मूल्यवर्धन बद्दल

संकल्पना

मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजायला हवीत, तसेच भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडायला हवेत, या उद्देशाने शाळांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मराठी प्रमाणेच हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि कोकणी भाषांमध्येही हा कार्यक्रम उपलब्ध केला आहे.

सामाजिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या श्री. शांतिलाल मुथ्था यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धनचे बीज रोवले आहे. मूल्यवर्धनमुळे संपूर्ण देशात शैक्षणिक क्रांती होईल असा विश्वास आहे.

महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम स्वीकारला असून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. गोवा सरकारनेसुद्धा हा उपक्रम स्वीकारला आहे.

उद्देश

राज्यघटनेतील मूल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावित आणि हेच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक व्हावेत हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजावित यासाठी शाळा प्रयत्न करत असतातच. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळेल.
मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शाळा हे उद्दिष्ट नियोजित आणि पद्धतशीरपणे साध्य करू शकतील, मुलांमध्ये आमुलाग्र असे परिवर्तन होईल असा विश्वास आहे.

वैशिष्ट्ये

 • मूल्यवर्धन हा कार्यक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शिक्षण हक्क कायदा २००९, राज्याच्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाची उद्दिष्टे तसेच इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दस्तावेजांतील अपेक्षांशी सुसंगत आहे.
 • प्रतिष्ठेचा आदर, स्वायतत्ता, जबाबदारी, सर्जनशील विचार, विविधतेचा आदर, सुसंवादी नातेसंबंध, इतरांबद्दल आस्था आणि सक्रिय योगदान ही आठ मूल्ये घटनात्मक मूल्यांच्या आधारावर सुचविलेली आहेत.
 • राज्य घटनेतील मूल्ये मुलांमध्ये रुजावित हे शालेय शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. भारतीय संविधानात ठळकपणे नमूद केलेल्या स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधूता या चार मुख्य मूल्यांचा मूल्यवर्धनच्या उपक्रमात समावेश केलेला आहे.
 • यासाठी शाळांचा, शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. मूल्यवर्धन या कार्यक्रमाद्वारे शाळा हे उद्दिष्ट नियोजित व पद्धतशीरपणे साध्य करू शकतात.

इतिहास

 • वर्ष २००९-१०

  महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५९ मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ.

 • वर्ष २०१०-११

  शिक्षक-पालकांचा सकारात्मक प्रतिसाद. बीड जिल्ह्याच्या पाटोदा, आष्टी तालुक्यातील तसेच जळगाव मधील एकूण ५०० शाळा व ३८००० विद्यार्थ्यांपर्यंत कार्यक्रमाची व्याप्ती.

 • वर्ष २०११-१२

  ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून बीड प्रकल्पाचे मूल्यमापन.

 • वर्ष २०१२-१३

  संस्थेने स्वतः केलेले कार्यक्रमाचे मूल्यमापन.

 • वर्ष २०१३-१४

  केंब्रिज विद्यापीठ आणि एनसीईआरटीतील तज्ज्ञांकडून परिक्षण. प्रकल्पात सहभागी नसलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा सहभागी विद्यार्थ्यांत सकारात्मक बदल झाल्याचे अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठातील ब्रायन फ्ले यांच्या संशोधनावरुन सिद्ध.
  बीड प्रकल्पातील अनुभव, प्रचलित शैक्षणिक धोरणे, एनसीईआरटी व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त धोरणे याच्या अनुषंगाने मूल्यवर्धन आराखड्याची निर्मिती.

 • वर्ष २०१४-१५

  मूल्यवर्धन कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य ह्यांची आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेट.
  मूल्यवर्धन कार्यक्रम गोव्यामधील विद्याभारतीच्या १३ शाळांच्या मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांची आष्टी व पाटोदा तालुक्यातील शाळांना भेट.
  विद्याभारती, गोवा शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी.

 • वर्ष २०१५- २०१८

  मूल्यवर्धन कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासनाकडून प्रथम प्रायोगिक तत्त्वावर आणि नंतर कायमस्वरुपी स्वीकार.

  शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) व विद्या परिषद ह्यांच्यामध्ये करार.

  विद्या प्राधिकरणच्या तज्ज्ञ मंडळींमार्फत कार्यक्रमाचे अवलोकन.

  महाराष्ट्र राज्याच्या ३४ जिल्ह्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा विस्तृत आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या अध्यक्षांचा दौरा.

  मूल्यवर्धन कार्यक्रम तीन वर्षांसाठी राबविण्याचा गोवा शासन आणि एसएमएफयांच्यात करार.

  शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमार्फत निरनिराळ्या टप्प्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांना प्रशिक्षण.