जिल्हा मेळावा सातारा: अहवाल

सातारा जिल्हा मूल्यवर्धन मेळावा २१ जानेवारी २०२० : अहवाल

स्थळ : श्री. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
आजच्या नकारात्मकतेच्या युगात मूल्य पाझरणे महत्त्वाचे आहे.
मूल्यवर्धन जीवनाच्या प्रगल्भतेसाठी आवश्यक आहे.
-खासदार श्री. श्रीनिवास पाटील

माठ हा सच्छिद्र असल्याने तो पाझरतो व त्यामुळे आतील पाणी थंड होते, पण सिमेंटचा लेप लावलेल्या माठात पाणी थंड होणार नाही, कारण तो पाझरत नाही. याचप्रमाणे मूल्यांचा पाझर होणे गरजेचे आहे. हे काम मूल्यवर्धन कार्यक्रम करीत आहे. आपल्या आजूबाजूला दररोज नकारात्मक घटना घडतात, यांसाठी बालकांमध्ये मूल्य बालवयातच पाझरणे आवश्यक आहे.

 

२१ जानेवारी २०२० रोजी सातारा शहरातील श्री. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडलेल्या मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यामध्ये खासदार श्री. श्रीनिवास पाटील आपले मनोगत व्यक्त करत होते.

ज्ञानेश्वर माऊली, श्री. तुकाराम महाराज यांच्या वचनांचे  दाखले देत त्यांनी मूल्यवर्धनचे महत्त्व व सद्यकाळातील त्याची गरज सांगितली.

 

देशाच्या संवर्धनासाठी आपण लहानपणापासूनच मूल्यवर्धनचे रोपटे लावायला हवे.  मूल्य हे अमूल्य व्हावे व त्याचे अमृतरुपी ज्ञानकण सगळीकडे पडावेत, अशाप्रकारे मूल्यवर्धनबाबत आपले मनोगत खासदार श्री. श्रीनिवास पाटील यांनी सातारा मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यात  व्यक्त केले.राज्य शासनाच्या वतीने राज्यभर मूल्यवर्धन जिल्हास्तरीय मेळावे पार पडले. त्यापैकी सातारा येथे भव्यदिव्य असा मूल्यवर्धन मेळावा संपन्न झाला.

प्रदर्शनाचे उद्घाटन :

 

संपूर्ण महाराष्ट्रातून मूल्यवर्धन कार्यक्रमासंबंधीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचा संदेश देणारी, मानवी भावभावनांबद्दल, नातेसंबंधांबद्दल सकारात्मक संदेश देणारी भित्तीपत्रके (पोस्टर्स) तयार केली होती. ही भित्तीपत्रके सामाजिक, वैयक्तिक जाणीवांच्या कक्षा तरल करणारी व रुंदावणारी होती. या भित्तीपत्रकांचे प्रदर्शन जिल्हा परिषद सातारा, सदर बाजार मैदानात भरले होते.

 

दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील यांच्या शुभहस्ते झाले. या आनंदाच्या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, बीजेएसचे जिल्हा अध्यक्ष श्री. भरतेश गांधी, एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

जबाबदार नागरिकत्वाचा पाया रचणारे आणि मनाला व बुद्धीला खाद्य असलेल्या या नयनरम्य भित्तीपत्रकांचे प्रदर्शन सर्व सातारा येथील नागरिकांनी दिनांक २१ ते २३ जानेवारी २०२० असे तीन दिवस हे भव्य प्रदर्शन अनुभवले.

 

मेळाव्याचे उद्घाटन :

 

सातारा शहरातील श्री. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन मेळाव्याचे उद्घाटन झाले. या प्रसंगी खासदार श्री. श्रीनिवास पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संचालक श्री. अनिल पाटील, DIECPD प्राचार्य रामचंद्र कोरडे, सातारा जिल्हा परिषद सभापती (महिला व बालकल्याण समिती) श्रीमती सोनाली पोळ, सिने अभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी, बीजेएसचे जिल्हा अध्यक्ष श्री. भरतेश गांधी आणि एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था आदी मान्यवर उपस्थित होते.

