जिल्हा मेळावा – सांगली अहवाल

सांगली जिल्हा मूल्यवर्धन मेळावा अहवाल : दि. २२ जानेवारी २०२०

स्थळ : राजमाता भवन, कल्पद्रुम मैदानाजवळ, नेमिनाथ नगर, सांगली
मूल्यवर्धन व्यासपीठाद्वारे देशाची भावी पिढी सक्षम व सुजाण नागरिक होण्यास मदत होईल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिजित राऊत यांनी व्यक्त केला विश्वास.

महाराष्ट्रामध्ये गेल्या ५ वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामधून  घटनात्मक मूल्ये विद्यार्थांमध्ये सुनियोजित पध्दतीने ज्ञानरचनावादाचा उपयोग करून, बालस्नेही वातावरणात रुजविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये नेहमीच पुढे राहिलेल्या सांगली जिल्ह्यात मूल्यवर्धनजिल्हा मेळावा म्हणजे विद्यार्थी-शिक्षकांसाठी जणू पर्वणीच होती. जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थी-शिक्षकांच्या साक्षीने आणि प्रचंड उत्साहात सांगली जिल्हा मेळाव्याला सुरुवात झाली.

पोस्टर प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन :

 

मेळाव्याच्या सुरूवातीलाच महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पोस्टर्स प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिजित राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डायटचे प्राचार्य श्री. रमेश होसकोटी, प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे, अधिव्याख्याता श्रीमती अन्नपूर्णा माळी, अधिव्याख्याते श्री. तुकाराम राजे, एसएमएफचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था, एसएमएफ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुरेश पाटील, एसएमएफ जिल्हाध्यक्ष राजगोंडा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पोस्टर प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील ६४ विद्यार्थ्यांनी आपली पोस्टर्स पाठवली होती. हे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी विद्यार्थी- शिक्षकांच्या कलागुणांचे खास कौतुक केले.

दीप प्रज्वलनाने मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्याला सुरुवात :

 

पोस्टर प्रदर्शनानंतर मुख्य कार्यक्रमाची म्हणजे जिल्हा मेळाव्याची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व गुरुजन आणि विद्यार्थ्यांचे स्वागत सुंदर गीताने स्वागत केले. शब्द सुमनांच्या या स्वागताने उपस्थित सर्वजण भारावले.

उद्घाटनानंतर प्रास्ताविक करताना शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था म्हणाले, “मूल्यवर्धन ही शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती असून हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा लढा आहे. येत्या काळात मूल्यवर्धनचे हे लोण सर्व भारतभर पसरेल आणि याचा मूळ जनक महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.”

 

डायटचे प्राचार्य श्री. रमेश होसकोटी म्हणाले, ”शिक्षकांनी मुलांना कृतीच्या माध्यमातून मूल्यवर्धनचे धडे दिले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये मूल्यांची रुजवणूक झाली असून त्यात वाढ होत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे.” शिक्षकांनी मूल्यवर्धन संदर्भात चांगले काम केले असून हे मानवी तत्वांवर महत्वपूर्ण काम असल्याचे गौरवोद्गारही श्री. रमेश होसकोटी यांनी काढले.

 

”मूल्यवर्धन ही काळाची गरज असून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवत त्यांच्यावर संस्कार करण्याची आपली जबाबदारी आहे.” असे मत प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे यांनी व्यक्त केले. ”आज सर्वच क्षेत्रात विद्यार्थी ज्ञान संपादन करून पुढे गेला आहे, परंतु मूल्यांचा अभाव असल्याने समाजात काही वाईट कृती घडत आहेत. फक्त ज्ञान देणे एवढीच जबाबदारी आपल्या शाळांची नाही, तर त्याचबरोबर मूल्ये रुजवण्याची जबाबदारीही आपल्या शाळांची आहे. तसेच ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.” असेही श्रीमती सुनंदा वाखारे पुढे बोलताना म्हणाल्या. कार्यक्रमात पुढे गटशिक्षण अधिकारी श्रीमती अनुराधा मेहेत्रे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

कार्यक्रमाच्या समारोपात प्रमुख पाहूणे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभिजित राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन  केले. ”शाळांमधून आपल्याला बोलके पोपट घडवायचे नाहीत, तर सामाजिक भावना असलेले संस्कारक्षम विद्यार्थी घडवायचे आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ”आपल्याला शाळेत जे करायचे आहे, तेच अतिशय सोप्या फॉरमॅटमध्ये असलेल्या मूल्यवर्धनच्या व्यासपीठाचा वापर करून करायचे आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर यातून भावी पिढी देशाचे सक्षम व सुजाण नागरिक म्हणून घडतील,” असा विश्वास श्री. अभिजीत राऊत यांनी पुढे बोलताना व्यक्त केला.

