चिकित्सक विचार करणारी मुले व कुतूहल जागे करणाऱ्या शिक्षिका

सांगावी येथील शाळेची इमारत

सांगावी येथील शाळेची इमारत

सांगवी हे अकोला जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. गावच्या जवळचे शहर मूर्तिजापूर १७ कि. मी. अंतरावर आहे. गावातील बहुतेक सर्वजण शेतमजूरी करणारे आहेत. काही लोक गावाबाहेर राहून नोकरी करतात. गावातील १०-१२ मुले शेजारच्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. अशा या छोट्याशा गावातील एक छोटीशी शाळा. परिसर अगदी लहान, पण नीटनेटका, सर्व मूलभूत भौतिक सुविधांनी युक्त असा. शाळेची टुमदार इमारत, हसरी, खेळती मुले आणि उत्साही शिक्षिका – शीतल जाधव, शाळेत पाऊल ठेवताच येणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात. या शाळेत मूल्यवर्धनची अंमलबजावणी जून २०१८ पासून करण्यात येत आहे.

शाळेत पहिली ते पाचवीचे वर्ग असून शाळेचा एकूण पट २३ व शिक्षक २ आहेत. शीतल जाधव गेली १० वर्षे शिक्षिका म्हणून काम करत आहेत. पहिली सहा वर्षे सातारा येथे तर गेल्या ४ वर्षांपासून जि. प. शाळा, सांगवी, जि. अकोला या शाळेत कार्यरत आहेत. शाळा भेटीच्या दिवशी मुख्याध्यापक रजेवर असल्याने सर्व वर्ग शीतलताईच सांभाळत होत्या. शीतलताईंनी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण पहिल्या टप्प्यात घेतले व त्यानंतर केंद्रस्तरावरील प्रशिक्षणांमध्ये प्रेरक, तज्ञमार्गदर्शक म्हणून काम केले.

शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थी आणि शिक्षिका

शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थी आणि शिक्षिका

या शाळेचे काम समजावून घेताना लक्षात येते ते शिक्षिका व विद्यार्थी यांच्यातील  प्रेम, आपुलकीचे नाते व शाळेचे आनंदी वातावरण. शीतलताईंनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पना शाळेत राबविल्या आहेत. मूल्यवर्धनमधील अनेक संकल्पना/पद्धतींचे प्रतिबिंबही शालेय कामकाजात उमटलेले दिसते. शीतलताईंचा सृजनशील व कृतिशील सहभाग असल्याने हे शक्य झाले असावे.

बोधकथा हा तसा सर्व शाळांत परिपाठात नेमाने असणारा घटक असतो. या शाळेत वेगळेपण दिसले ते मुलांनी बोधकथेवर आधारित प्रश्न विचारले तेंव्हा. शाळाभेटीच्या दिवशी इयत्ता ३ री च्या मुलांनी एका गोष्टीच्या पुस्तकातील ‘बेडूकराव’ ही गोष्ट वाचली. गोष्ट वाचून झाल्यावर लगेच मुले गोष्टीवर आधारित क्रमवार एकानंतर एक प्रश्न विचारू लागली. बहुतेक सर्व प्रश्न गोष्टीवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नच होते. नंतर शिक्षकांनी विचारलेल्या विचारप्रेरक प्रश्नांना मुलांनी छान उत्तरे दिली. गोष्टीतील पात्रांना इंग्रजी भाषेत काय म्हणतात? अशा स्वरुपाचे प्रश्न जरा वेगळे वाटले. मुलांना इंग्रजी भाषेतील शब्दांचा परिचय देणारे हे प्रश्न १ ली २ री च्या मुलांकडूनही येत होते हे ही विशेषच.

हा उपक्रम शिक्षिकेच्या मदतीशिवाय सहजपणे पार पडला. प्रश्न विचारण्याच्या या कृतीत इयत्ता १ ली ते ५ वीच्या प्रत्येक मुलाला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. प्रत्येकाने वेगळे प्रश्न विचारले. त्यामुळे एका गोष्टीवर २१ प्रश्न काढले गेले. या कृतीचे महत्त्व सांगताना शिक्षिका शीतलताई म्हणाल्या, “प्रश्न विचारायचे असल्याने अर्थातच प्रत्येकजण कथा लक्षपूर्वक ऐकतो. अशीच प्रश्न विचारण्याची कृती सामान्यज्ञान / माहिती सांगितल्यावरही केली जाते. मुलांना हे इतके सरावाचे झाले की बोधकथा संपल्याबरोबर मुले हात वर करून “बाई मी विचारू? मी विचारू?” असे विचारणे सुरु करतात.”

