील बहुतांश कुटुंबे कामगारांची आहेत. याच कामगारांची मुले आमच्या शाळेत शिकण्यासाठी येतात. आम्ही माहिती काढली तेव्हा कळाले की त्यांच्या अनेक घरघुती समस्या आहेत. त्यामुळे मुले वेळेवर शाळेत पोहचू शकत नाहीत.”

१९७२ मध्ये स्थापन झालेल्या या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत एकूण ९२ विद्यार्थी शिकतात. यात मुले आणि मुलींची संख्या समान  आहे. शाळेत एकूण ४ शिक्षक आहेत. त्या सर्वांनी ऑगस्ट २०१८ मध्ये कोल्हापूर येथे मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले.

त्यातील एक शिक्षक विनोद कोठावले सांगतात,

“मूल्यवर्धन मधील अनेक गोष्टींमध्ये वेळ आणि शिस्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. पण, आमच्या लक्षात आले की विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी गोष्ट फक्त वाचून सांगणे पुरेसे नाही. मूल्यवर्धन यापुढे जाऊन विद्यार्थ्यांना गोष्टीच्या माध्यमातून विविध उपक्रमांत सहभागी करून घेते.”

विनोद यांच्या मताशी सहमती दर्शवित दुसऱ्या शिक्षिका प्रतिभा चौगुले म्हणतात, “मूल्यवर्धनच्या वर्गांमध्ये विशेषतः चौथीच्या विद्यार्थ्यांनी वेळेच्या महत्त्वाशी जोडलेल्या अनेक गोष्टींवर चर्चा केली. शिवाय त्यांनी वर्ग आणि शाळेच्या नियमांशी संबंधित उपक्रमांमध्ये भाग घेतला. यामध्ये त्यांनी पहिले स्वतः मग जोडीदारासोबत आणि शेवटी सर्व वर्गासोबत मिळून विचार करणे सुरु केले. या पूर्ण अभ्यासात आम्ही बघितले की त्यांचे स्वतःचे मत देखील बदलत गेले. यात चांगली गोष्ट अशी आहे की त्यांना मिळून एका निर्णयापर्यंत पोहचायचे असते. यामुळे विद्यार्थ्यांना वाटते की हा त्यांचा निर्णय आहे आणि ते मिळून त्यांच्या निर्णयाचे पालन करतात.”

विद्यार्थ्यांच्या वेळेवर शाळेत पोहचण्याच्या समस्येबद्दल बोलताना विठ्ठल यांनी पुढे सांगितले की विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या सहयोगाशिवाय हे काम कठीण होते. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या कुटुंबियांना देखील भेटले आणि त्यांना सांगितले की मुलांनीच हा नियम आणि घोषणा तयार केले आहेत. शिक्षकांच्या या प्रयत्नाचा विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवर सकारात्मक प्रभाव पडला.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी पूर्ण दिवसाचे वेळापत्रक बनवले आहे. यासाठी त्यांनी मूल्यवर्धनच्या ‘माझे दैनंदिन वेळापत्रक’ या तक्त्याची मदत घेतली. तसेच, काही विद्यार्थ्यांनी आपले जुने वेळापत्रक बदलून नवीन वेळापत्रक बनवले.

चौथीमधील उत्कर्षा शोडगे सांगते की काही मोठी मुले आपल्यापेक्षा लहान मुलांना शाळेत येण्यासाठी मदत करतात. याच वर्गातील निकिता गायकवाड ‘यशाचे रहस्य’ गोष्टीपासून प्रभावित झाली आहे. ती म्हणते, “ही गोष्ट वाचून वाटले की एखादी गोष्ट मिळवायची असेल तर तिला मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी वेळेचे पालन करावे लागेल.”

मूल्यवर्धनमधील गोष्टींबद्दल बोलताना चौथीची अश्विनी हदीमनी सांगते की ‘आळशाचे स्वप्न’ गोष्टींतून तिला लक्ष्य प्राप्त करण्याबद्दल कळाले. याच वर्गातील आयुष्य समुद्रेने सांगितले की मूल्यवर्धनच्या वर्गात विद्यार्थ्यांनी फक्त वर्ग आणि शाळेचेच नियम बनविले नाहीत तर त्यासोबतच वाहतूक नियमदेखील समजून घेतले. येथील विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी ‘पिताजी हमे जरुरत है’ अशी घोषणादेखील बनवली आहे.

प्रतिभा चौगुले यांनी सांगितले की त्या आठवड्यातून दोन दिवस मूल्यवर्धनचे सत्र आयोजित करतात. परंतु विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव बरेचदा तीन किंवा चार सत्रेदेखील आयोजित करावी लागतात.

पुढील नियोजनाविषयी प्रश्न विचारल्यावर विनोद कोठावले यांनी सांगितले की ते विद्यार्थ्यांमधील परिवर्तनामुळे आलेल्या या सवयीला टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.