इंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच्या स्पर्धेमुळे फायदा की तोटा?

शाळेत प्रवेश केला आणि आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतच आलो आहोत ना अशी शंका क्षणभर मनात आली. सर्व मुले टापटीप गणवेशात होती. शर्ट, मोठी पँट, कोट, टाय, सॉक्स आणि बूट असा सारा थाट होता. सर्वच मुले नीटनेटका पोशाख परिधान केलेली होती. मुले व मुली दोघांनाही सारखाच पोशाख होता. सर्व मुले हाताची घडी घालून बाकांवर बसली होती. दोन शिक्षिका स्वागत करण्यासाठी पुढे आल्या.

वर्तुळात बसून विद्यार्थ्यांशी चर्चा करताना शिक्षिका

वर्तुळात बसून विद्यार्थ्यांशी चर्चा करताना शिक्षिका

ही आहे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा इ. १ ली ते ५ वी चे वर्ग आणि २ शिक्षकांची शाळा. इ. १ ते ३ चा एक वर्ग व इ. ४ व ५ चा एक असे वर्ग आहेत.  इयत्ता ४ थी व ५ वीच्या शिक्षिका या मूल्यवर्धनच्या प्रेरक शिक्षिका आहेत. ही शाळा असलेले गाव शहराच्या मुख्य रस्त्याला लागूनच वसलेले आहे. गावाजवळच एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. गावातील बरीच मुले त्या शाळेकडे वळू लागली आहेत अशी माहिती देताना शिक्षिका म्हणाल्या, “ग्रामस्थांना त्या शाळेतील मुलांचा पोशाख, वागणे याविषयी खूपच कौतुक वाटते असे जाणवले. म्हणूनच आम्ही आमच्या शाळेत मुले टिकून रहावीत यासाठी दोन गोष्टी बदलायच्या ठरवल्या. आज आमच्या मुलांचा पोशाख पूर्णत: international school प्रमाणेच आहे. शाळेत शिस्त व योग्य शिष्टाचारही शिकविले जातात. हे पालकांना भावते आहे. पुढच्या वर्षी नक्कीच आमच्या शाळेचा पट वाढेल.”

शाळेतील मुलांची चालण्याबोलण्यातील शिस्तही अगदी काटेकोर वाटली. बाकावर बसताना (शिकतानाही) हाताची घडी घालून बसणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालत जाताना लगेच दोन्ही हात मागच्या बाजूला बांधणे, उभे राहून उत्तरे देताना हाताची घडी घालणे, अशा गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडल्या होत्या.

इयत्ता ३ री च्या वर्गात गेले असताना शिक्षिका चित्रवाचन घेत होत्या. एक जंगलाचे चित्र दाखवून त्यांनी त्यात कायकाय आहे असे विचारले व मुलांना या चित्राविषयी जोडीचर्चा करावयास सांगितले. त्यानंतर एक ट्राफिक सिग्नलचे चित्र दाखवून काही प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्यावर मुले हाताची घडी घालून उभी रहात व उत्तरे देत. तसे न केल्यास शिक्षिका मुलांना हाताची घडी घालण्याची आठवण करून देत होत्या. बहुतेकदा या सर्व सुचना इंग्रजीत असायच्या. Fold your hands, sit properly, stand straight, clap for him वगैरे.

विद्यार्थ्यांना जोडीचर्चेसाठी सूचना देताना शिक्षिका

विद्यार्थ्यांना जोडीचर्चेसाठी सूचना देताना शिक्षिका

दुसऱ्या वर्गात शिक्षिका ‘आभाळमाया’ ही कविता शिकवीत होत्या. पहिले कडवे त्यांनी चालीत म्हणायला शिकविले. त्यानंतर कवितेवर आधारित एक प्रश्न फळ्यावर लिहिला. ‘पाऊस पडल्यानंतर वर्गात काय काय बदल होतात?’ यावर मुलांना जोडीचर्चा करून उत्तरे लिहून काढण्यास सांगितले. शिक्षिकेने मुलांना खाली बसायला सांगितले. जमीन स्वच्छ, टाईल्स लावलेली होती. सतरंजी घातली गेली. पण मुले खाली बसायला तयार नव्हती. एका मुलाला कारण विचारले तर तो पटकन म्हणाला, ‘ड्रेस खराब होईल म्हणून.’

