दोन वर्षे मोहीम राबवून मुलांनी वस्ती केली नशामुक्त!

 

विद्यार्थ्यांसोबत अभिनय गीत घेताना शिक्षक

नशेच्या आहारी गेलेल्या कुठल्याही व्यक्तीची ती सवय बदलवणे खूप अवघड असते, पण सांगली जिल्ह्यातील एका शाळेच्या लहान मुलांनी फक्त दोन वर्षात पूर्ण वस्तीची नशा करण्याची सवय सोडवली. हा मूल्यवर्धनचा परिणाम आहे असे शिक्षक सांगत आहेत.

सांगलीपासून साधारण १५० किलोमीटर दूर जत ब्लॉकमधील पांडेझरी हे एक छोटेसे  दुष्काळग्रस्त गाव आहे. येथील शेतकरी शेतात ज्वारी आणि बाजरी पिकवतात. याशिवाय पाणी उपलब्ध असताना द्राक्षे शेतीला प्राथमिकता दिली जाते. वस्ती विरळ आहे आणि लोकसंख्याही कमी आहे. चंद्रकांत कांबळे या गावचे सरपंच आहेत.

कांबळे सांगतात, “दीड-दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. घटना घडली की मी विचारदेखील केला नव्हता. दुसरीत शिकणारा माझा मुलगा अरविंद मला म्हणाला की तो जेवण करणार नाही. मी त्याला जेवण्यासाठी खूप समजावलं आणि त्याच्या या हट्टामागचं कारण विचारलं. त्याने सांगितलं की तुम्ही व्यसन करणे बंद करा.”

कांबळे यांनी सांगितले की हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले. गावात त्यांना असे  कोणीच म्हटले नव्हते. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्यायला ते दुसऱ्या दिवशी बाबरवस्तीच्या प्राथमिक शाळेत गेले. बाबरवस्ती पांडेझरी गावचीच एक वस्ती आहे. अरविंद याच शाळेत शिकतो. दिलीप वाघमारे त्याला शिकवतात.

कांबळे यांनी दिलीप वाघमारे यांना संपूर्ण घटना सांगितली. यानंतर चंद्रकांत म्हणाले, “दिलीप सरांना भेटल्यावर मला मूल्यवर्धनविषयी कळालं. सरांनी मला सांगितलं की मूल्यवर्धनच्या वर्गात मुलं आपल्या चांगल्या आणि वाईट सवयींबद्दल बोलतात.”

याविषयी दिलीप वाघमारे सांगतात :

“मूल्यवर्धनच्या उपक्रमात आमच्या मुलांनी आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या चांगल्या आणि वाईट सवयी ओळखल्या होत्या. हे करत असताना विद्यार्थ्यांनी दारू आणि तंबाकूचे सेवन आरोग्यासाठी कशाप्रकारे हानिकारक असते यावर देखील चर्चा केली. यामुळे, अरविंदला वाटत होते की त्याच्या वडिलांनी या पदार्थांचे सेवन करू नये. त्यांनी वडिलांना  सांगितले की जर त्यांनी या पदार्थांचे सेवन बंद केले तर गावातील इतर लोकांची सवय सोडवायला देखील मदत होईल.”

हे ऐकून चंद्रकांत कांबळे भावूक झाल्याचे दिलीप यांनी सांगितले. मग त्यांनी सरपंच या नात्याने लहान मुलांच्या नेतृत्वात गावातील लोकांसाठी व्यसनमुक्ती मोहीम राबवण्याचा संकल्प केला.

दिलीप वाघमारे बावरवस्तीच्या शाळेत पहिली ते चौथीच्या एकूण ४८ विद्यार्थ्यांना शिकवतात. यामध्ये २६ मुले आणि २२ मुली आहेत. गावातील बहुतांश लोक ऊस तोडणीसाठी स्थलांतर करतात. या शाळेत २०१७ पासून मूल्यवर्धनची अंमलबजावणी सुरु आहे.

 

विद्यार्थ्यांसोबत अभिनय गीत घेताना शिक्षक

विद्यार्थ्यांसोबत अभिनय गीत घेताना शिक्षक

दिलीप यांच्या मते नशा-मुक्ती अभियान बरंच अडचणीचं होतं. ते सांगतात, “३०० लोकसंख्या असणाऱ्या आमच्या वस्तीच्या या शाळेत शिकण्यासाठी एकूण ५० विद्यार्थी देखील नव्हते. त्यामुळे आमच्यासमोर पहिला प्रश्न होता – आम्ही काय करायचं?”