डावीकडून मिना बोरगावे,मा.श्री .उद्य कबुले जि.प.आध्यक्ष,मा.खा.श्रीनिवास पाटील,गिरीष कुलकर्णी सिनेआभिनेते,श्री शांतिलाल मुथ्था,श्री आनिल पाटील चेअरमन रयत शिक्षण संस्था,श्री रामचंद्र कोरडे प्राचार्य DIET

प्रास्ताविक :

 

एसएमएफचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा उगम, आखणी, अंमलबजावणी व त्यात पुढे होत गेलेले बदल असा मूल्यवर्धन कार्यक्रमाचा संपूर्ण इतिहास व लेखाजोखा आणि सद्यकाळातील मूल्यवर्धनची गरज आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केली.

मान्यवरांचे मनोगत :

 

सर्व मान्यवरांचा सत्कार झाल्यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

मूल्यवर्धन कार्यक्रम हा शासनाच्या मूळ अभ्यासक्रमाला धरून जाणारा पूरक असा आहे, अशा शब्दांत DIECPD प्राचार्य श्री. रामचंद्र कोरडे यांनी मूल्यवर्धनचे कौतुक केले.

जिल्हा परिषदेच्या सभापती (महिला व बालकल्याण) श्रीमती सोनाली पोळ यांनी मूल्यवर्धनच्या माध्यमातून नितांत सुंदर काम होत आहे, असे सांगून कार्यक्रमाचे कौतुक केले. मूल्यवर्धन हा अंगणवाडीपासून राबवण्याची सूचनावजा विनंती करून साताऱ्यात मूल्यवर्धनद्वारे अनेक शिवबा घडावेत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ क्लिप्सचे सादरीकरण :

 

सातारा जिल्ह्यातून मूल्यवर्धन संबंधित शिक्षकांनी व मुलांनी मिळून तयार केलेल्या व्हिडीओ क्लिप्सचे संकलन करण्यात आले होते. त्यापैकी २१ व्हिडीओंची निवड करून त्यांचे मेळाव्यात सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी व्हिडीओ तयार करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

चर्चासत्र :

 

मूल्यवर्धन उपक्रमांचे परिणाम कशाप्रकारे होत आहेत, हे या चर्चासत्रातून स्पष्टपणे दिसून आले. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांना त्यांच्या भावना, प्रतिक्रिया व अपेक्षा तसेच मूल्यवर्धनचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी दिली. ज्या शिक्षकांना ही संधी मिळाली, त्यांनी हीच शिक्षणातील नवी क्रांती आहे, असे नमूद करून मूल्यवर्धन उपक्रमांमधून मुलांमध्ये मूल्ये रुजतात व त्यांना सुजाण नागरिक व माणूस बनविण्याचा आम्ही प्रयत्न करतो, अशाप्रकारे मूल्यवर्धनचे कौतुक केले.

 

चर्चेत अनेक शिक्षकांनी मूल्यवर्धनशी संबंधित हृदयस्पर्शी अनुभव सांगितले.

चर्चासत्र :

 

मूल्यवर्धन उपक्रमांचे परिणाम कशाप्रकारे होत आहेत, हे या चर्चासत्रातून स्पष्टपणे दिसून आले. श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांना त्यांच्या भावना, प्रतिक्रिया व अपेक्षा तसेच मूल्यवर्धनचे अनुभव सर्वांसमोर मांडण्याची संधी दिली.  ज्या शिक्षकांना ही संधी मिळाली, त्यांनी हीच शिक्षणातील नवी क्रांती आहे, असे नमूद करून मूल्यवर्धन उपक्रमांमधून मुलांमध्ये मूल्ये रुजतात व त्यांना सुजाण नागरिक व माणूस बनविण्याचा आम्ही प्रयत्न करतो, अशाप्रकारे मूल्यवर्धनचे कौतुक केले.

 

चर्चेत अनेक शिक्षकांनी मूल्यवर्धनशी संबंधित हृदयस्पर्शी अनुभव सांगितले.

सक्सेस स्टोरीचे सादरीकरण :

 

सातारा जिल्ह्यातील एका शाळेतील ‘आणि रोहन शाळेत जाऊ लागला’ या मूल्यवर्धन सक्सेस स्टोरीचा व्हिडीओ दाखवण्यात आला.

सिनेअभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी :

 

” शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. आजवर जे मिळालंय, ते मला लाभलेल्या चांगल्या शिक्षकांमुळे. मूल्यवर्धन कार्यक्रम सुजाण नागरिक बनवण्याचा पाया रचत आहे,” असे श्री. गिरीश कुलकर्णी म्हणाले.

 

मेळावा कार्यक्रमात अधिकांश वेळ शिक्षण क्षेत्रातील उपस्थित मान्यवर प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रमाचे निरीक्षण केलेले श्री. गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले, ” मूल्यवर्धनच्या अफाट प्रतिसादामुळे मी आश्चर्यचकित झालो. इतका प्रचंड प्रतिसाद, शिक्षकांचे अनुभव ऐकून मी पूर्णपणे आचंबित झालो. शंभर वर्षांनी जर इतिहास लिहिला गेला, तर त्यात मूल्यवर्धनला खास जागा नक्कीच मिळेल “.

 

भारत महासत्ता होण्याचे अनेकांनी आपापले मार्ग सांगितले आहेत, पण नागरिकत्वाचा भक्कम पाया असलेली महासत्ता होण्याचा एक मार्ग मूल्यवर्धन उपक्रमांमधून नक्की जातो.

 

जिल्हा परिषदेच्या शाळांचे मनापासून कौतुक करत श्री. गिरीश कुलकर्णी म्हणाले की,  “जिल्हा परिषदेच्या शाळा या प्रेक्षणीय स्थळे होऊ शकतात. यामागे मूल्यवर्धन महत्त्वाची जबाबदारी पार पाडेल. मूल्यवर्धनमुळे एक नवा, सशक्त समाज घडेल. ”

 

रयत शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. अनिल पाटील यांनी वेगाने बदलत असेलला काळ, शिक्षण व रोजगारासंबंधी येणारा भविष्यकाळ आणि त्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी गरजेची असलेली तयारी करणे, या सगळ्या बाबींवर आपल्या ओघवत्या वाणीने भाष्य केले.

आभार प्रदर्शन व समारोप :

 

मा. श्री. रामचंद्र कोरडे (DIECPD प्राचार्य) यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये :

 

  • राज्यभरातील शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यवर्धनवर आधारित शाळा व विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे चित्रच या भव्य प्रदर्शनातील भित्तीपत्रकांच्या माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील लोकांचे लक्ष वेधून घेत होते.
  • सर्वच उपस्थित शिक्षकांमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून येत होता.
  • श्री. शांतिलाल मुथ्था यांनी शिक्षकांना बोलण्याची संधी दिली. जवळपास सर्वच शिक्षकांनी मूल्यवर्धनचा होत असलेला प्रभाव व त्याची आवश्यकता यांचे महत्त्व पटवून दिले.
  • सक्सेस स्टोरी व्हिडीओचे सादरीकरण करण्यात आले.
  • चर्चासत्रात शिक्षकांनी मूल्यवर्धन उपक्रमासंबंधित हृदयस्पर्शी अनुभव सांगितले. यामुळे सर्व उपस्थित मान्यवर प्रभावित झाले.
  • सातारा शहरातील सर्व पत्रकार बंधूंना प्रदर्शनाच्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विविध प्रश्न विचारून मूल्यवर्धनची माहिती जाणून घेतली व संपूर्ण कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
  • एसएमएफच्या सर्व टीमने हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
  • मूल्यवर्धन उपक्रमांतून विद्यार्थांना भारत देशाचा कर्तव्यशील, जबाबदार नागरिक बनविण्याचा सर्व शिक्षकांनी निर्धार केला.
  • सातारा मूल्यवर्धन जिल्हा मेळावा म्हणजे, समंजस, परिपक्व व परिपूर्ण नागरिकत्वाचा पाया रचणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या भक्कम किल्ल्याचा बालेकिल्ला ठरला.
  • अफाट राकट सहयाद्रीच्या कड्याकपारीत, शहरात, गाव-तांड्यावर, वाड्यावाड्यांत मूल्यवर्धनरुपी अश्वाच्या टापा आता ऐकू येत आहेत.