नंतर शिक्षकांनी सूचना केली म्हणून सर्वजण जोड्या करून खाली बसले. विचारलेल्या प्रश्नाला सर्वजण आपापालीच उत्तरे लिहित होते. आधी त्यांनी एकमेकांशी चर्चा केलीच नाही. शिक्षकांनी आठवण करून दिल्यानंतर लिहिलेली उत्तरे एकमेकांना वाचून दाखविली, पण असे करण्यात जोडी चर्चेचा उद्देश साध्य झाला नाही.

जोडी चर्चा करताना विद्यार्थी

जोडी चर्चा करताना विद्यार्थी

मुलांचा पोशाख पालकांनी स्वखर्चाने विकत घेतला आहे आणि तो त्यांच्याच मागणीनुसार केला आहे. शाळेचे भौतिक स्वरूप बदलण्यासाठी शाळेत टाईल्स लावणे, इ-लर्निंगची सुविधा देणे या सर्वांसाठी पालकांनी निधी उपलब्ध करून दिला आहे असे शिक्षिका अभिमानाने सांगत होत्या. ही सगळी भौतिक सुबत्ता नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. पण जरा वेगळ्या अंगाने विचार केला तर या बाबतीतले काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत :

१) मुलांचा बदललेला पोशाख व वाढलेली पटसंख्या यांचा गुणवत्तेशी संबंध आहे का?

२) असा पोशाख घालणे मुलांना अडचणीचे वाटते, त्यांच्या हालचालींना मर्यादा पडतात. तर मग अशा गोष्टींचा आग्रह धरणे खरोखर शैक्षणिक गुणवत्तेला पूरक आहे का? हे करताना मुलांचे मत लक्षात घेतले गेले का?   

मूल्यवर्धनच्यादृष्टीने याचा विचार केला तर काय जाणवते? मूल्यवर्धनच्या समग्र शाळा दृष्टीकोनानुसार शाळांचे वातावरण अशा पद्धतीने घडविले जाते ज्यामुळे मुलांना शाळेमध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या लोकशाही मूल्यांचा अनुभव मिळेल. मुलांच्या मुक्त हालचालीत अडथळा ठरणारा पोशाख, मुलांचे सततचे शिस्तीच्या नियमांच्या बंधनात वावरणे (हाताची घडी घालून बसणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालत जाताना नेहमीच हात मागे बांधून जाणे) हे वरवर पाहता जरी अदबशीर, नीटनेटके वाटत असले तरी यामुळे निर्माण झालेले वर्गाचे, शाळेचे दबलेले वातावरण स्वातंत्र्य या लोकशाही मूल्याचा अनुभव देण्यात कमी पडते.

अशा वातावरणात मुले मुक्तपणे वावरणारी, खेळणारी, बागडणारी न राहता दबावाखाली, कृत्रिम हालचाली करणारी बनतात. जर स्वत:च्या दैनंदिन जगण्यात मुलांना स्वातंत्र्य, मोकळीक अनुभवता आली नाही तर ती पुढे जाऊन ‘स्वातंत्र्य’ या लोकशाही मूल्याचा अंगीकार कसा करतील?    

वर उल्लेखिलेल्या शाळेतील भौतिक वातावरण, मुलांचे पोशाख, शाळेत काटेकोर शिस्तबद्ध हालचाली या गोष्टी पालकांना हव्याहव्याशा व शिक्षकांना अभिमानास्पद वाटल्या तरी त्यातून निर्माण झालेला कृत्रिमपणा बालस्नेही व मूल्यवर्धनला पूरक नाहीत असे मनात आल्यावाचून राहिले नाही.