मूल्यवर्धनफिल्म्सचे स्क्रिनिंग :

 

मूल्यवर्धन विषयी आपले अनुभव आणि मत मांडणार्‍या एकूण ४४८ व्हिडिओ क्लिप्स जिल्हा परिषद शाळेच्या सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी पाठवल्या होत्या. यातील निवडक १८ व्हिडिओ क्लिप्स यावेळी सभागृहात दाखविण्यात आल्या. या व्हिडिओ क्लिप्स पाहताना ही आपलीच कहाणी असल्याची भावना आणि आनंद शिक्षकांच्या चेहर्‍यावर झळकत होता. ज्यामधून शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण कसे हसत-खेळत दिले जाते व त्यामुळे शिक्षकांमध्ये कशाप्रकारे लक्षणीय बदल होत आहेत, याची झलक पाहायला मिळाली. यातून विद्यार्थी-शिक्षकांची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली.

मी आणि मूल्यवर्धनपुस्तिका :

 

‘मी आणि मूल्यवर्धन’ या पुस्तिकेसाठी महाराष्ट्रातील १३५० शिक्षकांनी मूल्यवर्धन संदर्भातील त्यांचे अनुभव स्वेच्छेने एसएमएफच्या कार्यालयात पाठविले होते. यात सांगली जिल्ह्यातील १६ शिक्षकांनी आपले अनुभव लेखन केले आहे. या अनुभवांचे विश्लेषण आणि संकलन करून “मी आणि मूल्यवर्धन” हे पुस्तक उपलब्ध करण्यात आले आहे. यातून पुढील पिढी घडविण्यासाठी सर्व शिक्षक कशा प्रकारे सहभागी आणि उत्सुक आहेत याचे दर्शन घडते.

पोस्टर प्रदर्शन सर्वांसाठी खुले :

 

सांगली जिल्ह्यातील पोस्टर प्रदर्शनाला जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी, पालकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती. हे मूल्यवर्धनचे पोस्टर प्रदर्शन सलग तीन दिवस (दिनांक, २२, २३, २४ जानेवारी २०२०) विद्यार्थी, पालक, नागरिक, तरुणाई अशा सर्वांना पाहण्यासाठी खुले होते. प्रदर्शनास भेट दिलेल्या सर्वांनी महाराष्ट्रातील शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवले. मूल्यवर्धन मेळावे हे समारंभाचा भाग (Event ) नसून एक चळवळ (Movement) आहे. आता ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहील, अशी खात्री सर्वांना वाटते.

सर्वांच्या सहकार्याने जिल्हामूल्यवर्धनमेळावा यशस्वी

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, DIET ची टीम यांनी दोन महिन्यांपासून अविरत प्रयत्न केले. तसेच एसएमएफचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सुरेश पाटील, एसएमएफ जिल्हाध्यक्ष राजगोंडा पाटील व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेतली. तसेच एसएमएफचे पदाधिकारी, मास्टर ट्रेनर्स व तालुका समन्वयक यांचेही अनमोल सहकार्य यासाठी लाभले. सर्वांच्या अथक परिश्रमाने हा जिल्हा मेळावा यशस्वी झाला. सांगली जिल्हा मूल्यवर्धन मेळाव्याची प्रसार माध्यमांनी दखल घेऊन हा मेळावा जनमानसात पोहोचवला.

 

मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये:

 

विद्यार्थी- शिक्षक मोठ्या उत्साहाने जिल्हा मूल्यवर्धन मेळाव्यात सहभागी झाले होते. यात पालकांचाही सहभाग होता. शिक्षकांनी मान्यवरांसमोर आपल्या मनातील भावना उत्स्फूर्तपणे मांडल्या.

सांगली जिल्ह्यातून आतापर्यंत ४०१२ शिक्षकांनी मूल्यवर्धनचे ट्रेनिंग घेतले आहे. याचा १ लाख २ हजार ७५५ विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. महाराष्ट्रातील ६७ हजार शाळांमधील ४४ लाख विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवण्याचे काम मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. हे काम अशा मूल्यवर्धन जिल्हा मेळाव्यांच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे. मूल्यवर्धनचा उद्देश साध्य होत असल्याचे पाहता भविष्यात सुदृढ व संवेदनशील समाज उभा राहील, यात कसलीही शंका नाही.