वाहतूक सुरक्षेसाठी गावातील मुले आली शहरी रस्त्यांवर

महाराष्ट्रातील बुलढाणा शहरापासून ५५ किमी. अंतरावर असलेल्या, नांदुरा तालुक्यातील अंबोडा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी उच्च-प्राथमिक शाळेतील एक शिक्षिका मूल्यवर्धन उपक्रमाने प्रेरित होऊन गेले वर्षभर ‘रस्ते आणि वाहतूक सुरक्षा’ या मुद्द्यांवर जागरूकता मोहीम चालवित आहेत. त्यांनी गावातील मुलांचे एक कलापथक उभारले आहे. हे कलापथक शहरांतील प्रमुख ठिकाणी जाऊन गीत, संगीत, घोषणा, पोस्टर्स आणि पथनाट्य यांच्याद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी जागृती करते. या कार्यक्रमांमधून पथकातील मुले वाहतूक नियमांचा अर्थही सांगतात.

 

जि प प्रा शा घोराड. शाळेची इमारत

अंबोडा शाळेतील मुलांचे कलापथक

शिक्षिका सविता तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी चालविलेली ही मोहीम, २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात प्रथम चर्चेत आली. त्या वर्षी ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान, म्हणजे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या वेळी, या मुलांनी बुलढाण्याच्या जिल्हा रस्ते वाहतूक कार्यालयात आपली कला सादर केली. अधिकारी आणि इतर लोकांच्या कौतुकाने उत्साहित होऊन, कलापथकातील मुलांना आता राजधानी मुंबई आणि राज्याच्या इतर शहरांमध्ये आपली कला सादर करायची आहे.

 

जि प प्रा शा घोराड. शाळेची इमारत

बुलडाणा रस्ता सुरक्षा कार्यालयातील अधिकारी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना

मराठी आणि माळी समाजबहुल असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे २००० आहे. येथील बहुतांश रहिवासी शेतकरी, भाजीपाला उत्पादक आणि मजूर आहेत. तिथे १९१४ मध्ये सुरु झालेल्या या शाळेत मुख्याध्यापक धरून ६ शिक्षक-शिक्षिका काम करतात. एकूण १२२ विद्यार्थ्यांपैकी ६७ मुली आणि ५५ मुले आहेत. सप्टेंबर २०१८ पासून इथे मूल्यवर्धन सुरु करण्यात आले.  

मुलांचे हे कलापथक आहे अभिनव

सविता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या कलापथकात चौथीची ७ मुले आणि ५ मुली आहेत. या पथकाचे महत्त्व यासाठी आहे की, ही सर्वच मुले छोट्या गावातील असल्याने, शहरातील खूप वर्दळीचे रस्ते ओलांडायचे कसे याचे ज्ञान त्यांनाच नव्हते. शिवाय शहराच्या बाजारपेठेत नियम पाळून चालायचे कसे हे पण त्यांना माहीत नव्हते.

सविता यांनी सांगितले, “सुरुवातीला तर अशी परिस्थिती होती की  इथून सुमारे १० किमी. दूर असलेल्या नांदुरा गावातील रस्त्यांवर चालायचे म्हटले तरी ही मुले घाबरत होती. म्हणून मुलांच्या मनातील शहरी  गर्दी/वाहतूक याविषयीची भीती काढून टाकायचे मी ठरवले. मी इथल्या खूपशा मुलांना नांदुराला घेऊन गेले आणि तिथे रस्ता ओलांडणे तसेच बाजारात काळजीपूर्वक चालणे या गोष्टी शिकवू लागले.”

दुसऱ्या शिक्षिका भावना गौर म्हणाल्या, “शहरातील रस्ते वाहतुकीचे नियम छोट्या गावांमध्ये पाळले जात नाहीत. परंतु, येथील मुले गावातील गल्ल्यांमधून चालताना जमतील तितके वाहतूक नियमांचे पालन करतात. उदा. मुले नेहेमी डाव्या बाजूने चालतात. तसेच, गावातील मोठ्या लोकांना मुले हेल्मेटचे महत्त्व सांगतात. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे धोक्याचे आहे, याची जाणीव गावातील लोकांना करून देतात.”

