ज्याच्या भांडणाला सर्व कंटाळले होते, आता तोच विद्यार्थी बनला शाळेत अव्वल

एका मुलाच्या रागाला आणि रोजच्या भांडणाला कंटाळून त्यांच्या घरातील लोकांनी आणि परिसरातील लोकांनी त्याच्यात परिवर्तन घडण्याची अशा सोडून दिली होती, पण आज तोच मुलगा शाळेचा आदर्श विद्यार्थी बनला आहे. त्याच्या शिक्षिका शमा शेख यांच्या म्हणण्याप्रमाणे हे परिवर्तन मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे झालेले आहेत.

शमा शेख या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंभारवाडी येथील शिक्षिका आहेत. ही शाळा रत्नागिरी पासून ४० किलोमीटर दूर लांजा ब्लॉकमध्ये येते.

मराठी माध्यमाची ही शाळा सन १९८५ मध्ये स्थापन झाली होती. म्हणायला शाळा कुंभार वस्तीत आहे, पण ६०० लोकसंख्येच्या या वस्तीत आता कोणतेच कुटुंब मडके बनवत नाही. बहुतांश पुरुष येथून २ किलोमीटर दूर असणाऱ्या लांजा येथे कामगार म्हणून जातात, तर स्त्रिया दुसऱ्यांच्या घरी काम करतात. या शाळेत फक्त १७ विद्यार्थी शिकतात. त्यांना शिकवण्यासाठी येथे दोन शिक्षिका आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका

शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका

दोन वर्षांपूर्वी शमा शेख ज्या विद्यार्थ्याच्या वागणुकीबद्दल चिंतेत होत्या, अशा मुलाची गोष्ट सांगतात.

“गोंधळ आणि खोड्या तर सर्वच विद्यार्थी करतात, पण हा विद्यार्थी फक्त गोंधळ आणि खोड्या काढणे एवढेच करायचा. अभ्यास मात्र काहीच करीत नव्हता. तरीही ही काही मोठी समस्या नव्हती. समस्या होती त्याची वर्तवणूक. तो शाळेतील वस्तूंची तोडफोड करायचा. कोणाचेही ऐकायचा नाही. दोन वर्षांपूर्वी तो पहिलीत होता. आता तुम्ही म्हणाल की पहिलीच्या मुलाचा काय एवढा विचार करायचा? पण, त्या लहान वयातच त्याच्यात राग ठासून भरलेला होता. इतका की मी सांगू देखील शकणार नाही.”

शमा शेख ज्या विद्यार्थ्याबद्दल बोलत आहेत तो आता इयत्ता तिसरीत शिकणारा अथर्व (नाव बदललेले) आहे. त्या सांगतात की त्यावेळी अथर्व घरी, शाळेत आणि परिसरात आपल्यापेक्षा लहान आणि मोठ्या मुलांसोबत भांडत असे. कधी तो इतर मुलांना मारायचा तर कधी स्वतः मार खायचा. शमा त्याच्या अशा वागणुकीमुळे चिंतीत राहायच्या.

पण दोन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये लांजा येथे मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना एक मार्ग सापडला. चार दिवसांच्या प्रशिक्षणात त्यांना मूल्यवर्धनमध्ये वापरल्या जाणाऱ्या शिकवण्याच्या पद्धतींनी प्रभावित केले. त्यांना वाटले की विद्यार्थ्यांमध्ये बदल घडविण्यासाठी हा एक प्रभावशाली मार्ग असू शकेल. आणि त्यांचा हा अंदाज आज बरोबर ठरला आहे.

मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या बदलांना समजाविण्यासाठी शमा शेख यांनी वर्गात विद्यार्थ्यांसोबत एक उपक्रम केला. यावेळी विद्यार्थी वर्तुळ करून बसतात. विद्यार्थ्यांनी इयत्ता तिसरीची विद्यार्थी उपक्रम पुस्तिका उघडलेली होती. एका नंतर एक विद्यार्थी उभे राहून एका गोष्टीतील काही ओळी वाचत होते.  गोष्टीचे नाव गैरसमज होते. ही गोष्ट चंदू आणि सागर नावाच्या मित्रांमध्ये गैरसमजामुळे झालेल्या भांडणाविषयी आहे.

