जिल्हा मेळावा उस्मानाबाद: अहवाल

उस्मानाबाद जिल्हा मूल्यवर्धन मेळावा १८ जानेवारी २०२० : अहवाल

स्थळ:- यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद , उस्मानाबाद
जीवन, समाज, अभ्यासक्रम व विद्यार्थी यांना एका माळेत ओवणारा हा मूल्यवर्धन कार्यक्रम आहे : DIECPD प्राचार्य श्री. आय. पी. नदाफ (उस्मानाबाद)

मूल्यवर्धन आजच्या काळाची गरज आहे. येत्या काळात मूल्यवर्धनचे महत्त्व सगळ्यांना समजेल, असे DIECPD प्राचार्य श्री. आय. पी. नदाफ यांनी दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या उस्मानाबाद मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात आपले मत व्यक्त केले.

प्रभातफेरी :

मूल्यवर्धन जिल्हा मेळावा कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभातफेरीने झाली.

प्रदर्शन उद्घाटन मेळावा प्रारंभ :

 

राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर मूल्यवर्धन जिल्हा मेळावे घेण्यात आले. दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे मूल्यवर्धन जिल्हा मेळावा संपन्न झाला. मूल्यवर्धन कार्यक्रम प्राथमिक शालेय शिक्षणात क्रांतिकारक ठरत आहे, हे उस्मानाबाद येथेही स्पष्टपणे दिसून आले. मूल्यवर्धन कार्यक्रमाशी संबंधित संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर्स सामाजिक, वैयक्तिक जाणिवा तरल करणारी व जाणीवेच्या कक्षा रुंदवणारी आहेत. या पोस्टर्सचे प्रदर्शन उस्मानाबाद येथील  जि. प. माध्यमिक कन्या प्रशालेच्या मैदानावर भरले.

उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मूल्यवर्धन मेळाव्याला प्रारंभ झाला.

मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याला आमदार श्री. कैलास पाटील, आमदार श्री. राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, अ‍ॅडिशनल सीईओ श्री. अनुप शेंगुलवार, DIECPD प्राचार्य श्री. आय. पी. नदाफ, शिक्षणाधिकारी श्री. गजानन सुसर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार, जि. प. अध्यक्षा श्रीमती अस्मिता कांबळे, जि. प. उपाध्यक्ष श्री. धनंजय सावंत, मा. नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर, एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, एसएमएफ अध्यक्ष अ‍ॅड. कांचनमाला संघवे, शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे ज्येष्ठ अधिकारी,  वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक श्री. साळुंखे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक :

एसएमएफचे संस्थापक श्री. शांतीलाल मुथ्था यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मूल्यवर्धनची आजच्या काळातील आवश्यकता व त्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.

मान्यवरांचे मनोगत :

मा. श्री. अनुप शेंगुलवार (अ‍ॅडिशनल सीईओ) यांनी शिक्षकांना मोलाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा, अभ्यासात कमी-जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला तर तेही उच्च स्थान प्राप्त करू शकतात, असे ते म्हणाले.

व्हिडीओ क्लिप्सचे सादरीकरण :

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील मूल्यवर्धन उपक्रमासंदर्भात शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी एकूण ३०० व्हिडीओ क्लिप्स तयार करून पाठविल्या. त्यापैकी निवडक १८ व्हिडीओ क्लिप्स सभागृहातील उपस्थितांना दाखविण्यात आल्या.

चर्चासत्र:

मूल्यवर्धन जिल्हा मेळावा कार्यक्रमाचा प्रमुख भाग म्हणजे शिक्षकांशी संवाद साधलेले चर्चासत्र असते. यामध्ये शिक्षकांनी आपले मनाचा ठाव घेणारे अनुभव कथन केले. तसेच काही सकारात्मक सूचनाही केल्या. चर्चा करताना सर्व शिक्षकांचा उत्साह दिसून येत होता.

आभार प्रदर्शन :

श्री. इरफान इनामदार यांनी मूल्यवर्धनचा उद्देश सांगितला. तसेच पोस्टर्स प्रदर्शन बघण्याचे आवाहन करुन आभार प्रदर्शन केले.

मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये :

  • राज्यभरातील शाळा व विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे चित्र मूल्यवर्धनवर आधारित भव्य प्रदर्शनातील भित्तीपत्रकांतून दिसून येत होते.
  • सर्व उपस्थित शिक्षकांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्साह दिसून आला.
  • श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांना बोलण्याची संधी दिली. जवळपास सर्वच शिक्षकांनी मूल्यवर्धनचा प्रभाव व त्याची आवश्यकता यांचे महत्त्व पटवून दिले.
  • उस्मानाबाद शहरातील पत्रकारांनी विविध प्रश्न विचारून मूल्यवर्धनची माहिती घेतली व संपूर्ण कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफच्या सर्व टीमने हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • मूल्यवर्धनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारत देशाचे कर्तव्यशील, जबाबदार नागरिक बनविण्याचा निर्धार सर्व शिक्षकांनी केला.