मुलांच्या या मोहिमेवर गावकरीही खूष आहेत. एक रहिवासी अनिल बावस्कर यांच्या मते, ‘गावातील मुले मोठ्या ठिकाणी जाऊन त्यांना माहीत नसलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. रस्ते सुरक्षा आजच्या काळात फार जरुरी आहे.’   

सुरुवात अशी झाली

 

जि प प्रा शा घोराड. शाळेची इमारत

मूल्यवर्धन सत्रामध्ये शिक्षिका सविता तायडे यांच्याबरोबर रस्ता सुरक्षेवर आधारित नृत्य सादरीकरणाचा सराव करताना विद्यार्थी

सविता यांनी सांगितले  की, एकदा मूल्यवर्धनच्या सत्रात मुले वाहतुकीच्या नियमांविषयी चर्चा करत होती. तेव्हा काही मुले म्हणाली की अंबोडा फाटा येथील रस्ता ओलांडून शाळेत यायची त्यांना भीती वाटते. तेव्हा सविता यांच्या लक्षात आले की मूल्यवर्धनमधील रस्ते आणि वाहतूक सुरक्षा याच्याशी संबंधित उपक्रम मुलांसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

त्या म्हणाल्या, “या गोष्टी मी मुलांना नुसत्या बोलण्यातून सांगितल्या असत्या तर त्या लगेच विसरल्या असत्या. म्हणून मी मुलांना शाळेपासून एक किमी. अंतरावर असलेल्या अंबोडा फाटा इथे घेऊन गेले. नियम पाळून रस्ता कसा ओलांडायचा हे त्यांना तिथे दाखविले.”

सविता या एक कुशल नृत्य आणि गायन कलाकार आहेत. म्हणून त्यांनी ‘रस्ते सुरक्षा’ या विषयावर कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे ठरविले. सुरुवातीला त्यांनी शाळेतच काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. मग अभ्यासपूर्वक मुलांचे एक कलापथक तयार केले.

इयत्ता चौथीची आंचल बगाडे हिने सांगितले की त्यांच्या बाईंनी मूल्यवर्धनच्या कार्यक्रमात वाहतुकीचे बरेच नियम माहीत करून दिले. पोस्टर्स बनवून या नियमांचे अर्थ स्पष्ट केले. कम्प्युटरवर व्हिडिओ दाखविले. शाळेच्या मैदानावर नाचगाणी शिकविली. त्यामळे आता ती अनोळख्या लोकांसमोर बुजत नाहीत.

इयत्ता चौथीचीच दिव्या बावस्कर म्हणते की बाईंनी तिला मूकाभिनय शिकविला. त्यातून तिला न बोलता समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे समजावून सांगावे लागते. त्यामुळे रस्त्यावरील गोंगाटातसुद्धा लोकांना ती आपले म्हणणे नीट समजावून सांगू शकते.        

अजूनही काम सोपे नाही

सुरुवातीपासून ही मोहीम आव्हानात्मक ठरली. कारण छोट्या गावातील लहान मुलांना ५० ते १०० किमी. दूर अंतरावरील शहरात घेऊन जाणे आणि परत आणणे हे जबाबदारीचे काम आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या कुटुंबीयांना समजावून त्यांना राजी करणे हे सोपे नाही, असे सविता म्हणतात. याशिवाय, अशा प्रकारचा एक कार्यक्रम सादर करायचा म्हणजे त्याचा सुमारे ७००० रु. खर्च होतो. हे स्वतःचेच पैसे खर्च करतात.

अखेरीस, मुख्याध्यापक भागवत लांडे मुलांच्या मोहिमेला मिळणारा पाठिंबा म्हणजे मूल्यवर्धनचे यश आहे असे कौतुकाने सांगतात. ते म्हणतात की मूल्यवर्धनमधील मूल्यांबद्दल मुले संवेदनशील होत आहेत. यात मुलांना हे पण सांगितले जाते की रस्त्यावर एखादा अपघात झाला तर एक नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आहे आणि अशा वेळी आपण काय करायला हवे.  

शिरीष खरे

Leave a Message