मूल्यवर्धनमुळे व्यापक संवेदनशीलता

इतरांविषयी आस्था हे मूल्यवर्धनचे एक मूल्य आहे. ते बंधुता या लोकशाही मूल्याशी संबंधित आहे. या आस्थेच्या परिघात फक्त मानवी समाजच नाही तर संपूर्ण पर्यावरण आणि सजीव सृष्टीचा समावेश होतो. जि. प. शाळा दत्तपूर, केंद्र घाटनांदूर, ता. आंबेजोगाई, जि. बीड या शाळेत मुले अशी संवेदनशीलता अनेक प्रकारे दर्शवितात.

शाळा ५ वी पर्यंतची आहे. एकूण ३६ विद्यार्थी व २ शिक्षक आहेत. यापैकी १५ मुले या गावातील आहेत व इतर सर्व मुले ही शेजारच्या घाटनांदूर गावातून येतात. खरे तर घाटनांदूर हे छोटे शहर आहे. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा तेथे आहेत. असे असताना देखील २१ मुले इतक्या दुरून, रिक्षाने येतात यावरूनच या शाळेची गुणवत्ता विशेष आहे हे लक्षात येते. जून २०१७ पासून या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 

आपण जेव्हा वर्गात जातो तेव्हा मुलांनी केलेली कलाकुसर चहूकडे नजरेस पडते. मुलांनी स्वताची बस्करे स्वतः तयार केली आहेत. कागदाची कलाकुसर टेबल व भिंतीवर मांडलेली आहे. उपलब्ध साहित्यातून नाविन्यपूर्ण उपयुक्त वस्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दगडाला निसर्गतः असलेल्या खोबणीचा उपयोग पेन स्टँड प्रमाणे केलेला आहे व ते टेबलावर ठेवलेले आहे.

शाळेत दरवर्षी भरणाऱ्या ‘आनंद नगरी’मध्ये खाण्याच्या पदार्थांची व कलाकुसरीच्या वस्तूंची दुकाने मुलांद्वारे मांडली जातात.

गावात होणाऱ्या सप्ताहाच्या वेळेला गाव-जेवण असते. त्यात लोक पत्रावळ्या एका ठिकाणी टाकायचे आणि तिथेच हात धुवायचे. सगळीकडे चिखल होत असे. पण मुलांनी या ठिकाणी स्वच्छता राखायची ठरवली. हात धुण्याची स्वतंत्र व्यवस्था करून प्रत्येकाला तिथे जाऊनच हात धुण्याची विनंती मुलांनी स्वत: पुढाकार घेऊन केली. परिसरात स्वच्छता राखली. पालकांनी मुलांना सहकार्यही केले आणि त्यांच्या या कृतीचे कौतुकही केले.

मुलांनी दिवाळीत फटाके वाजवणे थांबवले, आणि फटाक्या ऐवजी झाड लावायचे ठरवले.

शाळेतील काही मुले शांतता दूत म्हणून काम करतात. मुलांच्यातली भांडणे समजूत घालून सोडवतात. या शाळेतील मुले कविता, गोष्टी लिहितात, बालसाहित्य संमेलनात सहभाग घेतात. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा गावात सद्भावना गट आहे. शाळेच्या सर्व कामात आवश्यक असेल तेव्हा ती मुले सहकार्य करतात.

या शाळेत ३ मुले अशी आहेत ज्यांचे पालक घाटनांदुरच्या शाळांमध्ये शिक्षक आहेत. परंतु त्यांनी आपल्या मुलांना जाणीवपूर्वक या शाळेत घातलेले आहे. शिक्षिकेने सांगितले की “मूल्यवर्धनचे उपक्रम सुरु केले आणि मुलांना काही वेगळे गृहपाठ मी दिले होते. तेव्हा एका मुलीच्या शिक्षक पालकांचा रात्री फोन आला. शाळेत काही वेगळा उपक्रम, विषय सुरु आहे का? आमची मुलगी घरी येऊन शाळेत काय काय केले ते सांगत असते तेव्हा कळाले.”

आणखी एक बोलके उदाहरण इ. ४ थीच्या वर्गातील एक मुलगी छान गब्दुल आहे. ‘बिनधास्त बंटी’ हा पाठ घेतल्यानंतर तिने ठरवले की यानंतर सारखे-सारखे वेफर्स खाणार नाही. तिने आपले वजन कमी करायचे ठरवले आहे असे तिची आई सांगत होती. असे छोटे-मोठे अनेक परिणाम मूल्यवर्धनच्या उपक्रमांचे होत आहेत.

मूल्यवर्धनचा प्रभाव दाखवणारा या शाळेत घडलेला एक प्रसंग खूपच बोलका आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या शाखेने एकदा परिसरातील शाळांची उत्कृष्ठ परिपाठाची स्पर्धा आयोजित केली होती आणि अचानक भेटीसाठी त्यांचे कार्यकर्ते शाळेच्या परिपाठाच्या वेळेस आले होते.

परिपाठ चालू असतानाच भिंतीवर एक मोठा साप सर्वांना दिसला. त्यावेळी पूनम नावाची मुलगी शांतपणे समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, आपण कालच प्राण्यांशी कसे वागावे हे मूल्यवर्धनमध्ये शिकलेलो आहोत. साप दिसला तर काय करायचे हे आपल्याला बाईनी सांगितले आहे. कोणीही गडबड गोंधळ, पळापळ न करता, न घाबरता, आहात त्याच ठिकाणी बसून राहा. हे ऐकताच, मुले शांत राहिली. सापही शांतपणे निघून गेला. मूल्यवर्धनच्या उपक्रमाने हे प्रसंगावधान मुलांच्यात आणले आणि ती समयसूचकतेने वागली.

ही संपूर्ण घटना प्रबोधिनीचे कार्यकर्ते तटस्थपणे पाहत होते आणि मुलांचा हा उत्स्फूर्त सहभाग आणि जबाबदारीची वागणूक पाहून त्यांनी या शाळेची निवड उत्कृष्ठ परिपाठासाठी केली. 

अशा प्रकारे मुले इतर मुलांशी तसेच पर्यावरणातील इतर घटकांशी देखील संवेदनशीलपणे वागताना दिसत आहेत.

नीला आपटे

Leave a Message