मुलांची आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती – मूल्यवर्धनची किमया

चिकित्सक आणि सर्जनशील विचार हे मूल्यवर्धनचे एक महत्त्वाचे मूल्य आहे.  ते  मुलांना स्वातंत्र्य व न्याय या लोकशाही मूल्यांकडे घेऊन जाते. मूल्यवर्धनच्या उपक्रमातून मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्याची व ते व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मुले बोलकी होतात. याचा अनुभव जि. प. शाळा, घोराड, केंद्र चानाकी, ता. सेलू, जि. वर्धा या शाळेत आला.

या शाळेचा पट आहे एकूण १२०. वर्ग १ ली ते ४ थी आणि शिक्षक संख्या ४. यांपैकी इयत्ता १ली च्या शिक्षिका मनिषा पराते यांनी डिसेंबर २०१७ मध्ये  मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले व त्यानंतर प्रेरक म्हणून काम केले. त्यामुळे त्यांच्या वर्गात सुरुवातीपासूनच मूल्यवर्धनचे उपक्रम व्यवस्थित केले जातात. इतर शिक्षकांचे प्रशिक्षण ऑक्टोबर २०१८ मध्ये झाले. त्यानंतरची दिवाळीची सुट्टी व शाळेतील अन्य कार्यक्रम यामुळे इतर वर्गांत उपक्रम घ्यायला त्या शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाला नाही असे इतर शिक्षकांनी सांगितले.

जि प प्रा शा घोराड. शाळेची इमारत

जि प प्रा शा घोराड. शाळेची इमारत

दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ रोजी शाळा भेटी दरम्यान, इयत्ता १ली चा वर्ग, जिथे मूल्यवर्धन वर्षाच्या सुरुवातीपासून राबविले जाते व ३ री ४ थी चे वर्ग जिथे मूल्यवर्धनचे उपक्रम विशेष घेतले गेलेले नाहीत, या दोहोंमधील मुलांच्या अभिव्यक्ती व प्रतिसादामध्ये बरीच तफावत दिसली. वयाने, अनुभवाने लहान असलेली १ ली ची मुले मुले जास्त चुणचुणीत व बोलकी आहेत. विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रतिसाद देत आहेत असे दिसले. तर इयत्ता ४ थी च्या वर्गात तोच उपक्रम घेऊन तेच प्रश्न विचारले असता कमी प्रतिसाद मिळाला.

वर्गात मूल्यवर्धनचा उपक्रम करताना शिक्षिका आणि विद्यार्थी

वर्गात मूल्यवर्धनचा उपक्रम करताना शिक्षिका आणि विद्यार्थी

मुलांमधील या फरकाची इतरही अनेक कारणे असतील, परंतु मुक्तपणे विचार करून संवाद साधण्याची संधी पहिलीच्या मुलांना मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे मिळाली. तशी संधी ३ री व ४ थीच्या मुलांना मिळाली नसावी असे प्रकर्षाने जाणवले.

यापेक्षा अगदी विरुद्ध अनुभव १ ली च्या वर्गात आला. वर्गात शिक्षिका राजाची गोष्ट सांगत होत्या. मुले गोल करून बसली होती. राजा स्पर्श करेल ती वस्तू सोन्याची होईल असे वरदान मिळालेल्या राजाची ती गोष्ट होती. सर्व मुले गोष्ट ऐकण्यात दंग होती. अधूनमधून विचारलेल्या अभिनयातून किंवा बोलून उत्तरे, प्रतिसाद देत होती. शिक्षिका गोष्ट सांगत होत्या, “… एकदा राजकन्या, राजाची मुलगी धावत धावत बाबांजवळ यायला लागली. तिने जवळ येऊ नये म्हणून राजा दूर सरकू लागला. तुम्ही आई, बाबांच्या जवळ जाऊन कसे बिलगता?” असे शिक्षिकेने विचारताच मुले, मुली आपापल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना बिलगून बसली. अशापद्धतीने गोष्टीचे कथन करण्यात शिक्षिका आणि गोष्ट ऐकण्यात मुले दंग झाली होती.

झुझू बाहुलीशी संवाद हा मूल्यवर्धनचा एक प्रभावी उपक्रम आहे. मुलांना कल्पना करून व्यक्त होण्याची, संवाद साधण्याची, प्रश्न विचारण्याची संधी देण्यासाठी झुझू बाहुली सोबतचे उपक्रम घेतले जातात. १ लीच्या मुलांनी झुझू बाहुलीला काल्पनिक पाहुणा समजून खूप वेगवेगळे प्रश्न विचारले होते. पण ४ थीची मुले खऱ्याखुऱ्या पाहुण्यालाही नाव, गाव, आवडता पदार्थ यापुढे प्रश्न विचारू शकली नाहीत.      

१ ली व ३ री – ४ थीच्या वर्गातील या अनुभवांवरून असे जाणवते की मूल्यवर्धनचे उपक्रम मुलांना चिकित्सक विचार करण्याची, मत व्यक्त करण्याची, प्रश्न विचारण्याची संधी देतात. त्यामुळे त्यांच्या अभिव्यक्त होण्याच्या क्षमता, आत्मविश्वास, विकसित होण्याला गती मिळते. त्यामुळेच या शाळेतील मुलांनी, १ लीतील मुले शाळेत नवीन असल्याने लाजरी-बुजरी, अबोल असतात व वरच्या वर्गातील मुले शाळेत व्यवस्थित रुळली असल्याने मोकळेपणाने, कशाचेही दडपण न घेता व्यक्त होऊ शकतात असा सर्वसामान्य समज चुकीचा ठरविला आहे.    

नीला आपटे

Leave a Message