मुले बनत आहेत शिक्षक

एका शाळेत असलेले एकमेव शिक्षक मूल्यवर्धन उपक्रमांच्या आधारे चार वेगवेगळ्या वर्गांतील सर्व मुलांना शिकवयाला कुशल होत आहेत.

जर एखाद्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंतच्या सर्व मुलांसाठी एकाच शिक्षक असतील तर मुलांना चांगल्या प्रकारे शिकविणे त्या शिक्षकासाठी खूपच अडचणीचे असू शकते. मात्र अशा परिस्थितीत एका शिक्षकाने या अडचणीचे  रुपांतर आपल्या शक्तीत केले आहे. हे शक्य झाले मूल्यवर्धन शिक्षण पद्धतीमुळे.

सांगलीपासून जवळपास १०० किलोमीटर दूर असलेल्या आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुलाराम बुआचा शाळेतील शिक्षक सुनील गायकवाड इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या २० मुलांना चांगल्याप्रकारे शिक्षण देण्यासाठी मूल्यवर्धन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत आहेत. जवळपास २५० लोकसंख्या असलेले तुलाराम बुआचा शेडफले गावापासून ५ किलोमीटर अंतरावर छोटे शेतकरी आणि शेतमजूरांची वस्ती आहे. येथील शाळेत जुलै २०१६ पासून मूल्यवर्धन तासिका आयोजित केल्या जातात.

सुनील गायकवाड म्हणतात, “काही वर्षांपूर्वी माझ्यासाठी ही एक समस्या होती की मी एकट्याने शाळेच्या संपूर्ण वेळेत चार वेगवेगळ्या इयत्तेतील मुलांना कसे शिकवावे. मात्र मूल्यवर्धनने माझी समस्या ब-याच प्रमाणात कमी केली आहे.”

 

मूल्यवर्धन शिक्षण पद्धतीतून मुलांना एकमेकांच्या साथीने लिहायला, वाचायला प्रोत्साहित करताना शिक्षक

मूल्यवर्धन शिक्षण पद्धतीतून मुलांना एकमेकांच्या साथीने लिहायला, वाचायला प्रोत्साहित करताना शिक्षक

 हे कसे? असे विचारल्यावर सुनील गायकवाड म्हणतात की मूल्यवर्धनच्या नियमित तासिका आयोजित करण्यातून त्यांच्या मनात काही विचार आले. त्यानुसार त्यांनी चार वर्गातील मुलांची दोन खोल्यांत विभागणी केली. इयत्ता पहिली व दुसरीतील मुलांसाठी एक खोली आणि तिसरी आणि चौथीच्या मुलांसाठी दुसरी खोली. जेव्हा ते कोणत्याही एका वर्गखोलीतील मुलांना शिकवितात तेव्हा दुस-या वर्गखोलीतील मुले शिक्षकांशिवाय शिस्तीत अभ्यास करतात.

याविषयी सुनील गायकवाड म्हणतात, “मूल्यवर्धन शिक्षणपद्धतीमुले मुलांमध्ये ही शिस्त हळूहळू विकसित झाली. कारण मूल्यवर्धनच्या जवळपास सर्व उपक्रमांत मुलांना एकत्रित शिकण्यासाठी प्रेरित केले जाते. यामुळे जेव्हा कोणत्याही विषयावर मुलांना कोणतेही कार्य पूर्ण करायला सांगितले जाते, तेव्हा ते एकमेकांच्या सहकार्यातून पूर्ण करतात. त्यावेळी मला असे जाणवले की मुलांमध्ये विकसित होत असलेली जबाबदारीची भावना त्यांना शिस्तबद्ध बनवीत आहे.”

मूल्यवर्धन शिक्षक आपले अनुभव सदर करताना म्हणतात की जेव्हा मुले वेगवेगळ्या गटात शिकतात तेव्हा शिक्षकाचे काम खूपच सोपे होऊन जाते. यासाठी त्यांनी मूल्यवर्धन शिक्षण पद्धतीचा अवलंब अन्य विषयांच्या अध्यापनासाठी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना असे जाणवले की मुले बहुतांश प्रश्नांची सोडवणूक समूहात एकत्रितपणे करू लागले. अशी वेळ क्वचितच येते की मुले शिक्षकांना उत्तरे सांगण्याची विनंती करतात.