दिलीप यांच्या मते नशामुक्ती अभियान बरेच अडचणीचे होते. ते पुढे म्हणतात, “३०० लोकसंख्या असणाऱ्या आमच्या वस्तीच्या या शाळेत शिकण्यासाठी एकूण ५० विद्यार्थी देखील नव्हते. त्यामुळे आमच्यासमोर पहिला प्रश्न होता – आम्ही काय करायचं?”

दिलीप म्हणाले की सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मूल्यवर्धनची काही विशेष सत्रे आयोजित केली. त्यात व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. मग विद्यार्थी त्यांच्या घरी, शेजारी, गल्लीतील आणि परिसरातील लोकांना व्यसनाच्या दुष्परिणामांबद्दल सांगू लागले. विद्यार्थी गावातील लोकांना तंबाखू खाल्ल्याने देशातील आणि जगभरातील किती लोकांना तोंडाचा कर्करोग झाला हे सांगत.

शाळेतील विद्यार्थी गावातील लोकांना तोंडाच्या कर्करोगाचे फोटो दाखवत फिरायचे आणि नंतर अशी वेळ आली की या विद्यार्थ्यांच्या परिवारातील लोकांनी विद्यार्थ्यांसोबत मिळून पूर्ण गावात व्यसनमुक्ती फेरी काढली.

तिसरीमध्ये शिकणारी आरती कौरे म्हणते, “जेव्हा मी माझ्या आजोबांना गुटखा सोडायला सांगितले तेव्हा त्यांनी ऐकले नाही. मी पुन्हा पुन्हा सांगितले तरी ते लपूनछपून गुटखा खायचे. एकदा त्यांना गुटखा खाताना बघून मी रडायला लागले तेव्हा ते म्हणाले की रडू नको. आता नाही खाणार गुटखा!”

तिसरीचीच गोडप्पा धनसरी म्हणते, “माझे बाबा मला पैसे देऊन गुटखा आणायला सांगायचे. एक दिवस मी त्यांना म्हटलं, हे (गुटखा) खाणं जर इतकं चांगलं आहे तर ते मी पण खाणार! ते म्हटले हे खूप खराब असतं. मी म्हटलं असं असतं तर तुम्ही खाल्लाच नसता. असं म्हणून मी त्यांचं गुटखा खाणं बंद केलं.”

ग्रामस्थ गोडप्पा कुलाडे सांगतात की व्यसनं एवढ्या सहज सुटत नाहीत पण, मुलांच्या प्रेमापोटी आम्ही द्रवलो. गोडप्पा कुलाडे यांच्या मते गावात दोन वर्षांपूर्वी गुटखा खाण्याचे प्रमाण अधिक होते. आज अशी परिस्थिती आहे की पन्नासातून एखादा व्यक्ती गुटखा खाताना दिसते. परंतु गावातील लोक अशा माणसांना गुटखा खायला मनाई करतात.

दिलीप सांगतात त्यांनी शालेय स्तरावर बरेच सांकृतिक कार्यक्रम घेतले. “नशा सोडणे का गरजेचे आहे?” अशा विषयांवर व्याख्यान आयोजित केले. यामध्ये व्यसनांशी संबंधित विषयतज्ञांना बोलावले. यामध्ये विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचादेखील समावेश होता. याशिवाय व्यसनमुक्ती शिबीरही आयोजित केले होते.

ग्रामस्थ बालाजी पडलवार यांनी सांगितलं, “दारूच्या दुष्परिणामांबद्दल मला माहिती नव्हती, असं नाही. पण जेव्हा मुलं आणि सगळा गाव दारू प्यायला मनाई करायला लागला तेव्हा मी विचार केला की कशाला दारू पिऊन वातावरण खराब करायचं?”

शेवटी कल्पना कौरे नावाच्या वृद्ध महिलेने सांगितले,

“मोठे असल्याच्या नात्याने लहानांना चांगल्या सवयी शिकवणे हे आपले काम असते. पण जेव्हा लहान मुलं आपल्याला सांगतात काय चांगलं आणि काय वाईट आहे, तेव्हा सुरुवातील वाईट वाटलं तरी शेवटी चांगलंच वाटतं.”

सहयोगी खेळ खेळताना विद्यार्थी

सहयोगी खेळ खेळताना विद्यार्थी

शिरीष खरे.

Leave a Message