आदिवासी गावातील प्रत्येक कुटुंब देते शाळेसाठी एक दिवस

पालघर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून जवळपास ११० किलोमीटर अंतरावर वाडा प्रभागातील दुर्गम क्षेत्रात नेवाळपाडा हे गाव आहे. साधारण  २५० इतकी लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये बहुतांश कुटुंबेही ‘वारली’, ‘कातकरी’ या आदिवासी जमातींतील आहेत. यामधील अनेकजण छोटे शेतकरी आणि मजूर आहेत. तसं पाहता नेवाळपाड्याची जुनी पिढी शिक्षणापासून कित्येक काळ वंचित राहिली आहे; परंतु आज चित्र बदलतं आहे. आज गावातील अबालवृद्धांमध्ये शाळेप्रती असणारी ओढ वाढताना दिसते आहे.

 

नेवाळपाडा येथील प्राथमिक शाळेचा परिसर

नेवाळपाडा येथील प्राथमिक शाळेचा परिसर

२०१८ सालापासून या शाळेत मूल्यवर्धन उपक्रमाचे आयोजन करण्यास सुरूवात झाली आहे; परंतु एकाच वर्षात मूल्यवर्धनच्या शिक्षकाने संपूर्ण गावाला मूल्यवर्धनातील दैनंदिन व्यवहारावर आधारित कृती आणि चर्चांमध्ये सहभागी करून घेतले आहे. येथे ‘एक दिवस शाळेसाठी’ अशा नावाने एक स्वच्छता उपक्रम चालवला जात आहे. मूल्यवर्धनअंतर्गत होणारी एक कृती म्हणून चालवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामुळं शाळा गावाशी तर जोडली गेलीच आहे; परंतु यामुळं गावातील लोकांमध्येही एकजूट निर्माण झाली आहे. 

नेवाळपाड्यामध्ये १९७९ सालापासून मराठी माध्यमाची ही शाळा भरते. जिल्हा परिषदेच्या या प्राथमिक शाळेत यावर्षी ५० मुलं आणि दोन शिक्षक आहेत. यातील एक आहेत शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगदीश जाधव. तेगेल्या एक वर्षापासून मूल्यवर्धनच्या तासाचं आयोजन करत आहेत. आपले अनुभव सांगताना म्हणतात की, ‘मूल्यवर्धनच्या तासामुळं केवळ मुलांमध्येच नाही तर स्वतःतही काही बदल झाले आहेत.’

‘मूल्यवर्धनने मला मुलांबरोबर संपूर्ण समाजाशी जोडून घेणं आणि त्यांची मदत घेणं हे दोन्ही शिकवले आहे. या कारणामुळंच स्वच्छतेच्या मुद्यावर संपूर्ण गाव शाळेसोबत आहे.’

 

चर्चेदरम्यान मुख्याध्यापक जगदीश जाधव 
महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी सारे गाव येते एकत्र

चर्चेदरम्यान मुख्याध्यापक जगदीश जाधव महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी सारे गाव येते एकत्र

‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाबद्दल बोलताना ते सांगतात की, ‘मूल्यवर्धनातील कृती आणि इतर घटकांपासून प्रेरित होऊन त्यांनी हा उपक्रम एक प्रयत्न म्हणून सर्वात आधी मुलांसोबत सुरू केला होता; पण एका वर्षात संपूर्ण गावच या मोहिमेत सहभागी झाले.’ याबद्दल ते सांगतात की, ‘यामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी प्रत्येक घरातील एक सदस्य किमान एक तास शाळेसाठी देईल आणि शाळेची इमारत, परिसर आणि शाळेतील शौचालय यांची साफसफाई करेल, असे ठरवण्यात आले.’

 

शाळेच्या परिसरात साफसफाई करण्यासाठी एकत्र आलेले गावकरी

या कार्यक्रमाचा प्रभाव गावावर अनेक कारणांनी पडला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. पदमन वंजारी यांच्या मते, ‘गावामध्ये राजकारणामुळं गट-तट पडलेले असतात, पण शाळेच्या या उपक्रमामुळं सर्वजण महिन्यातील एक दिवस एकत्र येतात. ते पुढे म्हणतात की, ‘मूल्यवर्धनच्या विविध कृती आणि चर्चांमुळं मुलं आपापल्या घरीही कटाक्षानं स्वच्छता बाळगतात. अंघोळ करण्याची आणि धुतलेले स्वच्छ कपडे घालण्याची सवय त्यांच्यात वाढीस लागली आहे. याशिवाय आम्ही लोकवर्गणी गोळा करून पंधरा-वीस दिवसात एक न्हावी बोलवतो आणि त्यांच्याकडून मुलांची नखं आणि केस कापून घेतो.’

