सृजनशील शिक्षकांद्वारे मूल्यवर्धनची अध्यापनाशी सांगड

मूल्यवर्धनच्या उपक्रमापूर्वी प्रार्थना म्हणताना विद्यार्थी

मूल्यवर्धनच्या उपक्रमापूर्वी प्रार्थना म्हणताना विद्यार्थी

मूल्यवर्धनच्या उपक्रमांमध्ये शाळेचे दैनंदिन अध्यापन प्रभावी करण्याची क्षमता आहे. त्यातून जर शिक्षक सृजनशील, प्रयोगशील, विचारी असतील तर शाळेतील प्रत्येक कृती ही अर्थपूर्ण बनू शकते. मूल्यवर्धन या कृतीला आणखी अर्थ देण्याला आणि तिला मूल्याधिष्ठित बनविण्याला सहाय्य करते. हे दृश्य आपल्याला जि. प. प्राथमिक शाळा, गजानन नगर, नालवाडी, वर्धा इथे पाहायला मिळते.

शाळेत पाहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. एकूण पट ६२ आणि शिक्षक ३ आहेत. ही शाळा वर्धा शहराला लागून आहे. त्यामुळे परिसरातील अनेक मुले शहरातील खाजगी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. इथे येणाऱ्या बहुतेक मुलांचे पालक हे कष्टकरी, मजूर करणारे आहेत.

या शाळेतील सर्वच शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम घेणारे आणि कल्पक आहेत, हे दिनांक २८ फेब्रु. २०१९ रोजी शाळा भेटीदरम्यान झालेल्या परिपाठाच्या वेळेस लक्षात आले. परिपाठात नियमितपणे होणाऱ्या गोष्टी झाल्यानंतर शिक्षकांनी समोर येऊन बोलायला सुरुवात केली. त्यादिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजेच डॉ. सी. व्ही. रमन यांचा जन्मदिन होता. या विशेष दिनाविषयी, डॉ. सी. व्ही. रमन यांच्याविषयी, त्यांच्या संशोधन कार्याविषयी माहिती सांगून झाल्यानंतर शिक्षिकेने वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी सोप्या सरळ भाषेत विवेचन केले.

बोलत असताना पाठ्यपुस्तकातील अनेक पाठांचे, दैनंदिन जीवनातील संदर्भ देत मुद्दे स्पष्ट केले. जीवनात सर्वत्र विज्ञान कसे भरून आहे ते सांगितले. त्यानंतर ठळक बातम्यांमाध्ये सेवाग्राम येथे सुरु होणाऱ्या गांधी विज्ञान संमेलनाविषयी सांगितले व आपल्या आईबाबांसोबत ते प्रदर्शन पहायला जाण्याचे आवाहन केले. परिपाठातील गोष्ट, बातम्या, माहिती मुलांनी लक्षपूर्वक ऐकले आहे याची खातरजमा करण्यासाठी शिक्षक मुलांना अधूनमधून प्रश्नही विचारत होते.

रोजच्या परिपाठात मुलांचा सहभाग जरी असला तरी परिपाठ जास्तीतजास्त अर्थपूर्ण व्हावा म्हणून शिक्षकही त्यामध्ये योग्य वेळेस सहभाग घेतात, पुढाकार घेतात. शिक्षक एखाद्या विषयाची सखोल माहिती मुलांना देण्यासाठी पूर्वतयारी करून मुलांशी संवाद साधतात.

या शाळेतील एक शिक्षिका मूल्यवर्धनच्या प्रेरक आहेत. जून २०१७ पासून त्यांनी या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मूल्यवर्धनविषयी बोलताना त्यांनी आवर्जून सांगितले की मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन पद्धतींचा दैनंदिन अध्यापनात खूप उपयोग होतो. शिवाय इतर पाठ्यविषयातील अनेक धडे शिकवताना मूल्यवर्धनचे उपक्रम जोडता येतात. इतर दोन शिक्षकांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला. वर्गात गेले असताना शिक्षकांचे हे म्हणणे प्रत्यक्षात घडताना पाहिले.

मूल्यवर्धनच्या प्रेरक शिक्षिका, माधवी नागापुरे, इयत्ता १ ली व ३ री चा एकत्रित वर्ग सांभाळतात. त्या ३ रीतील मुलांना ‘आपले कपडे’ (विषय – परिसर) हा पाठ शिकवित होत्या. अध्यापनाची सुरुवात त्यांनी मुक्त चर्चेने केली. आपण कोणते कपडे वापरतो? वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे कपडे वापरतात का? असे प्रश्न विचारत विषयप्रवेश केला व मुलांना बोलते केले.

