मूल्यवर्धनमुळे शाळेचे वातावरणच बदलले

स्वतः तयार केलेले फलक दाखवताना विद्यार्थिनी

स्वतः तयार केलेले फलक दाखवताना विद्यार्थिनी

राळेगणसिद्धी हे गाव तसे ग्रामविकासाच्या बाबतीत पूर्वीपासूनच प्रकाश झोतात आहे. अण्णा हजारे यांनी समग्र ग्रामीण विकासाचा आदर्श नमुना या गावाच्या रुपात उभा केला आहे. गावातील प्राथमिक शाळा गावचा आरसा असते असे म्हटले जाते. म्हणूनच या गावातील शाळा कशी आहे हे समजून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल. शाळेचा परिसर अपेक्षेप्रमाणे खूप स्वच्छ, मोकळा आणि सभोवताली वृक्ष असलेला. शाळेला लागूनच अण्णा हजारे यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे शाळेतील घडामोडींवरही त्यांचे बारकाईने लक्ष असते असे शिक्षकांनी व ग्रामस्थांनी सांगितले.

मागच्या वर्षापर्यंत ग्रामस्थांच्या शाळेविषयीच्या तक्रारी खूपच वाढल्या होत्या. कारणे अनेक होती. सर्वच बाजूंनी शाळा व शिक्षकांविषयी असमाधान व्यक्त होत होते. अशा परिस्थितीत शाळेतील मुलांचा पटही बराच कमी झाला होता. राळेगणसिद्धीसारख्या आदर्श गावामध्ये शाळेची अशी स्थिती सर्वांनाच खटकत होती. या वर्षाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व शिक्षकांची बदली करण्यात आली व शाळेत तीन नवीन शिक्षक दाखल झाले.

शाळेत रुजू झाल्यावर लगेचच सर्व शिक्षकांनी मिळून शाळेत अमुलाग्र बदल करायचा असे ठरविले आणि याच वेळेस मूल्यवर्धन कार्यक्रम त्यांच्या हाती आला. मुख्याध्यापकांचे प्रेरक म्हणून आणि इतर दोन शिक्षकांचेही मूल्यवर्धनचे ट्रेनिंग जून २०१८ मध्ये झाले आणि वर्षाच्या सुरुवातीपासूनच मूल्यवर्धनचे उपक्रम अगदी सातत्याने, प्रामाणिकपणे या शाळेत राबविले जाऊ लागले.

सहयोगी खेळ, गटचर्चा असे अनेक उपक्रम शाळेच्या पटांगणात घेतले जातात. साहजिकच ते पालक व ग्रामस्थांच्या नजरेस पडतात. मुलांचा वाढता सहभाग, उत्साह, शिकण्यातला आनंद आणि शाळेत येण्याविषयी मुलांच्या मनात निर्माण झालेली आवड, या सर्वच गोष्टी पालकांना आता प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे शालेय कामकाजाबद्दल असमाधानी असल्याने दुसऱ्या शाळेत घातलेली आपली मुले अनेक पालकांनी पुन्हा या शाळेत घालण्याचे ठरविले आहे.

शाळेच्या पटांगणावर मूल्यवर्धनच्या उपक्रमात रमलेले विद्यार्थी आणि शिक्षक

शाळेच्या पटांगणावर मूल्यवर्धनच्या उपक्रमात रमलेले विद्यार्थी आणि शिक्षक

शाळेत मूल्यवर्धनचे उपक्रम सातत्याने घेतले जातात हे मुलांसोबत गप्पा मारल्यावर लक्षात येते. पुस्तकातले कोणतेही पान उघडून, “हे काय आहे? हे शिकत असताना तुम्ही काय केले?” असे मुलांना विचारले की ती लगेच उपक्रम सविस्तर आठवून सांगतात. तुम्ही शाळेत अभ्यासाचे विषय सोडून इतर काय काय करता असे विचाराले तरी मुले पटपट मूल्यवर्धनच्या उपक्रमांची नावे सांगतात. शिवाय, मध्येच एखाद्या उपक्रमाविषयी विचारले तरी मुले सविस्तर सांगतात. आपल्या उपक्रम पुस्तिकाही उघडून दाखवतात.