मूल्यवर्धनच्या उपक्रमात रमलेले विद्यार्थी आणि शिक्षिका

मूल्यवर्धनच्या उपक्रमात रमलेले विद्यार्थी आणि शिक्षिका

गोष्ट पूर्ण वाचून झाल्यानंतर दोन मित्रांनी आपआपसात होणारे भांडण कसे टाळायला हवे यावर विद्यार्थ्यांनी चर्चा केली.

वर्तुळचर्चेत आपले मत मांडताना एक विद्यार्थी

वर्तुळचर्चेत आपले मत मांडताना एक विद्यार्थी

इतर विद्यार्थ्यांसोबतच अथर्व देखील वर्तुळात बसून या चर्चेत सहभागी झालेला होता. चंदूच्या जागी तू असतास तर काय केले असते? असे विचारल्यावर तो म्हणाला, “मी चंदूच्या जागी असतो तर सागरची माफी मागितली असती. कारण वडिलांनी चंदूसाठी जो पेन आणला होता, तसाच पेन सागरकडे देखील होता. आणि चंदूचा गैरसमज झाला होता की सागरने पेन चोराला आहे.” अथर्व पुढे म्हणाला, “चूक असल्यावर ती मान्य करण्यात किंवा सॉरी म्हणण्यात काहीच कमीपणाचे नाही.”

उपक्रम संपल्यानंतर अथर्वने आम्हाला सांगितले की त्याला मूल्यवर्धनचे उपक्रम खूप आवडतात. विशेषकरून त्यातील गोष्टी त्याला आवडतात. कारण त्याला आधी जे माहित नव्हते असे या गोष्टींमध्ये खूप काही आहे.

अथर्वबरोबर शिकत असलेले यश, रोशन, संजना आणि पूनम यांनीदेखील अथर्वच्या वागणुकीतील बदल बघितला आहे. या विद्यार्थ्यांनी सांगितले की दोन वर्षांपूर्वी अथर्वला राग आल्यावर तो अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारायचा. यामुळे कोणीच त्याच्याशी बोलत नसे, पण आता असे नाहीये. आता सगळ्यांना तो आवडतो आणि तो देखील सर्वांचा मित्र बनला आहे.

शमा यांनी सांगितलं की इतर विद्यार्थीदेखील अथर्वला बदलायला मदत करत आहेत. याचा अर्थ आहे की त्यांच्या वागणुकीत देखील बदल झाला आहे. खरे तर मूल्यवर्धनच्या उपक्रमांत सर्वच विद्यार्थ्यांचे मन रमते. अथर्व तर एक उदाहरण आहे. त्याच्यासारख्या इतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली आहे. त्यांनी आपल्या चुकांपासून धडा घेतला आहे आणि त्या दूर केल्या आहेत.

शमा पुढे म्हणाल्या,

“अथर्वमध्ये झालेले परिवर्तन म्हणजे माझ्यात झालेले परिवर्तन आहे, कारण मूल्यवर्धनमुळे माझे विचार बदलले, मला नवी दिशा मिळाली आणि मी बघितले की दोन वर्षांत मी अशा एका मुलाची वागणूक बदलवली जो खूप उग्र आणि हिंसक होता.”

शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा कामत यांच्या मते मूल्यवर्धनचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या वयाला लक्षात घेऊन बनवला आहे. यामुळे इतरांसोबत कशाप्रकारे बोलायला हवे हे विद्यार्थी समजू शकतात. त्यांनी पुढे सांगितले की अथर्वच्या आई बरेचदा शाळेत यायच्या तेव्हा तक्रार करायच्या की अथर्व शिव्या शिकत आहे. आता मात्र त्याची अशी काही तक्रार नाहीये. उलट, अथर्वमधील चांगल्या बदलांचा परिणाम इतर मुलांवरही पडला आहे.

अथर्वची आई विजिता (बदललेले नाव) यांनी सांगितले, “वयानुसार तर मुलं समजूतदार होतातच, पण मला वाटतं शमा मॅडमनी त्याला बदलवलं.”

शेवटी, शमा यांनी आम्हाला सांगितले, “तिसरीतून चौथीत गेल्यावर मूल्यवर्धनच्या उपक्रमांतून अथर्वमध्ये अजून बदल नक्की घडतील. हे बदल बघायला पुढच्या वर्षी तुम्ही परत या.”