नेहमीचे प्रश्न

 • शालेय वयातच मुलांमध्ये राज्य घटनेतील मूल्ये रुजावित, हेच विद्यार्थी लोकशाहीभिमुख नागरिक घडावेत हा मूल्यवर्धन कार्यक्रमाचा उद्देश आहे. मूल्यवर्धन अंतर्गत विद्यार्थ्यांना काय चांगले, काय वाईट याचे शिक्षणही अगदी सोप्या पद्धतीने, हसत-खेळत दिले जाते.
 • विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती साधता यावी यासाठी शालेय व्यवस्थापन, शाळा आणि शिक्षक यांच्या क्षमता विकसित आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
 • मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न शाळा करीत असतातच पण मूल्यवर्धन उपक्रमामुळे त्याची व्याप्ती वाढून शाळांच्या प्रयत्नांना निश्‍चित आकार मिळू शकतो. मूल्यवर्धन उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरतो आणि बदलाच्या या प्रक्रियेत तो केंद्रस्थानी असतो.

मूल्यवर्धन कार्यक्रमाचा जो दृष्टीकोन आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना मूल्यांविषयी फक्त ज्ञान दिले जात नाही, तर ही मूल्ये आत्मसात करण्यासाठी आवश्यक त्या क्षमता त्यांना प्राप्त व्हाव्यात, यासाठी नियोजनबद्ध आणि पद्धतशीरपणे संधी दिल्या जातात. म्हणून शाळा करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम पूरक आणि प्रेरक ठरेल असा आहे.

 • प्राथमिक शिक्षण हा भावी आयुष्याचा पाया असतो. या वयामध्ये मुलांच्या मनावर जे संस्कार होतात ते दीर्घकाळ टिकतात.
 • शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी तर लागलीच आहे त्यासोबतच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीतील जबाबदार नागरिक घडविण्याचे कठीण काम हाती घेतले आहे.
 • मुलांमधून उत्तम लोकशाहीभिमुख नागरिक घडावेत हे ‘मूल्यवर्धन’चे प्रमुख दूरगामी उद्दिष्ट आहे. शाळा आणि मुलांमध्ये तात्काळ दिसणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :
 • मुले जबाबदारी घ्यायला शिकतात, इतरांना मदत करायला आणि त्यांची काळजी घ्यायला शिकतात.
 • मुले आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या वर्तनाबद्दल सारासार विचार करायला लागतात.
 • मुलांची भाषाविषयक आणि सामाजिक कौशल्ये विकसित होऊ लागतात.
 • शिक्षक-विदयार्थी संबंध सुधारतात.
 • मुलांमध्ये शाळेची आवड वाढीस लागते.
 • ‘मूल्यवर्धन’च्या विद्यार्थीकेंद्रित आणि समग्र शाळा कार्यपद्धतीमुळे शिकण्या-शिकविण्याची प्रक्रिया बदलते. त्यामुळे, पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळांची कार्यपद्धती बदलून प्रतिमा उंचावण्यास मदत होते.

मूल्यवर्धन वर्गउपक्रमांसाठी दर आठवड्याला फक्त ७० ते १०० मिनिटे द्यावी लागतात. हा वेळ शाळेच्या एकूण वेळेच्या ५ टक्क्यांपेक्षासुद्धा कमी आहे. ह्या वेळेतसुद्धा मुले अभ्यासक्रमाच्या निष्पत्तींशी संबधित उपक्रम करत असतील. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या ताणाचा प्रश्नच उदभवत नाही. ज्या अभ्यासक्रमामध्ये मूल्यशिक्षणासाठी किंवा जीवन-कौशल्ये विकसित करण्यासाठी दर आठवड्याला वेळ राखून ठेवलेला असतो, तेथे हा प्रश्न उद्भवणार नाही.

मूल्यवर्धन कार्यक्रमाची रचना अभ्यासपूर्ण आराखड्यावर आधारित आहे. त्यामध्ये कार्यक्रमाची संकल्पना, अध्ययन निष्पत्ती हे सर्व स्पष्ट केलेले असते. हा आराखडा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांसारख्या अधिकारी संस्थांनी तपासून संमत केलेला आहे.

मूल्यवर्धनचे वर्गातील उपक्रमसुद्धा महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या तज्ज्ञ गटाने तपासले आहेत.

मूल्यवर्धन कार्यक्रमाचा हेतू आणि मूल्ये मान्य असणाऱ्या शाळा अथवा शाळा संचालकांना, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन मूल्यवर्धन कार्यक्रम मोफत देते.

शाळांना खालील प्रकाराची मदत दिली जाते :

 • शैक्षणिक आणि प्रशिक्षण साहित्य
 • संबंधित अधिकारी वर्गासाठी परिचय शिबिरे
 • शिक्षकांसाठी क्षमतावृद्धी कार्यशाळा.

शांतिलाल मुथ्था फाउंडेशन मूल्यवर्धन कार्यक्रम पूर्ण करण्यास मदत करते. निष्पत्तींचे स्वतंत्र मूल्यमापन करण्याची व्यवस्था करते. तसेच, शाळेमधील आणि मुलांमधील बदलांची नोंद ठेवते.

 • मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव व सहकार्याची भावना वाढीस लागते.
 • मुले स्वत:च्या आणि इतरांच्या वर्तनाबाबत विचारी होतात.
 • मुलांची भाषिक व सामाजिक कौशल्ये वाढीस लागतात.
 • मुले व शिक्षक यांच्यातील संबंध अधिक दृढ होतात.
 • मुलांना शाळेबद्दल अधिक गोडी वाटते.
 • उपरोक्त मुद्द्यांमुळे शाळेच्या कामगिरीत सुधारणा होऊन शिक्षकांनाही कामात आनंद मिळतो.

मुलांच्या वर्तनातील सकारात्मक बदलांतून मूल्यवर्धन कार्यक्रमाचा परिणाम सहज दिसून येईल. सकारात्मक बदल अपेक्षित निष्पत्तींशी पडताळून पाहणे शक्य आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती साध्य करू लागतात तेव्हा ते लोकशाही मूल्ये आत्मासात करू लागले आहेत, असे दिसून येते.

याच अध्ययन निष्पत्तींच्या आधारे विद्यार्थ्यांचे निरीक्षण करुन सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची नोंद करू शकता. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी प्रत्यक विद्यार्थ्याबद्दल त्यांच्या मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेत टिप्पणी लिहू शकता.