 

शाळेचा परिसर स्वच्छ झाल्यांनतर तो सजवणाऱ्या महिला

शाळेचा परिसर स्वच्छ झाल्यांनतर तो सजवणाऱ्या महिला

बदलली मुलांची बोलाचाली

स्वच्छतेच्या बाबतीत लोकांचा हा उत्साह पाहून ग्रामपंचायतही पुढं आली. स्वच्छतेप्रती जागरुक आणि सतर्क असलेल्या मुलांना पुरस्कार देण्याचा निर्णय लोकांनी पंचायतीत एकत्र येऊन घेतला. यावर्षी हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनी देण्यात आला. याविषयी गावच्या सरपंच श्रीमती पुष्पा चातुर्य सांगतात की, ‘पुरस्कार म्हणून या मुलांना वही, खोडरबर, चार्ट पेपर आणि रंगीत पेन्सिली देण्यात येतात.’ त्यांच्या मते, ‘पंचायतीनं लोकांच्या मदतीनं शाळेसाठी मोठी भिंत बांधली आहे; पण त्याहून मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ही की, मूल्यवर्धनमुळं मुलांची बोलाचाली बदलते आहे. ती आता असभ्य, अभद्र शब्द वापरत नाहीत. ती ज्येष्ठांचा आदरही करू लागली आहेत.’

 

शाळेच्या इमारतीत गावच्या सरपंच पुष्पा चातुर्य आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य पदमन वंजारी

शाळेच्या इमारतीत गावच्या सरपंच पुष्पा चातुर्य आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य पदमन वंजारी

शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दीपक मुकणे यांनी मूल्यवर्धनच्या काही तासांचं निरीक्षण केलं आहे. प्रत्येक मुलानं पुस्तक वाचूनच शिकायची आवश्यकता नाही, असं दीपक यांना वाटतं; परंतु मूल्यवर्धन हा विषय सर्व मुलांना आवडतो. दीपक यांच्या मते, आता येथील मुलं नव्या व्यक्तीशी न लाजता, न अडखळता बोलू शकतात. प्रत्येक मुलाचं काहीतरी स्वतंत्र मत आहे, मूल्यवर्धनमुळं हा बदल झाला आहे.

महिला आणि मुलं प्रथमच एकत्र

२६ जानेवारी २०१९ च्या रात्री गावकऱ्यांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये महिला बचत गटाने पंधरा आणि शाळेच्या मुलांनी दहा कार्यक्रम सादर केले. याबाबत श्री.भरत माने हे शिक्षक सांगतात की, महिला आणि मुलं एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी एकत्र येणं हे या गावात प्रथमच घडलं. ‘मुलांनी या कार्यक्रमांची तयारी मूल्यवर्धनच्या तासाला केली होती’, असंही भरत पुढे सांगतात.

 

२६ जानेवारीच्या रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील एक दृश्य

२६ जानेवारीच्या रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील एक दृश्य

मुलांमध्ये निर्माण झालेला हा आत्मविश्वास आणि त्यातील बदल याबदल आपला अनुभव सांगताना श्री. जगदीश जाधव म्हणतात, ‘खरंतर हा ‘चांगल्या आणि वाईट सवयी’ आणि ‘योग्य वा अयोग्य’ या विषयांवर मूल्यवर्धनच्या तासाला घेण्यात आलेल्या चर्चेचा परिणाम आहे. या चर्चा आम्ही वर्गाबाहेर, मैदानात आणि सामूहिक पद्धतीनं घेत असू. यामुळं मुलं स्वत:ची मतं बनवू लागली. त्यांना स्वच्छता आणि इतर विषयांबद्दल नवनवीन गोष्टी कळू लागल्या.’

 

पहिलीच्या वर्गात मूल्यवर्धनच्या तासाला घेतलेली कृती

पहिलीच्या वर्गात मूल्यवर्धनच्या तासाला घेतलेली कृती

आपल्या पुढील योजनेबद्दल बोलताना श्री.जगदीश जाधव सांगतात की, ‘ते आता  मूल्यवर्धनचा एक उपक्रम म्हणून वृक्षारोपण मोहीम हाती घेऊ इच्छितात. या मोहिमेत त्यांना विशेषतः महिला आणि मुलांचा अधिकाधिक सहभाग हवा आहे.’ 

घडते आहे आमचे भविष्य

‘अगदी कमी कालावधीत आम्ही आमच्या मुलांमध्ये बदल होताना पाहत आहोत, आपण असंही म्हणू शकतो की, आमच्या डोळ्यासमोर आमचं भविष्य घडतं आहे.’ असं या गावातील महिला किरण वंजारी सांगतात.

‘ते कसं?’ असं किरण यांना विचारताच ‘ते तुम्ही मुलांनाच विचारा’ असं उत्तर त्या देतात. मुलांशी बोलताना असं कळतं की, चौथीच्या वर्गातील कार्तिक जाधव पूर्वी लांब असलेल्या पक्षांना बेचकीतून दगड मारायचा; परंतु मूल्यवर्धनच्या तासाला झालेल्या चर्चेनंतर त्यानं बेचकीचा वापर थांबवला आहे. तसंच चौथीच्या वर्गातील अजय जाधव याआधी लहान मुलांना लहानसहान कारणावरून मारत असे; परंतु आता तो याच लहान मुलांची काळजी घेतो.