त्यानंतर, आपण मूल्यवर्धनमध्ये करतो तसे गट करूयात असे म्हणून त्यांनी मुलांना आपापल्या वह्या घेऊन तीन गटात जाऊन बसायला सांगितले. प्रत्येक गटाला एक ऋतू दिला व त्या  ऋतुत आपण काय काम करतो व कसे कपडे घालतो याविषयी चर्चा करावयास सांगितले. सर्व गटांनी आपापसात व्यवस्थितपणे चर्चा करून मुद्दे काढले व नंतर सादरीकरण केले. मुलांना गटचर्चेची ओळखच नाही तर चांगला सराव आहे असे दिसले.

विद्यार्थी गटचर्चा करताना

विद्यार्थी गटचर्चा करताना

गटचर्चेनंतर, पाठात असलेले पण मुलांच्या मांडणीतून सुटलेले मुद्दे शिक्षिकेने उदाहरणे देऊन स्पष्ट केले. “आपली शाळा सुरु होते तेव्हा कोणता ऋतू असतो? घरातले व बाहेरचे कपडे वेगळे असतात का? कसे? वेगवेगळ्या प्रदेशातील लोक कसा पोशाख करतात?” असे प्रश्न विचारून मुलांकडून बरीच माहिती विचारून घेतली. पाठ झाल्यानंतर बोलताना शिक्षिकेने म्हटले, “आज हा पाठ असा गटचर्चेच्या माध्यमातून पहिल्यांदाच घेतला. कल्पना नव्हती हा पाठही इतक्या चांगल्या प्रकारे घेता येईल अशी. तशी जोडी चर्चा, गटचर्चा मी इतर वेळेस बरेचदा घेत असते पण या पाठासाठी असे कधी केले नव्हते. आज मला खूप छान वाटले.”

विद्यार्थी गट चर्चा करत असताना मदत करताना शिक्षिका

विद्यार्थी गट चर्चा करत असताना मदत करताना शिक्षिका

इयत्ता ४ थी च्या शिक्षिका माधुरी घोलप या परिसर विषयातील ‘माझी जबाबदारी व संवेदनशीलता’ हा पाठ शिकवीत होत्या. त्यामध्ये असलेल्या ब्रेल लिपीच्या खुणांचा परिचय करून दिला होता आणि आता चिन्हांच्या भाषेचा परिचय सुरु होता. मुले बोटांच्या चित्रात दाखविलेल्या रचना करून पाहात होती. शिक्षिकेने नंतर एकेक रचना करून दाखविली व मुलांनी तो शब्द ओळखला. त्यानंतर मुलेच एकमेकांना खुणा दाखवू व ओळखू लागली. हे सगळे करण्यात मुले छान रममाण झाली होती. शिकण्यातला आनंद घेत होती.

हा पाठ व मूल्यवर्धनचा उपक्रम यांचा संबंध सांगताना शिक्षिकेने मूल्यवर्धनच्या चौथ्या विभागातील ‘दिव्यांगत्वाविषयी विचार करणे’ या उपक्रमाचा संदर्भ दिला. याबरोबरच वर्गात घेतलेला डोळ्याला पट्टी बांधलेल्या जोडीदाराला ठरलेल्या ठिकाणी घेऊन जाण्याच्या उपक्रमाविषयीही सांगितले. पाठाच्या शेवटी ब्रेल लिपीमध्ये प्रत्येकाने आपले नाव लिहून आणण्याचा गृहपाठ मुलांना देण्यात आला.

या दोन्ही वर्गातील अध्ययन-अध्यापन पाहिल्याने, पाठ्यक्रम आणि मूल्यवर्धन उपक्रम कसे एकात्मिक आहेत हे पाहण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. शिक्षकांनी जर आपली कल्पकता, सृजनात्मकता वापरली तर अत्यंत अर्थपूर्ण व परिणामकारक पद्धतीने एकात्मिक अध्यापन होऊ शकते हेही लक्षात आले. सृजनशील, प्रयोगशील शिक्षकांना आपले अध्यापन प्रभावी करण्यासाठी मूल्यवर्धनच्या रुपात एक अध्यापन मंत्रच मिळाला आहे.