रमेश पावडे सर एक खेळ घेतात. कवितेच्या ओळी वाढवत नेण्याचा तो खेळ आहे.

अंगणात रिंगण, रिंगणात अंगण

अंगणात ससा कसा कसा? …. दोन लांब कानांचा ससा …

असे ते गाणे केले होते. शिक्षकांनी मुलांना विचारले, “हे गाणे अजून कसे वाढवता येईल?” तेंव्हा मुलांनी आपल्या मनाने त्यात ५-६ कडवी आणखी तयार करून जोडली. यात मुलांची अभिव्यक्ती, सृजनशीलता दिसून आली. पावडे सरांनी सांगितले की मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे मुले स्वत:च्या मनाने लेखन करू लागली आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक, रमेश पावडे सर हे मूल्यवर्धनचे प्रेरक आहेत. ते अतिशय उपक्रमशील आहेत. त्यांनी मुलांसाठी वर्तमानपत्रातील विविध सदरांची कात्रणे एकत्र करून कोडी, कविता, बोधकथा, सामान्यज्ञान अशा संग्रहवह्या तयार केलेल्या आहेत. रिकाम्या वेळेत मुले यातील कात्रणे वाचत असतात.

मूल्यवर्धनमधील उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनवलेले तक्ते

मूल्यवर्धनमधील उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनवलेले तक्ते

या शाळेने मूल्यवर्धनचे महत्त्व जाणून वेळापत्रकात आठवड्याला ३ तासिका नेमून घेतलेल्या आहेत. मुख्याध्यापक म्हणाले की पाठाखालचे उपक्रम कदाचित घेतले जात नाहीत. पण मूल्यवर्धनच्या उपक्रमांसाठी स्वतंत्र तासिका नेमून दिल्यामुळे त्या त्या वेळेला मूल्यवर्धनचे उपक्रम घेतले जातातच आणि मुलेही त्याची मागणी करतात, आठवण करून देतात. त्यामुळे हे उपक्रम कोणताही खंड न पडता प्रत्येक वर्गात होतात. म्हणूनच या उपक्रमांचा एकूण परिणाम शाळेच्या वातावरणावर दिसून येतो आहे.     

राळेगणसिद्धी या गावाला भजन, कीर्तन व वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अध्यात्मिक वातावरण आहे. शाळेतील मुले घरूनच अनौपचारिक पद्धतीने टाळ – तबला वाजविण्याचे कौशल्य संपादन करतात. पण त्यांच्या या कलेला पूर्वी शाळेत फारसा वाव मिळत नसे. आता शाळेची रोजची प्रार्थना देखील वाद्यांच्या साथीसोबत होते. गावाची संगीत परंपरा शाळेत प्रतिबिंबित होत असल्यानेही आनंदी वातावरणात भर पडली आहे.

केंद्रप्रमुख बाळकृष्ण खोसे, या बदललेल्या वातावरणाचे मुख्य श्रेय मूल्यवर्धन उपक्रमांनाच देतात. ते म्हणतात,

“या शाळेची प्रतिमा पुन्हा उजळून काढण्यासाठी, शाळेकडे पाहण्याचा ग्रामस्थांचा दृष्टीकोन सकारात्मक होण्यासाठी, या वर्षाच्या सुरुवातीला सुरु झालेला मूल्यवर्धन कार्यक्रमच कारणीभूत आहे”.

शाळेतील सर्व शिक्षक याच वर्षी नवीन आले आहेत. त्यांनीही केंद्रप्रमुखांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. शिक्षक सुरेश गायकवाड म्हणाले,

” या शाळेकडे पाठ फिरवून इंग्रजी माध्यमाला गेलेल्या मुलांना पुन्हा या शाळेकडे वळविण्यासाठी मूल्यवर्धन चा उपयोग होत आहे. पुढच्या वर्षी शाळा सोडुन गेलेली अनेक मुले परत येणार आहेत, असे पालकांनी सांगितले आहे”.

नीला आपटे

Leave a Message