काही वेळा असेही होते की जेव्हा वर्गातील एका गटाला प्रश्नाची सोडवणूक करता येत नसेल तेव्हा ते वर्गातील इतर गटातील मुलांची मदत घेतात. अशाप्रकारे मुले शिकण्यासाठी स्वत: प्रयत्न करू लागली. अशावेळी काही मुले शिक्षकांची जबाबदारी निभावू लागले आणि त्यांना परस्परांच्या सहकार्यातून शिकणे आणि शिकविण्याचा आनंद मिळू लागला. शिक्षक अशा मुलांना प्रोत्साहन देऊ लागले.

सुनील गायकवाड म्हणतात, “पूर्ण वर्गाला केवळ मुलांच्या भरवशावर सोडता येत नाही. यासाठी मी एका खोलीत दोन वर्गातील मुलांना सोबत बसण्यास सांगितले. आमच्या शाळेत मुलांची संख्या कमी आहे. म्हणून एका खोलीत दोन वर्गातील मुलांना बसविणे, त्यांच्याकडे लक्ष देणे थोडे सोपे जाते. यामुळे असा फायदा झाला की आता वर्गखोल्या लक्षात घेऊन मुलांना द्यावयाचे अध्ययन अनुभव मी पहिल्यापेक्षा चांगल्याप्रकारे बनवू शकतो. आता मी दोन्ही वर्गातील मुलांसाठी  जवळपास निम्मा वेळ देऊ लागलो.”

या दरम्यान शिक्षकांनी आपल्या जबाबदारीची दोन भागात विभागणी केली. पहिल्या भागात कोणत्याही विषयाचा नवीन पाठ मुलांना ते स्वत: चांगल्याप्रकारे शिकवितात. त्यानंतर ते अशा मुलांची निवड करतात की ज्या मुलांना पाठ चांगला समजला असेल. त्यानंतर ते त्यावर्गातील मुलांना गटात शिकण्याची संधी देऊन दुस-या वर्गात वेगवेगळ्या इयत्तेतील मुलांना शिकविण्यासाठी जातात.

सुनील गायकवाड स्पष्ट करतात, “माझा अनुभव आहे की एकत्रित इयत्तेचे काही फायदे होतात. उदाहरणार्थ, पहिलीतील मुले दुसरीतील मुलांच्या बरोबर शिकतात तेव्हा त्यांच्या अध्ययन अनुभवत जास्त अंतर असत नाही. यामूळे असा फायदा होतो की काही वेळा पहिलीतील मुले दुसरीतील पाठ शिकण्याचा प्रयत्न करतात. हे करताना दोन्ही इयत्तेतील मुले एक-दुस-याच्या शिक्षणात बाधा आणत नाहीत. त्यांना एक-दुस-यांचे विषय शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळते.”

वास्तविक कौशल्यपूर्ण शिक्षकाशिवाय हे फायदे संभव नसतात. मात्र हे सुनील गायकवाड यांच्या मेहनतीचे फळ म्हणावे लागेल की शिक्षणाच्या बाबतीत या शाळेची गणना जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून केली जाते. मागील काही वर्षांच्या परीक्षेतील यशावरून असे स्पष्ट होते की पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता सतत वाढत आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत सुनील गायकवाड यांना सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा होतो की मुले शिक्षकाची भूमिका पार पडतात. ते स्पष्ट करतात, “काही वेळा मी इयत्ता तिसरी आणि चौथीतील मुलांची एक जोडी बनवून त्यांना वाचायला सांगतो. त्यामुळे एका मुलाचे शिक्षण होते तर दुस-याची उजळणी होते. यातून शिकणारी मुले स्वत:ला शिक्षक समजतात.

शेवटी सुनील गायकवाड मूल्यवर्धन उपक्रमांचा उल्लेख करतात. ते म्हणतात, “जास्तीत जास्त मुले शिक्षकासारखे अनुभवतात. यापाठीमागे मूल्यवर्धन उपक्रमांतून मुलांमध्ये जबाबदारीची भावना वाढीस लागत आहे. यासाठी मूल्यवर्धनमध्ये एक विभाग आहे ‘माझ्या जबाबदा-या’. या विभागातील उपक्रमांतून मला माझा उद्देश सफल करण्यास मदत मिळत आहे.”