परिपाठानंतर आलेल्या पाहुण्यांनाही अनेक प्रश्न विचारून मुलांनी त्यांचा सविस्तर परिचय करून घेतला. शीतलताईंनी सांगितले की प्रश्न विचारण्याचा हा उपक्रम त्यांना मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळेच सुचला. पूर्वी शाळेत नवे पाहुणे, अधिकारी आले की मुले बुजायाची. आता छान मोकळेपणाने बोलतात, प्रश्नही विचारतात.   

गणित शिकवताना शीतलताई जोडी चर्चेचा खूप वापर करतात. मुले एकमेकांना गणिते घालतात व तपासतातही. तसेच मोठ्या वर्गातील मुले लहान मुलांच्या वाचनाचा सरावही घेतात. वाचन घेतल्यानंतर उताऱ्यावर आधारित प्रश्नही विचारतात.

सर्वच वर्गातील मुले प्रश्न विचारण्याची मोकळीक असल्याने उत्सुक आणि शोधक वृत्तीची वाटली. कदाचित ही मोकळीक त्यांना स्वयंअध्ययनाकडेही घेऊन जात असावी. शाळेत बहुवर्ग अध्यापन चालते. इ. ३ री व ४ थीची मुले एका वर्गात तर इ. १ ली, २ री, ५ वीची मुले दुसऱ्या वर्गात बसतात. शीतलताई त्यादिवशी आधी दुसऱ्या वर्गात गेल्या (शिक्षक रजेवर असल्याने) तर ३ री व ४ थीच्या मुलांनी आपापले गट करून सामुहिक प्रकट वाचन, कविता म्हणणे इ. काम स्वत:हूनच सुरु केले होते. आपापले इयत्तावार गट करून मुले कामाला लागली. शिक्षकांच्या सूचनेची वाट न पाहता ही कृती देखील रोजची सवय असावी अशापद्धतीने सुरु झाली.

गटात काम करताना विद्यार्थी

गटात काम करताना विद्यार्थी

मूल्यवर्धनचे उपक्रम दैनंदिन कार्यक्रमात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न शीतलताई करतात. त्यांनी सांगितले की, पूर्वी दरवर्षी शाळेचा आदर्श विद्यार्थी शिक्षकच निवडायचे. काही पालक नाराज व्हायचे. शिक्षक पक्षपात करतात असे म्हणायचे. पण या वर्षी मूल्यवर्धनच्या एका उपक्रमानुसार आम्ही आदर्श विद्यार्थ्याची निवड मतदानाद्वारे केली. सर्व मुलांनी मतदान केले, मतमोजणी केली आणि आदर्श विद्यार्थी निवडला. अशा गोष्टींमुळे पालकांचाही विश्वास वाढीस लागतो आहे. स्नेहसंमेलनानंतर मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचे काय करायचे याचा निर्णयही पालक व शिक्षकांच्या मतानेच घेतला.

शाळेचे वातावरण असे आनंदी, कुतूहलवर्धक व उत्साही बनण्यामागे मूल्यवर्धनचा हातभार नक्की लागला आहे. शिवाय, मूल्यवर्धन कार्यक्रम इतक्या प्रभावीपणे, अर्थपूर्ण पद्धतीने राबविणाऱ्या प्रेरक शिक्षिका शीतल जाधव यांचेही यामध्ये मोठे योगदान आहे.  

शीतलताईंनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की मूल्यवर्धनचे उपक्रम इतर विषयांप्रमाणेच अनिवार्य झाले पाहिजेत कारण त्यामुळे मूल्ये रुजातातच शिवाय इतर विषयांचे आकलनही सुधारते. पूर्वीही विषयांचे अध्यापन वेगवेगळी साधने वापरून प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न केला जात होता. पण आता मूल्यवर्धनच्या पद्धतींमुळे अध्यापन खऱ्या अर्थाने बालककेंद्री झाले आहे. शिकण्यामध्ये मुलांचा प्रत्यक्ष सहभाग वाढला आहे. त्यामुळे मुले जास्त मोकळी झाली आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे.

सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत करत राहणे, मूल्यवर्धनच्या अध्ययन पद्धतींचा वापर शाळेच्या दैनंदिन वर्गप्रक्रियांत करणे, सगळे आनंददायी व अर्थपूर्ण पद्धतीने करणे, हे सर्व शाळेतील शिक्षिका शीतलताई अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि मनापासून करतात आणि मूल्यवर्धनच्या मूल्यांचा अनुभव मुलांना शाळेच्या वातावरणात मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात असे जाणवते. मुलांना प्रश्न विचारण्याची मोकळीक व संधी देणे हे देखील स्वायत्तता व चिकित्सक विचार ही मूल्ये रुजविण्याचाच भाग आहे.  

झुजू बाहुलीशी गप्पा मारताना विद्यार्थी आणि शिक्षिका

झुजू बाहुलीशी गप्पा मारताना विद्यार्थी आणि शिक्षिका